
शब्द, रस, रूप, गंध, स्पर्श या साऱ्यांचे नानाविध अनुभव घेताना झालेल्या फलप्रद प्रवासातील काही आठवणी; एका वैविध्यप्रेमी आनंदयात्रीच्या लेखणीतून उतरलेल्या.
विशेष : किती खुशीत खाल्ली रानफुले, रानफळे
शब्द, रस, रूप, गंध, स्पर्श या साऱ्यांचे नानाविध अनुभव घेताना झालेल्या फलप्रद प्रवासातील काही आठवणी; एका वैविध्यप्रेमी आनंदयात्रीच्या लेखणीतून उतरलेल्या. या प्रवासात लेखकाला खूपसे खुशीचे, तर काही नाखुशीचेही अनुभव आले. त्यातील रानातील मेव्याच्या रसग्रहणाचे काही संस्मरणीय अनुभव.
देवरायांवर १९७३ मध्ये ‘सकाळ’मध्ये मी एक लेख लिहिला होता; त्यानंतरच्या अर्धशतकाच्या मनमुराद भटकंतीचा, समाजाच्या सर्व थरांतील लोकांशी मैत्री करण्याचा फलप्रद प्रवास पूर्ण झालाय. मनात आले की, या सुमुहूर्तावर माझ्या खुशीच्या अनुभवांबद्दल एक लेख लिहावा. असे अगणित अनुभव आहेत. मग कशाबद्दल लिहायचे? फलप्रद शब्दावरून सुचले की मिटक्या मारत खाल्लेल्या फुला-फळांबद्दल लिहावे. अशीही शे-सव्वाशे असतील. मग त्यातली सहा निवडली, मनात ठासून राहिलेली रानच्या मेव्यांतली. यात अग्रक्रमाने घ्यावीशी वाटतात मोहाची फुले.
महाराष्ट्राच्या गोंडवनातील गोंड, बस्तरमधील बैगा अशा आदिवासी समाजांसाठी मोह हा पवित्र वृक्ष आहे. त्याची मांसल पाकळ्यांची साखर ठेचून भरलेली फुले माणसांसाठी, गुरांसाठी रुचकर, पौष्टिक खाद्य आहेत. या फुलांपासून दारू, गोडाचे लाडू बनवतात. मोहाच्या बियांपासून तेल काढतात. गोंड वस्त्यांच्या सभोवतालच्या अरण्यात, शेतांत, गावठाणात मोहाचे मोठमोठे वृक्ष सगळीकडे आढळतात. यातल्या गडचिरोलीतल्या मेंढा(लेखा) गावात मी ३० वर्षांपासून त्यांच्या वनसंपत्तीच्या अभ्यासात मदत करतोय. त्या निसर्गरम्य मुलखात दिवसेंदिवस मुक्काम करतो. सकाळी एका मोहतरुच्या छायेत सगळ्यांसोबत नाश्ता करतो. मोहाला फुले येण्याच्या दिवसांत मोहाची गोडगोड फुले वरून टपकत राहतात. पोहे-चहा नंतर ती ताजी, ताजी फुले खायची एक और खुमारी असते.
आपल्या नद्यांवर महाराष्ट्राने अपरंपार प्रेम केले आहे. गोदा, भीमा, कृष्णा यांच्या घाटमाथ्यावरील उगमस्थानांपाशी त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर आणि महाबळेश्वरांचे अधिष्ठान मांडून, तिथे देवराया राखून जपले आहे. नव्या जमान्यात गुप्तभीमेच्या देवराईच्या आसमंतात भीमाशंकर अभयारण्य घोषित केले आहे, ह्यातला भीमाशंकर अभयारण्याच्या दक्षिणेचा पट्टा एनर्कॉन कंपनीच्या पवनचक्क्यांना बहाल केला आहे. ह्याबाबत तिथल्या फॉरेस्ट रेंजरने प्रामाणिकपणे म्हटले की, हा सदाहरित वनाच्छादित टापू आहे, तो पर्यावरणाचा समतोल राखतो, येथे दुर्मिळ शेकरू खार, लांडगा, कोल्हा, तरस, मोर, बिबट्या आढळतात, प्रकल्पांतर्गत रस्त्यांमुळे सदाहरित जंगलास हानी पोचेल.
हा अहवाल दडपून वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी इथे सदाहरित वन नाही, काहीही महत्त्वाचे वन्य जीव नाहीत, असे धादांत खोटे-नाटे निवेदन करत पवनचक्क्यांना परवानगी दिली. याच्या पडताळणीसाठी पश्चिम घाट परिसर तज्ञ गटाच्या वतीने मी तिथल्या महादेव कोळ्यांच्या खरपूड गावातल्या प्राथमिक शाळेत चार दिवस राहून पहाणी केली, तेव्हा फॉरेस्ट रेंजरची माहिती खरी होती हे स्पष्ट झाले. आपल्या सह्याद्रीवर जिकडे तिकडे ‘जाळीमंदी पिकली करवंदं’ खायला मिळतात.
पण जन्मजात खवय्या असलेल्या मला खरपूडच्या मुक्कामाचा एक अनपेक्षित लाभ झाला. ऐकले की तिथून चार किलोमीटरवर एका २०० मीटरच्या टप्प्यात ज्या करवंदाच्या जाळ्या आहेत, त्यांच्या टपोऱ्या आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे बिनबियांच्या करवंदांसारखी रुचकर करवंदे कोठेच नाहीत. ते करवंदाचे दिवस होते, तेव्हा लगेच तिकडे मोर्चा वळवला आणि खरेच लहानपणापासून रानावनात मनमुराद करवंदं खात आलेलो होतो तरी ह्या बिनबियांच्या रसाळ, दळदार करवंदांची एक अनोखी लज्जत होती. तासभर रेंगाळत भरपूर खाल्ली.
काटदरे हिरव्या तळकोंकणाचे गुणगान गातात : “नीललोचना कोंकणगौरी घालुनि चैत्रांगणी, हिंदोळय़ावर बसविती जेव्हा अंबा शुभदायिनी, हळदीकुंकू तदा वटिता नसे प्रसादा उणे, पिकली म्हणूनी रानोरानी करवंदे तोरणे.” गोवा विद्यापीठाच्या ताळगावाच्या पठारावरच्या आवारात यातल्या तोरणांच्या चिक्कार जाळ्या आहेत. पठारावरचे विस्थापित आता खालच्या गावात राहतात. तिथल्या मुली विद्यापीठाच्या आवारात येऊन त्या काटेरी झुडपांतून मोठ्या शिताफीने भराभर तोरणे खुडून ती विकायला नेतात.
मला हे बिलकुलच जमत नसे. एकदा मी हळूहळू एकेक फळ तोंडात टाकत असताना त्या मुली येऊन आसपासच्या झुडपातून भराभर खुडू लागल्या. एका झुडपात वरच्या बाजूला लाल मुंगळ्यांचे घरटे होते. मी त्या मुलींकडे कौतुकाने बघत बघत जेव्हा तिथली तोरणे खुडायला लागलो तेव्हा रागावलेल्या मुंगळ्यांनी माझ्या टकलावर उडी मारून हल्ला केला. त्या मुलींना हसू आवरेना. मुंगळ्यांच्या डंखानी माझा मेंदू उत्तेजित झाला असावा. त्यामुळे मी मुंगळे साफ करून दुसऱ्या झुडपाशी जाऊन सावकाश खुडून खाल्लेल्या तोरणांची गोडी अवीट होती!
विदर्भातल्या वाशिम जिल्ह्यातल्या अडाण नदीवर एक धरण बांधलेले आहे. त्या परिसरात माझा विद्यार्थी निलेश हेडा माशांवर आणि मच्छिमारांवर संशोधन करत होता. त्याच्याबरोबर त्या भागाची टेहळणी करायला गेलो होतो. सकाळी लवकर निघून धरणाच्या कडेकडेने भटकंती सुरू केली. अंदाजापेक्षा खूपच वेळ लागला आणि सूर्य डोक्यावर येईपर्यंत सडकून भूक लागली तरी चालणे संपले नव्हते. पण आमचे नशीब बलवत्तर, कारण त्याच वेळी बोरीच्या झाडांचा एक भला मोठा पट्टा भेटला. आपल्या बोरी, बाभळी, करवंदाच्या काटेरी महाराष्ट्रात मी जागोजागी बोरे खाल्ली आहेत, पण इथली बोरे खास टपोरी, रसरशीत आणि स्वादिष्ट होती, त्यांचा फराळ करत भूक शमवताना एक अप्रूप आनंद झाला.
अनेक ईशान्य भारतीय समाज आग्नेय आशियातल्या भाषांच्या गणगोतातल्या भाषा बोलतात. पण त्या बाहेर फक्त महाराष्ट्रात मेळघाटात आणि मध्य प्रदेशात पचमढीला राहणारे कोरकू यातलीच भाषा बोलतात. माझा मानवशास्त्रज्ञ मित्र कैलाश मलहोत्रा आणि मी त्यांची पचमढीची वस्ती शोधत होतो. वाटेत एक डोक्यावर रानातल्या आंब्यांची पाटी घेतलेली महिला भेटली. विचारले तर म्हणाली की आणखी चार किलोमीटर पायपीट करून विकायचे होते. ते रसाळ रायवळ आंबे पाहून आमच्या तोंडाला पाणी सुटले. तिने मोठ्या खुशीने पाटीभर १०० आंबे तीन रुपयांना विकले आणि आम्हाला तिच्या कोरकू वस्तीकडे घेऊन निघाली. पोचायला दीड तास लागला. तोवर आम्ही ते आंबे चोखून चोखून फस्त केले. हापूस-पायरीच्या तोंडात मारेल असा त्यांचा स्वाद, त्यांची रुची होती, आठवण आली की अजून तोंडात घोळते.
माझा विद्यार्थी हंसराज नेगी एक खास वल्ली होती. तो हिमाचलातील तिबेटाला चिकटून असलेल्या किन्नौर जिल्ह्यातल्या किन्नौरा जमातीत जन्माला होता. त्याचे वडील सरकारी नोकरीत होते आणि तो चंदीगडला शिकला होता. पण त्याचे आजोबा मेंढपाळ होते; हिवाळ्यात किन्नौरमध्ये रहायचे आणि उन्हाळ्यात मेंढ्या आणि विकायचा माल घेऊन तिबेटात जायचे. हंसराज पण असाच मोकाट वृत्तीचा, खुल्या दिलाचा होता. माझे इतर विद्यार्थी पश्चिम घाटाच्या वेगवेगळ्या भागात संशोधन करायचे; पण हंसराज म्हणाला की त्याला हिमालयाची जबरदस्त ओढ आहे.
मग आम्ही जीवसृष्टीच्या दगड्फुले, सपुष्प वनस्पती, मुंग्या अशा वेगवेगळ्या घटकांच्या वैविध्याच्या पातळीचा काय परस्पर संबंध असतो यावर नंदादेवीच्या परिसरात संशोधन करायचे ठरवले. त्याच्या कामाच्या सुरुवातीला दोन आठवडे त्याच्याबरोबर घालवले. ते दसऱ्याचे दिवस होते. तो त्याच्या किन्नौरहून त्यांच्या रानाचा खास मेवा चिलगोजे घेऊन आला. या देवदाराच्या कुळातील चिलगोजाचे वृक्ष तिथल्या सामुदायिक ग्रामवनांच्यात मुद्दाम राखून ठेवलेले आहेत. चिलगोजांच्या बियांना सुकामेवा म्हणून भरपूर मागणी आहे. दसऱ्याला एक ‘चिलगोजा उत्सव’ साजरा करत गावकरी हा मेवा सगळे मिळून गोळा करतात आणि त्याचा पैसा आपापसात वाटून घेतात. काजू, बदाम, पिस्ते परिचयाचे आहेत. पण चिलगोजे क्वचितच खाल्ले होते. ते खुमासदार चिलगोजे तोंडात टाकत नंदादेवीचे शिखर पहात काम करण्यात दोन आठवडे मोठ्या मजेत गेले.
(लेखक ज्येष्ठ शास्त्रज्ञ आहेत.)