ह्या नच मुंग्या, हीच माणसे

ant
ant

आसामचे ब्रह्मपुत्रेचे खोरे, त्याभोवती फेर धरलेल्या सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मिझोराम, नागालॅंड, मेघालय आणि त्रिपुरा या सात मनोहारी अप्सरा आणि त्याला खेटून असलेला म्यानमार, लाओस, थायलंड, व्हिएतनाम हा सारा डोंगराळ, वनाच्छादित मुलुख जैववैविध्याने नटलेला-थटलेला प्रदेश आहे. इथे सातत्याने नव्या- नव्या जीवजाती सापडत असतात; किड्या-मकोड्यांच्या तर अगणित, पण पशू-पक्ष्यांच्यासुद्धा. गेल्या पंधरा वर्षांतच अरुणाचल प्रदेशात पक्ष्यांपैकी सातभाईंच्या एका छोट्या भावंडाची, लिओकिच्लाची एक आणि लालतोंड्या माकडाची एक नवी जात सापडली. व्हिएतनामच्या ट्रुओंग सोन पर्वतराजीत हरणांमधल्या भेकरांची एक नवी जात सापडली. हा सारा मुलुख आग्नेय आशियाच्या व भारताच्या संस्कृतींचा एक मनमोहक मिलाफ आहे. मणिपूरचे आकर्षक लाइहरोबा संघनृत्य हे आग्नेय आशियाई संस्कृतीचा आविष्कार आहे, तर भारतभर विख्यात मणिपुरी नृत्य ही राधा-कृष्णांची रासलीला आहे. डोंगराळ, वनाच्छादित असल्यामुळे हा प्रदेश निसर्गाने संपन्न आहे, पण त्याबरोबरच इथे अगदी अलीकडेपर्यंत दळणवळणाच्या सुविधा अतिशय मर्यादित असल्याने इथल्या जमातींत परस्परांशी देवाण-घेवाणीचे संबंध, सलोखा प्रस्थापित झाला नव्हता.

जगातल्या दहा लाख प्राणीजातींतल्या मुंग्या, वाळव्या, मधमाश्‍या, सातभाईंसारखे काही पक्षी, लांडगे, माकडे अशा अवघ्या पंचवीस हजार जाती समाजप्रिय आहेत. पण या मूठभर संघप्रिय पशूंनी आज जगावर कुरघोडी केली आहे. अशा समाजप्रिय पशूंच्या आचरणाला खूप पदर असतात, अनेक परस्परविरोधी प्रवृत्ती एकत्र नांदत असतात. एकांडे प्राणी मुंग्यांप्रमाणे निःस्वार्थीपणे आपल्या बंधू-भगिनींची सेवा करत नाहीत, आपणहून ब्रह्मचर्य पत्करत नाहीत. पण ते अटीतटीने नाही तर हात राखून भांडतात, आपल्याच जातीच्या इतर कीटकांची निर्घृण हत्या करत नाहीत. उलट मुंग्या, मधमाश्‍यांचे मोठ-मोठे संघ आपापले टापू सांभाळत, आपल्या शेजाऱ्यांशी सतत भांडत-तंडत असतात. प्रत्येक समूहाची एक राणी मुंगी आई, बाकी सगळ्या कामकरी, लष्करी मुंग्या एकमेकींच्या आजन्म ब्रह्मचारी बहिणी-बहिणी. सगळ्यांनी मिळून अन्न चावून चावून एकमेकींना भरवायचे. शिवाय राणीचे मुद्दाम पाझरलेले रस चाटत राहायचे. यातून प्रत्येक परिवाराचा विशिष्ट गंध साकारतो. आपला तो सुगंध आणि परक्‍या परिवारांचे झाडून सारे दुर्गंध. कोणी मुंगी भेटली की तिला हुंगायची, आपल्या साऱ्या भगिनी सुगंधा. दुर्गंधी असली तर ती आहे आपली हाडवैरीण. शक्‍य तो परक्‍यांना आपल्या टापूतून हाकलून द्यायचे, जमेल तेव्हा तेव्हा त्यांचा मुलूख काबीज करायचा, त्यासाठी "आम्ही मुंगळ्यांच्या पोरी नाही भिणार मरणाला' अशी शर्थीची लढाई करायची, बेदरकारपणे परक्‍यांची हत्या करायची, त्यासाठी जरूर तर आपली प्राणाहुती द्यायची. जसा संग्राम पेटतो तशा मुंग्या एकमेकींवर चढून आपल्या करवतीसारख्या जबड्यांनी शत्रूचे वेगवेगळे अवयव तोडायला लागतात. कवच नसलेल्या भागांना दंश करून विषाचा मारा करतात. म्हणून समाजप्रिय पशूंत जसा निस्सीम स्वार्थत्याग दिसतो, तसाच आत्यंतिक स्वार्थही, जिवापाड प्रेम, माया-ममता, तसेच अंगावर शहारे आणणारे क्रौर्यही.

मर्ढेकरांची एक कविता आहे : ह्या नच मुंग्या हीच माणसें. मुंग्यांची हिंस्र प्रवृत्ती हा संघप्रिय मानवाचाही एक वारसा आहे. मानवी टोळक्‍या-टोळक्‍यांत मुंग्यांसारखेच जीवघेणे संघर्ष सुमारे बारा हजार वर्षांपासून सुरू झाले असावेत, कारण या काळानंतर हिंसाचारात कवट्या फुटलेल्या मानवांचे अवशेष मोठ्या प्रमाणात सापडू लागतात. असेच जमाती-जमातींतील रक्तलांच्छित संघर्ष ईशान्य भारत आणि त्याला लागून असलेल्या आग्नेय आशियात अगदी आजतागायत चालू राहिले आहेत. शत्रू समाजावर हल्ले करून त्यांची मुंडकी कापून आणणे हे शौर्याचे लक्षण होते. मी मिझोराम-मणिपुरात नागा योद्‌ध्यांची घरे पहिली, त्यांच्या प्रवेशद्वारापाशी ज्यांवर शत्रूंची कापून आणलेली मुंडकी अभिमानाने ठोकून लावली जायची अशा खुंट्या पाहिल्या. अजूनही नागा-कुकी जमातींतले असे संघर्ष संपलेले नाहीत. पंचवीस वर्षांपूर्वी मी नटबर श्‍याम हेमाम या स्थानिक मणिपुरी विद्यार्थ्याबरोबर मणिपूरच्या चुराचांदपूरच्या डोंगरात कुकी समाजाच्या सैचांग नावाच्या गावाचा अभ्यास केला. हे गाव 1955 च्या सुमारास पूर्णपणे ख्रिस्ती धर्माचे बनलेले होते. धर्मांतरापूर्वी या मुलखात जवळपास एक-पंचमांश भूभाग, जलभाग देवराया, देवडोह म्हणून पूर्णपणे नैसर्गिक आवरणाखाली राखून ठेवलेला होता. धर्मांतरानंतर पारंपरिक निसर्गपूजा बंद केली पाहिजे म्हणून सगळ्या देवराया तोडल्या गेल्या. पण या देवराया अनेक दृष्टींनी मोलाच्या होत्या, विशेषत: त्यांच्यामुळे फिरस्ती शेती करताना लावलेल्या आगी पसरत नव्हत्या, असे काही वर्षांतच ध्यानात आले. मग त्यातील काहींची पुनःस्थापना करण्यात आली. सैचांगला देवराईच्या एका कडबोळ्याने वेढले होते. या इतिहासाचा अभ्यास करायला नटबर आणि मी सैचांगला जाऊन राहिलो होतो. निसर्गरम्य प्रदेश; खूप खुषीत राहिलो. मग पंधरा वर्षांनी पुन्हा मणिपूरला गेलो. नटबरला म्हणालो, "चल, सैचांगला जाऊ या.' धक्काच बसला. सैचांगवर नागांचा जोरकस हल्ला झाला. अनेक लोक मारले गेले. सारा गाव, सारी शेती, बागायती भाग जाळून बेचिराख करण्यात आला. जे जगले-वाचले ते गाव सोडून पळून गेले. आता तो मुलूख उजाड होता. शत्रुसमाजावर नुसता हल्ला करायचा नाही, तर त्यांना पराभूत केल्यावर त्यांचा मुलूख पुरा बेचिराख करून त्यांना देशोधडीला लावायचे असे डावपेच पुरातन काळापासून प्रचलित आहेत. अजूनही या साऱ्या निसर्गरम्य, विलोभनीय प्रदेशात असे हिंसाचार चालू आहेत ही मानवतेची व्यथाकथा आहे. आज गाजत असलेले रोहिंग्या प्रकरण हा याचाच एक आविष्कार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com