वणवा पिसाटला रानी

माधव गाडगीळ
शुक्रवार, 5 एप्रिल 2019

आग ही मानवकुळीने कब्जात आणलेली आदिम निसर्गशक्ती आहे. तिच्या जोरावर मानवजातीची भरभराट झाली आहे. कधीमधी ती बेसुमार भडकते, जंगले जाळते. परिसरातल्या लोकांना आस्था असेल, तरच हा हाहाकार टाळता येतो.

आग ही मानवकुळीने कब्जात आणलेली आदिम निसर्गशक्ती आहे. तिच्या जोरावर मानवजातीची भरभराट झाली आहे. कधीमधी ती बेसुमार भडकते, जंगले जाळते. परिसरातल्या लोकांना आस्था असेल, तरच हा हाहाकार टाळता येतो.

आ गलाव्या हे आपल्या मनुष्यजातीचे अगदी चपखल वर्णन आहे. शास्त्रीय परिभाषेत आपली दोन लाख वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेली जात आहे. होमो सेपियन्स आणि आपले पूर्वज आहेत होमो इरेक्‍टस. सोळा लाख वर्षांपूर्वी इरेक्‍टसनी आग काबूत आणून मानवकुळीच्या इतिहासात एक क्रांती घडवून आणली. वणवे लावण्याने परिसरातील झाडी-झुडुपे कमी होऊन हिंस्र श्वापदांवर नजर ठेवणे सोपे झाले. खतरनाक श्वापदे आगीजवळ येईनाशी झाली आणि तिथे मानवांचे समूह बिनधास्त गोळा होऊ लागले. आगीच्या उजेडात जास्त वेळ जागे राहता येऊ लागले आणि माणसा-माणसांतला संवाद बहरला. बारा लाख वर्षांपूर्वी टोळीटोळीने इरेक्‍टस हत्ती, पाणघोड्यांसारख्या जबरदस्त पशूंची शिकार करू लागले. त्यांचे कच्चे मांस खाणे अवघड, शिवाय त्यातून रोगराईचा धोका असतो. आठ लाख वर्षांपूर्वी इरेक्‍टस आगीवर मांस व इतर अन्न भाजू लागले आणि त्यांचे पोषण झपाट्याने सुधारले. शिवाय आता गवताचे बी शिजवून पचवणे शक्‍य झाले आणि हा शाकाहारी आहार मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाला. पोषण सुधारल्यावर भरपूर ऊर्जेची जरुरी असलेले मोठे मेंदू अस्तित्वात आले; इरेक्‍टसच्या मेंदूचा आकार चिम्पाझींच्या तिप्पट पातळीवर पोचला. वणव्यांचे अस्त्र वापरत झाडी विरळ केलेल्या आफ्रिकेच्या परिसरात आधुनिक होमो सेपिएन्सनी पदार्पण केले. साठ हजार वर्षांपूर्वी सेपिएन्स आफ्रिकेतून बाहेर पडले आणि युरोप - आशियाभर पसरले. इथे बारा हजार वर्षांपूर्वी मध्य पूर्वेतील नद्यांच्या खोऱ्यात त्यांनी गायी, बकऱ्या माणसाळवल्या आणि गव्हासारख्या गवतांना लागवडीखाली आणले. काही मानवसमाज मोठ्या संख्येने गुरे पाळू लागले आणि त्यांच्या कळपांसाठी वणवे लावत त्यांनी गवताळ कुरणे निर्माण केली. दुसरे शेतीवर अवलंबून असणारे समाज सुरवातीची हजारो वर्षे फिरती शेती करत होते. एखाद्या ठिकाणी झाडे तोडून, जाळून तेथे लागवड करायची; दोन-तीन वर्षे जमीन कसून कुठेतरी दुसरीकडे पुन्हा झाडी तोडून जाळून पिके घ्यायची, अशी ही रीत होती. फिरती शेती पंधरा-वीस वर्षांच्या चक्रात फिरत राहायची. आजही मेघालय-मिझोराम-मणिपुरात अनेक भागांत अशी फिरती शेती राबवली जाते. इंग्रजांनी भारतावर कब्जा करेपर्यंत सह्याद्रीच्या डोंगराळ मुलखात, मध्य भारताच्या दंडकारण्य क्षेत्रात ती सर्वदूर रूढ होती. पण फिरत्या शेतीत सरसकट झाडे तोडली जायची नाहीत. मोह, हिरडा, बेहडा, आंबा, फणस अशी उपजीविकेसाठी महत्त्वाची मोठमोठी झाडे राखली जायची.
असा निसर्गतः आगलाव्या माणूस साहजिकच आगीची उपासना करत होळीसारखे सण साजरे करू लागला. यंदा होळीच्या दुसऱ्याच दिवशी धुळवडीच्या मुहूर्तावर पुणे विद्यापीठाच्या आवारात प्रचंड वणवा एकवीस तास जळत राहिला होता. त्या विरुद्ध साहजिकच खूप आक्रोश झाला. इंग्रजांनी भारतात आणलेल्या वनव्यवस्थापनाच्या प्रणालीत या आक्रोशाचे मूळ सापडते. भारत जिंकल्यावर त्यांना तोवर ग्रामसमाजांनी चांगल्या रीतीने सांभाळलेल्या वनभूमीला आपल्या कब्जात आणायचे होते. अशा वनभूमीत मोठ्या प्रमाणावर फिरती शेती चालू होती, तेव्हा इंग्रजांनी वणवे लावणे ही अतिशय वाईट प्रथा आहे, अशी सबब वापरत लोकांना हुसकून लावून तिथे आपल्याला हव्या अशा सागवानासारख्या झाडांची लागवड सुरू केली. तेव्हाचे दस्तावेज पाहण्यासारखे आहेत. महसूल खात्याच्या काही इंग्रज अधिकाऱ्यांनीच नोंदवले आहे, की झाडे तोडली जाताहेत, म्हणून वनाधिकारी फिरत्या शेतीविरुद्ध हल्लाबोल करताहेत; पण हेच खाते सागवानाची लागवड करताना लोकांनी मुद्दाम राखून ठेवलेली मोहासारखी भली मोठी झाडे तोडतेय. हे काही जंगलांचे संरक्षण नाही, तर निव्वळ लोकांची मालमत्ता बळकावणे आहे. यावर टीका करत महात्मा जोतिराव फुल्यांनीही ‘या जुलमी फारेस्ट खात्याची होळी करावी’ असे ताशेरे झोडले. याच वेळी मोठ्या प्रमाणावर जंगल तोडून चहा-कॉफीचे मळे लावणारे इंग्रज बागायतदार ठासून लिहीत होते, की फिरती शेती बंद केलीच पाहिजे, नाही तर आम्हाला आमच्या मळ्यांवर मजूर कसे मिळतील? या मजुरांची अवस्था काय होती? एकदा स्वातंत्र्यापूर्वी इंग्रजांच्या मळ्यांवर मुकादमी केलेला एक गृहस्थ मला भेटला होता; सांगत होता की तेव्हा हातात चाबूक घेऊन उभा राहायचो आणि फोडून काढून मजुरांना शिस्तीत कामाला लावायचो. अशी आहे वणव्यांविरुद्धच्या आक्रोशाची पूर्वपीठिका. पण अशा आक्रोशात पुढाकार घेणारा वन विभाग काय करतो? पुण्यात सर्वोच्च स्थानी वेताळबाबा आरूढ आहे. मी त्याच्या टेकडीच्या पायथ्याशी राहतो. वीस वर्षांपूर्वी वेताळाच्या मंदिराला खेटून वन विभागाने परिसरातल्या आगींवर लक्ष ठेवण्यासाठी एक उंच लोखंडी मनोरा उभा केला. पण नित्य नेमाने या सगळ्या परिसरात फेब्रुवारी-मार्च महिन्यात वणवे लागतात, ते काबूत आणण्याचा काहीही प्रयत्न वन विभागाचे कर्मचारी करत नाहीत आणि नागरिकही करत नाहीत. एवढेच की डोंगरावर फिरायला येणारी जनता सुरवातीला त्या मनोऱ्यावर चढून खुशीत देखावा न्याहळायची, आता मनोऱ्याच्या बहुतांश पायऱ्या मोडल्या आहेत आणि काही साहसी तरुण मंडळी तेवढी त्याच्यावर चढतात. देशात जवळजवळ सगळीकडे अशीच अनास्था आहे.

पण याला काही मोठे उद्‌बोधक अपवाद आहेत. पंचवीस वर्षांपूर्वी मी मणिपुरातील फिरत्या शेतीचा आणि तिथल्या जंगलांचा अभ्यास केला. तिथे पूर्वापार निसर्गपूजा चालायची आणि चिक्कार देवराया राखून ठेवलेल्या होत्या. साठ वर्षांपूर्वी ख्रिस्ती धर्माचा प्रसार झाल्यावर त्या तोडल्या गेल्या. पण मग लोकांच्या लक्षात आले, की या देवरायांमुळे फिरत्या शेतीसाठी लावलेल्या आगी आटोक्‍यात राहायच्या. तेव्हा अनेक गावांत त्यांनी मुद्दाम निर्णय घेऊन या देवराया पुनरुज्जीवित केल्या. एवढेच की त्यांना देवराया नाही, ‘सुरक्षावने’ असे नाव दिले.

अलीकडेच स्थानिक लोकांनी आग काळजीपूर्वक काबूत आणण्याचे दुसरे एक उदाहरण मी पाहतो आहे. गडचिरोली जिल्ह्यात हजारो ग्रामसभांना सामूहिक वन अधिकार दिले गेले आहेत. आता त्यांना तिथले गौण वनोपज - बांबू, आवळा, चारोळी, हिरडा बेहडा, जांभूळ सांभाळण्यात आस्था निर्माण झालेली आहे. तिथले ग्रामस्थ पाळीपाळीने गस्त घालतात, उन्हाळ्यात आग पसरू नये म्हणून डिसेंबर-जानेवारी महिन्यात जाळ रेषा सज्ज करतात, तेंदूपत्ता तोडताना काळजी घेतात. लोकशक्ती अशी जागृत झाली, तरच देशातील वणवे काबूत येतील एरवी कठीण आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: madhav gadgil write jungle fire article in editorial