कोळशाची कुळकथा

माधव गाडगीळ
बुधवार, 13 मार्च 2019

आजच्या ज्ञानयुगात यंत्रयुग घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या कोळशाच्या ऊर्जेहून सौरऊर्जा स्वस्त बनली आहे. तेव्हा आता मूठभर लोकांचे खिसे भरत राहण्याच्या हव्यासापायी कोळसा खणत, जाळत, निसर्गाची नासाडी करत राहणे अक्षम्य आहे.

आजच्या ज्ञानयुगात यंत्रयुग घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या कोळशाच्या ऊर्जेहून सौरऊर्जा स्वस्त बनली आहे. तेव्हा आता मूठभर लोकांचे खिसे भरत राहण्याच्या हव्यासापायी कोळसा खणत, जाळत, निसर्गाची नासाडी करत राहणे अक्षम्य आहे.

शाश्वत विकास - भारत हवामान बदलाबद्दलच्या जागतिक वाटाघाटींच्या आखाड्यात उतरल्यावर या नव्या मंत्राचा जप कानावर पडतोय. पाच वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विजयानंतरच्या पहिल्याच भाषणात नारा दिला होता : "विकास को जनआंदोलन बनाएँगे'. तो प्रत्यक्षात उतरण्याची चिन्हे कधीच दिसली नाहीत. उलट, आमच्यावर विकासाच्या नावाखाली जे काय लादलं जातंय, ते अजिबात नको आहे, अशी नाणज प्रकल्पाच्या संदर्भातल्या जनआंदोलनांसारखी आंदोलने उभी राहिली आहेत. बघूया, शाश्वत विकासाच्या मंत्राची किती अर्थपूर्ण अंमलबजावणी होते. अवघड दिसते, कारण विचार करा, पृथ्वीच्या साडेचार अब्ज वर्षांच्या इतिहासात शाश्वत काय राहिले आहे? आरंभी वातावरण कार्बन डाय-ऑक्‍साइड आणि पाण्याच्या वाफेने ठेचून भरलेले होते. प्राणवायूचा मागमूसही नव्हता. अशा वातावरणात चार अब्ज वर्षांपूर्वी सजीवांच्या पहिल्या खाणाखुणा दिसू लागतात. आज सूर्याची ऊर्जा आणि हिरव्या वनस्पतींनी या ऊर्जेचे साखरेत रूपांतर करणे हा जीवसृष्टीच्या अस्तित्वाचा आधार आहे. आरंभीचे जीव अगदी वेगळ्याच सल्फर, लोहयुक्त रेणूंच्या ऊर्जेवर जगत होते. साडेतीन अब्ज वर्षांपूर्वी साध्या रचनेचे जिवाणू हरितद्रव्य संपादून सौर ऊर्जा वापरू लागले. या आदिम वनस्पती कार्बन डाय-ऑक्‍साइड आणि पाण्याचे रेणूंपासून प्राणवायू मोकळा करू लागल्या. या करामतीमुळे वातावरणातील प्राणवायूचे प्रमाण वाढत राहिले. सुरवातीस जीवांना प्राणवायू विषप्राय होता; हळूहळू जीवसृष्टी प्राणवायू हाताळायला शिकली आणि तिची आणखीच भरभराट झाली. तीव्र अल्ट्रा-व्हॉयलेट किरण जीवांना सोसत नाहीत. पाणी तसेच प्राणवायूच्या तीन अणूंनी बदललेला ओझोन ते किरण शोषून घेतात. अगदी अलीकडेच, केवळ पन्नास कोटी वर्षांपूर्वी वातावरणात ओझोनचे प्रमाण पुरेसे झाल्यावर मगच जीवसृष्टी पाण्याबाहेर पडू शकली.

पाण्यात साध्या एकपेशी वनस्पती होत्या; जमिनीवर अगदी वेगळ्या धाटणीच्या वनस्पती साकारू लागल्या. प्रकाशासाठीच्या स्पर्धेतून त्या बहुपेशी बनून अधिकाधिक उंच वाढू लागल्या. हा बांधा पेलण्यासाठी हेमीसेल्युलोज आणि लिग्निन असे नवे रेणू उद्‌भवले; हे रेणू सहजी कुजत नाहीत. उत्क्रांतीच्या मंद गतीत पृथ्वीतलावर उत्तुंग वृक्षांची अरण्ये उभी राहायला दहा कोटी वर्षे लोटायला लागली. तेव्हा अरण्ये फोफावायला पृथ्वीचा परिसर अतिशय अनुकूल होता. आजही सर्वांत समृद्ध वनराजी उष्ण तापमानात आणि भरपूर पावसाच्या प्रदेशात आढळते. शिवाय, जितका जास्त कार्बन डायऑक्‍साइड, तितक्‍या जास्त जोमात वनस्पती प्रकाशाची ऊर्जा वापरत सेंद्रिय रेणू बनवतात. चाळीस कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीचे तापमान आजच्याहून सरासरीने सहा अंश सेल्सिअस अधिक होते. कार्बन डायॉक्‍साईडचे प्रमाण आजच्या पंधरापट होते. शिवाय, चिक्कार पाऊस पडत होता. या सगळ्या अनुकूलतेमुळे वनस्पतीसृष्टी पूर्वी कधी नव्हती आणि पुन्हा कधी होणार नाही, अशी फोफावली; हेमीसेल्युलोज व लिग्निन या सहज न कुजणाऱ्या रेणूंचे अफाट उत्पादन झाले. ही परिस्थिती तीस कोटी वर्षांपूर्वीपर्यंत टिकली. या युगाला म्हणतात कर्बयुग. कर्बयुगात वनस्पतींचे अवशेष साठत साठत गाडले गेले आणि पृथ्वीच्या पोटात त्यांचा कोळसा बनला. आज आपण जो खणून जाळतो तो कोळसा असा चाळीस ते तीस कोटी वर्षांपूर्वीच्या कालावधीत निर्माण झाला. जसजसे वनस्पतींचे अवशेष गाडले गेले आणि मोठे कर्बाचे साठे वातावरणातून नाहीसे होत पृथ्वीच्या पोटात दाखल झाले, तसे वातावरणातील कार्बन डायऑक्‍साईडचे प्रमाण घटत गेले. अखेर तीस कोटी वर्षांपूर्वी वातावरणात आजच्या केवळ तिप्पट कार्बन-डाय ऑक्‍साईड शिल्लक राहिला; या वायूने पृथ्वीवरून परावर्तित प्रकाश किरण शोषल्याने पृथ्वीचे तापमान वाढते. जसा हा वायू घटला, तशी पृथ्वी थंड पडत गेली, तिचे सरासरी तापमान आजच्याहूनही चार अंश सेल्सिअस खाली गेले. पृथ्वी जशी थंडावली, तसे पावसाचेही प्रमाण घटले. शेवटी तीस कोटी वर्षांपूर्वी पृथ्वी गार, कोरडी पडून कर्बयुगाचा अस्त झाला.

हा कोळसा पृथ्वीच्या पोटात तीस कोटी वर्षे सुस्त पडून होता. त्याचा पुढचा इतिहास अगदी अलीकडचा आहे. आठ लाख वर्षांपूर्वी मानवाचे पूर्वज लाकडे जाळून तिच्यावर अन्न शिजवायला शिकले. तेरा हजार वर्षांपूर्वी पृथ्वीचे तापमान वाढून आणि पर्जन्यमान कमी होऊन मोठ्या प्रमाणावर माळराने निर्माण झाली आणि त्यांच्यावर मनुष्यप्राणी शेती करू लागला. या कृषियुगात तो मोठा तरबेज आगलाव्या बनला, पण अजून तो जमिनीवरच्या लाकडांच्या ऊर्जेवर अवलंबून होता. सात हजार वर्षांपूर्वी मानवाने खनिजे वापरायला सुरवात केली आणि चार हजार वर्षांपूर्वी तो पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळचा दगडी कोळसा वापरू लागला. हा वापर तीनशे वर्षांपूर्वीपर्यंत मर्यादित राहिला. या सुमारास युरोपात विज्ञानाची आणि विज्ञानाधारित तंत्रज्ञानाची झपाट्याने प्रगती सुरू झाली आणि विस्तवाची ऊर्जा मोठ्या कार्यक्षमतेने वापरणाऱ्या वाफेच्या इंजिनांचा शोध लागला. ही होती यंत्रयुगाची सुरवात. कोळशावर चालणारे इंजिन हे यंत्रयुगाचे प्रतीक बनले आणि मर्ढेकरांसारखे कवी लिहू लागले : दण्कट दंडस्नायु जैसे लोखंडाचे वळले नाग; कभिन्न काळ्या मांड्या जैसा पोलादाचा चिरला साग। धगधगणाऱ्या भट्टीपुढल्या प्रकाशांत ही तळपे कांति, जशी ओलसर शिशवी-नक्षी पॉलिशलेली चांदण्यांत ती। टणक्‌ कोळसा पवित्र्यांत हा खोरुन घेई पावड्यांत अन्‌ झोकुनि देई पहा लीलया तसाच भट्टित अचूक झर्कन्‌।। यंत्रयुगांतील नवनृत्याचा स्थाणुभाव हा प्रगटे येथे; अहा, कोळसेवाला काळा! नव्या मनूतिल गिरिधर-पुतळा।।
विज्ञान-तंत्रज्ञानाच्या पुढील प्रगतीतून आज ज्ञान सहजी हाताळणारी संगणकासारखी डोकेबाज यंत्रे निर्माण झाली आहेत आणि यंत्रयुगाचा अस्त होत नवे ज्ञानयुग उदयाला येत आहे. या ज्ञानयुगात औष्णिक विजेपेक्षा सौरऊर्जा खूप स्वस्तात बनवता येऊ लागली आहे, त्यामुळे कोळशाच्या खाणी आणि कोळसा जाळत विजेचे उत्पादन कालबाह्य झाले आहे. कोळशाच्या धुराने वातावरणाचे तापमान वाढते आणि आज जग भराभर तापल्याने मानवी अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. तरीही पैशाच्या लोभाने कोळशाची निष्कारण खुदाई आणि वापर चालूच आहे. मला वाटते विदुराने महाभारतात केलेला उपदेश अजूनही समयोचित आहे.

जग आहे हे, उपवन सारे, प्रेमे वेचू, फुले फळे| हवा कुणाला, इथे कोळसा, तोडुनि झाडे, खणुनि मुळे ||


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: madhav gadgil write article in editorial