नव्या युगातील ज्ञानसाधना

madhav gadgil
madhav gadgil

ज्ञानसाधना हे मानवाचे खास बलस्थान आहे. आज या ज्ञानसाधनेतून उपजलेल्या आधुनिक माहिती-संवाद तंत्रज्ञानामुळे जगात कोठेही राहणाऱ्या कोणाही व्यक्तीला आपापल्या आवडीच्या ज्ञानसाधनेत सहभागी होण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

आ पण सतत वाचतो, ऐकतो त्या बातम्या, पाहतो ते चित्रपट, टीव्हीवरील मालिका भांडणं, हाणामाऱ्या, हिंसा, भ्रष्टाचार यांनी ओतप्रोत भरलेले असतात. तेव्हा सांगितलं, की मनुष्य ही प्राणिजगतातील अग्रगण्य सहकारपटू जात आहे, तर म्हणाल की काय वेड्यासारखं बोलतोय! पण नाही. हे खरंच आहे. मुंग्या-मधमाश्‍यांचे समाज केवळ नात्या-गोत्यातल्या प्राण्यांच्या सहकार्यावर पोसलेले असतात; त्यांच्या वेगवेगळ्या परिवारांच्यात सातत्याने संघर्ष, हिंसा चालू असते. केवळ मानवात रक्तबंधांच्या पलीकडे जाऊन वेगवेगळ्या व्यक्तींच्यात ‘एक एका करू साहाय्य’ असे सहकाराचे संबंध प्रस्थापित होतात. अशा सहकारातूनच मानवाने त्याचे खास बलस्थान असलेली अचाट ज्ञानसंपदा कमावली आहे. समतापूर्ण समाजात सहकार सहजी फोफावतो; आणि विज्ञानाभ्यासकांचा समाज हा जगातला सर्वाधिक समताधिष्ठित समुदाय आहे. या विज्ञान जगतातल्या सहकाराच्या जोरावर आधुनिक माहिती-संवाद तंत्रज्ञान उभारले गेले आहे आणि आज या तंत्रज्ञानाच्या आधारावरच सहकारी प्रवृत्ती, उपक्रम अधिकाधिक बळावत आहेत.

प्रतिभावान गणिती टेरी टाओ यांचा पॉलिमॅथ प्रकल्प हे अशा सहकाराधिष्ठित उपक्रमांचे एक वैशिष्ट्यपूर्ण उदाहरण आहे. पॉलिमॅथचा मूळ अर्थ आहे चतुरस्र बुद्धीचा विद्वान. असे म्हणतात, की आज जगात गणिताच्या सर्व शाखांचे खोलवर आकलन असलेली एकच व्यक्ती आहे आणि ती म्हणजे टेरी टाओ. गॉवर नावाच्या गणितज्ञाने २००९मध्ये ज्या गणितज्ञांना सहकारातून ज्ञानसाधना करण्यात रस आहे, त्या सर्वांनी एकत्र येऊन हेल्स-ज्युवेट सिद्धांत सिद्ध करून दाखवू या, असे आवाहन केले; याला प्रतिसाद देत टाओ यांनी स्वतःच्या विश्वव्यापी आंतरजालावरील ब्लॉगवर मोठ्या उत्साहाने कामाला सुरवात केली. मग पंचखंडांवर विखुरलेल्या, पूर्वी एकमेकांना कधीही न भेटलेल्या चाळीस गणितज्ञांच्या टाओंच्या ब्लॉगच्या माध्यमातून संघटित झालेल्या योगदानातून हे उद्दिष्ट तीन महिन्यांत साध्य झाले. अशा ब्लॉगवरील प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे सगळे काम इतक्‍या उघडपणे चालते, की यात खोटेपणाने दुसऱ्याचे श्रेय लाटायला अजिबात वाव नसतो आणि सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला तिचे/त्याचे जितके योगदान तितकेच श्रेय नेटकेपणे मिळते, अशी न्यायाची खात्री असल्यामुळे अनेक जण उत्साहाने भाग घेतात; त्यातील कुणा-कुणाकडे काहीतरी वेगळेच ज्ञान, खास अनुभव असतो आणि हे सगळे जुळल्यामुळे एक चांगल्या दर्जाचे काम अतिशय झपाट्याने होऊ शकते.

या पॉलिमॅथ प्रकल्पांच्या मालिकेतील चौदावा प्रकल्प गेल्या वर्षी यशस्वीरीत्या पुरा झाला. हा प्रकल्प सुरू झाला बंगलोरच्या ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’मधल्या अपूर्व या गणितज्ञाने उपस्थित केलेल्या एका प्रश्नातून आणि ते सोडवण्यात नावीन्यपूर्ण योगदान केले, ते त्याच संस्थेतील सिद्धार्थ नावाच्या दुसऱ्या गणितज्ञाने. बीजगणितात आपण वेगवेगळी अक्षरे वापरतो, त्यांना काही विशिष्ट अर्थ, विशिष्ट मूल्य देतो. उदाहरणार्थ आपण म्हणतो की (अ+ब) x (अ+ब)  = अxअ +अब+ बxब. अशा समीकरणातील ‘अब’ला आपण एक शब्द म्हणू शकू. या शब्दाला काहीतरी मूल्य असेल. नेहमीच्या बीजगणितात ‘अब’चे मूल्य व ‘बअ’चे मूल्य एकच आहे; म्हणजे ‘अ’ व ‘ब’ च्या अनुक्रमामुळे त्या मूल्यात काहीही बदल होत नाही. गणिताच्या दुसऱ्या शाखांच्यात आपण काही वेगळे गृहीत धरू शकतो, त्याबद्दल वेगळ्या प्रकारे मीमांसा करत दुसरे काही सिद्धांत प्रस्थापित करू शकतो. गणितज्ञ सारखे अशा काही ना काही उपद्‌व्यापात गढलेले असतात. ज्या शब्दांच्या अक्षरांचा अनुक्रम महत्त्वाचा असतो अशा काही विशिष्ट प्रकारच्या शब्दांचे मूल्य काय असू शकेल, ते नेहमीच शून्याहून जास्त असेल का शून्यही असू शकेल, हा प्रश्न पॉलिमॅथच्या चौदाव्या प्रकल्पाचा विषय होता. याचा अभ्यास सुरू झाला २०१७च्या शनिवार, १६ डिसेंबरच्या सकाळी. प्रथम सहभागी झालेले गणिती वेगवेगळ्या प्रकारे हे मूल्य काय असेल, हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करू लागले. लवकरच त्यांना खात्री पटली की हे शून्य असू शकेल; पण आता आव्हान होते की हे कसे सिद्ध करायचे? मग ते या शब्दाचे कमीत कमी मूल्य अमूक असेल, असे सिद्ध करण्याचा प्रयत्न करू लागले. त्यांची मजल अगदी भराभर हे मूल्य एकाहून थोडे जास्त असेल, इथवर बुधवारपर्यंत जाऊन पोचली, त्यानंतर २४ तास प्रगती कुंठित झाली. मग या मोहिमेत आधुनिक संगणकाचा प्रवेश झाला. आज संगणकाचा वापर करत नवे गणितीय सिद्धांत कसे सिद्ध करावे याचा अभ्यास सुरू आहे आणि हा सिद्धार्थच्या व्यासंगाचा विषय आहे. त्याने या वेगळ्या दृष्टिकोनातून शंभर वेगवेगळ्या शब्दांचे कमीत कमी मूल्य किती असेल, हे संगणकाच्या मदतीने शोधायला सुरवात केली. या शोधादरम्यान संगणकाद्वारे याच्याहून हे मूल्य कमी, त्याच्याहून ते मूल्य कमी अशी प्रतिपादने एकापाठोपाठ एक मांडण्यात येत होती. प्रत्येक शब्दाबद्दल हजारो दिशांनी धुंडाळत अशी शिस्तवार मांडणी केली गेली आणि अशा शब्दाचे मूल्य नऊ दशांश असू शकेल, असे गुरुवारी पहाटे सिद्ध झाले. आता संगणकाने हे कसे सिद्ध केले, याचा अभ्यास सुरू झाला आणि काही गणितज्ञांना या शोध पद्धतीचा गाभा सापडला. लागलीच पुन्हा भरधाव प्रगती सुरू झाली आणि शुक्रवार सकाळपर्यंत हे मूल्य पूर्णपणे शून्य असू शकेल हे यशस्वीपणे सिद्ध केले गेले. शनिवारी सुरू झालेली ही मोहीम अशा रीतीने अवघ्या सहा दिवसांत पुढच्या शुक्रवारी फत्ते झाली. एकमेकात विचारविनिमय करून या प्रकल्पात सक्रिय असलेल्या गटाने ठरवले, की सहा गणितज्ञांनी खास महत्त्वाचे आणि इतर आठ जणांनी उपयुक्त योगदान केले. असे श्रेय वाटप करत हे काम विद्वद्मान्य पद्धतीने चटकन प्रकाशित करण्यात आले. अगदी पारदर्शकरीत्या स्वेच्छेने सहभागी झालेल्यांच्या सहकारातून विलक्षण झपाट्याने एक नवा गणितीय सिद्धांत सिद्ध केला गेला. ही झाली एका विषयाचा खोल अभ्यास केलेल्या विद्वानांची ज्ञानसाधना; पण हीच साधने वापरत सामान्य नागरिकही अशीच सहकारी पद्धतीने ज्ञानसाधना करू शकतात. थंड प्रदेशातले अनेक पक्षी दिवाळीच्या मुहूर्तावर भारतात येतात, इथे हिवाळा घालवतात आणि शिमग्याच्या मुहूर्तावर पुन्हा उत्तरेकडे कूच करतात. वेगवेगळ्या जातींच्या पक्ष्यांचे आगमन आणि प्रयाण केव्हा होते, हा एक रंजक शास्त्रीय विषय आहे. अनेक हौशी पक्षी निरीक्षक या संदर्भातील आपापली निरीक्षणे https://ebird.org/india या संकेतस्थळावर नोंदवतात आणि नोंदींच्या आधारे भारतात स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांच्या हालचालींचे एक छान चित्र आपल्यापुढे उभे राहिलेले आहे. याच्याही पुढे जाऊन भारताच्या तब्बल १६वर्षांपूर्वीच्या जैवविविधता कायद्याच्या अनुसार आपल्या सर्व पंचायती, नगरपालिका, महानगरपालिकांच्यात स्वेच्छेने नागरिकांच्या जैवविविधता समित्या स्थापन होऊन त्यांच्याद्वारे स्थानिक जैवविविधतेची माहिती नोंदवण्याची तरतूद आहे. ही तर एक सर्वसमावेशक देशव्यापी ज्ञानसाधना ठरू शकेल. दुर्दैवाने लोकांनी संघटित होऊन काहीही रचनात्मक प्रयत्न करू नयेत, यासाठी सतत प्रयत्नशील असणाऱ्या शासनव्यवस्थेने या उपक्रमाला खच्ची केले आहे; परंतु आपल्या प्रजातंत्रात लोकांनी आपणहून पुढाकार घेऊन हे हाती घेणे पूर्ण शक्‍य आहे. भविष्यात भारताचे सगळे नागरिक अशा सहकारी ज्ञानसाधनेत सहभागी होतील, अशी आशा बाळगूया.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com