बोलणं गं मंजुळ मैनेचं !

माधव गाडगीळ (ज्येष्ठ शास्त्रज्ञ व पर्यावरणतज्ज्ञ)
शनिवार, 5 नोव्हेंबर 2016

फळांचा,मधाचा आस्वाद घेत निवांतपणे गप्पा टप्पा करणाऱ्या राघू- मैनांना आपले संवाद खुलविण्यासाठी नकला करण्याची जी निसर्गदत्त देणगी लाभली आहे, तिने हजारो वर्षे आपल्याला रिझवले आहे. भारतभूमीला फुला-फळांनी लगडलेल्या झाडांनी पुन्हा एकदा नटवणे हाच या ऋणाची परतफेड करण्याचा मार्ग होय.

फळांचा,मधाचा आस्वाद घेत निवांतपणे गप्पा टप्पा करणाऱ्या राघू- मैनांना आपले संवाद खुलविण्यासाठी नकला करण्याची जी निसर्गदत्त देणगी लाभली आहे, तिने हजारो वर्षे आपल्याला रिझवले आहे. भारतभूमीला फुला-फळांनी लगडलेल्या झाडांनी पुन्हा एकदा नटवणे हाच या ऋणाची परतफेड करण्याचा मार्ग होय.

आपल्या सह्याद्रीवरच्या,दंडकारण्यातल्या, ईशान्य हिमालयातल्या पिवळ्या गलमिशावाल्या काळ्या भोर डोंगरी मैनेचं संस्कृत नाव आहे, मदनसारिका. दोन हजार वर्षांपूर्वीच्या "गाथासप्तशती' या महाराष्ट्री प्राकृत लोकगीत-संग्रहातला एक नायक त्याच्या आत्याकडे तक्रार करतो: कशाला पाळलीस तू ही सारिका? काल माझ्या मैत्रिणीला इथे घेऊन आलो अन्‌ तिच्या बरोबर ज्या गुलुगुलु गोष्टी केल्या,त्या सगळ्यांची या वात्रट मैनेने जाहीर वाच्यता करून आम्हाला शरमिंदं केलन ! काही वर्षांपूर्वी स्व. इंदिरा गांधी छत्तीसगडला गेल्या असताना एका नेत्याच्या डोंगरी मैनेने "इंदिरा गांधी' झिंदाबादच्या घोषणा देऊन त्यांना चकित केले होते! एवढे नक्की की माणसाच्या बोलण्याची हुबेहूब नक्कल करण्यात डोंगरी मैनेची सर जगातल्या दुसऱ्या कुठल्याच प्राण्याला नाही. यामागे आहे काय? निसर्गात केवळ मानवाच्या करमणुकीखातर काहीच उपजलेलं नसतं. मग या बोलभांड मैनेच्या खास कौशल्याचे तिच्या स्वतःच्या जीवनात प्रयोजन काय? याचे रहस्य आहे तिचा गप्पिष्ट स्वभाव. बहुतेक पक्षीजाती खातात किडे-मकोडे, सरडे, उंदीर. त्यांचे भक्ष्य अर्थातच पळून जायला पाहात असते, म्हणून या सगळ्यांची सतत लगबग चालू असते. पण डोंगरी मैना मटकावतात फळे आणि चाखतात फुलांतला मध. त्यांचा आस्वाद अगदी संथपणे घेता येतो. शिवाय कुठल्या झाडाला फळे लगडली आहे, कुठली झाडे फुलली आहेत याची बातमी एकमेकांना पुरवणे फायद्याचे. तेव्हा मैना आणि पोपटांसारखे फलाहारी, मधुपान करणारे पक्षी छोट्या-मोठ्या थव्यांत भटकत, खात-पीत मजेत चकाट्या पिटत असतात. या जीवनशैलीतून जमली आहे आपल्या कडल्या बोलघेवड्या राघू-मैनांची जोडी आणि असेच झोकात जगतात ऑस्ट्रेलियातले कॉकॅटू.
आपल्या संवादांतली खुमारी वाढविण्यासाठी या पक्षीजाती आपल्या सोबत्यांकडून वेगवेगळे बोल शिकून घेत असतात. या नक्कलखोरीतून माणसांच्या आवाजाची सही सही नक्कल करण्याचे कौशल्य त्यांनी कमावले आहे. म्हणे हल्ली ऑस्ट्रेलियात सिडनीतल्या एका सार्वजनिक उद्यानात एक पाळलेला कॉकॅटू सुटून वस्तीला आला आहे. तो आणि त्याच्याकडून शिकून त्याचे सवंगडी "हॅल्लो डार्लिंग, हॅल्लो डार्लिंग' अशा हाका मारत लोकांना चक्रावून टाकतात. डोंगरी मैना तऱ्हे तऱ्हेचे आवाज काढण्यात पटाईत आहे. सगळ्याच मैना एकसारखे धोक्‍याची सूचना देणारे चित्कार काढतात. हंऽऽ हंऽऽ गुणगुणत एकमेकांच्या संपर्कात राहतात. पण या पलीकडे जाऊन डोंगरी मैना वेगवेगळ्या सुरेल बोलांनी सतत संवाद साधत असतात. हे बोल उपजत नसतात. प्रत्येक मैना आपल्या आई-बापांची, शेजाऱ्या-पाजाऱ्यांची नक्कल करत स्वतःचा एक विशिष्ट दहा-बारा बोलांचा संच निर्माण करते. डोंगरी मैनांची जोडी जन्मभर टिकते, पण त्यांचे प्रेम जुळण्याआधीच त्यांनी बोल जुळवलेले असतात; त्यामुळे ते साधारणतः वेगवेगळे असतात. जणू काय नराचा एकगौडी रागातला"सागमग, मगरेसा, मपनीनीसा' असा काही स्वरावली संग्रह आहे आणि मादीचा मियामल्हा रातला"मरेसा, रेंनीसा, मपधनी'असा काही वेगळाच स्वरावली संग्रह आहे. हे बोल बऱ्याच प्रमाणात शेजाऱ्यांकडून शिकले असल्यामुळे शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या संग्रहांत खूप साधर्म्य असते. कोणकोणते विशिष्ट बोल वापरले जात आहेत यावरून आणि प्रत्येकाच्या आवाजातल्या वैशिष्ट्यांवरून डोंगरी मैना आपल्या जोडीदाराचे, प्रत्येक शेजाऱ्याचे नानाविध बोल पक्के ओळखतात. यातून खुलणाऱ्या सुख-संवादांसाठी डोंगरी मैनांना जी निसर्ग दत्त वाणीची, शिकून घेण्याची देणगी लाभली आहे, तिचाच उपयोग आपण आपल्या मनोरंजनासाठी करून घेतो. यासाठी मोठ्या प्रमाणावर घरट्यांतून पिल्ले पकडली जातात.
डोंगरी मैनांची संख्या सातत्याने घटत आलेली आहे, यामागे हा व्यापार हे एक महत्त्वाचे कारण आहेच, पण त्याहूनही महत्त्वाचे कारण आहे वनांचा आणि त्यातल्या
वैविध्याचा विध्वंस. ऋग्वेदात अरण्यदेवीचे एक सूक्त आहे: वनपुष्पांच्या सुरभीने गंधित, नांगरल्याविन बहुअन्न। पशु-पक्ष्यांची तू तर माता,अरण्यदेवी तुला वंदितो || वंदे मातरम्‌गीतात भारतमातेचे वर्णन आहे "फुल्लकुसुमि तद्रुमदलशोभिनी' ंनी लगडलेल्या झाडांनी नटवलेली . इसवी सन अठराशेच्या आरंभी इंग्रजांनी भारताचे वर्णन केले होते: एक वृक्षांचा महासागर. पुढच्या दोनशे वर्षांत व्यापारी फायद्यासाठी या फुलाफळांनी संपन्न वनराजीचा विध्वंस केला गेला आहे, सागवान - ऑस्ट्रेलियन अकेशियासारखी वन्यजीवांना पूर्ण निरुपयोगी झाडे फैलावली आहेत. पण लोकांना पुन्हा एकदा नांगरल्याविना बहुअन्ना वनराजी हवी आहे. आज सामूहिक वनसंपत्तीवर अधिकार मिळालेल्या ग्रामसभांनी त्यांच्या व्यवस्थापन आराखड्यांत जी त्यांना फुला-फळांसाठी मुद्दाम राखून ठेवायची आहेत त्या झाडांच्या मोहा, आवळा, टेंबरू, खिरणी, चारोळी, काटबोर, बेल, कवठ, जांभूळ, चिंच, रानआंबा, रानकेळी इत्यादी अशा पस्तीस - चाळीस जातींच्या लांबलचक याद्या बनवल्या आहेत. शाश्वत उपयोग व पुनरुज्जीवन ही उद्दिष्टे डोळ्यांसमोर ठेवून या वनसंपत्तीच्या व्यवस्थापनाचे नियम बनवले आहेत.
स्वयंस्फूर्तीने दोन-दोनशे हेक्‍टर क्षेत्राच्या नवनिर्मित देवराया प्रस्थापित केल्या आहेत. आपण वनाधिकार कायद्याची न्यायबुद्धीने, सचोटीने अंमलबजावणी केली, तर भारताच्या वनप्रदेशांचा स्वित्झर्लंड बनू शकेल. स्वित्झर्लंडची विपुल वनराजी केवळ गेल्या दीडशे वर्षांत फोफावलेली आहे. त्यापूर्वी स्वित्झर्लंडचे केवळ चार टक्के वनावरण शिल्लक होते. तेव्हा लोकजागृती होऊन त्या देशाने पुन्हा जंगल वाढवले. महत्त्वाचे म्हणजे हे सारे जंगल गावसमाजांच्या मालकीचे आहे, कोणत्या ही सरकारी खात्याच्या नाही.
भारतभूमी पुन्हा एकदा एकही वृक्ष न तोडता जीवनसत्त्वयुक्त पौष्टिक आहार पुरवणारी आणि डोंगरी मैनांसारख्या असंख्य मनमोहक पशु-पक्ष्यांची माता बनवायची सुवर्णसंधी आज आपल्या पुढे आहे.

 

Web Title: madhav gadgil writes about dongari maina