मध्य प्रदेश प्रचार समाप्त (अग्रलेख)

file photo
file photo

‘प्रचारमोहीम म्हणजे जनतेचे प्रबोधन करण्याची एक संधी’ हे तत्त्व आता पूर्णपणे कालबाह्य झाले आहे, हेच मध्य प्रदेशातील प्रचाराच्या पातळीवरून लक्षात येते. भावनांना हात घालण्याच्या भाजपच्या व्यूहनीतीचे अनुकरण काँग्रेसही करीत आहे.

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकांचा प्रचार संपण्यास अवघे २४ तास राहिले असताना, अयोध्येतील ‘राममंदिरा’च्या मुद्द्यावर मौन पाळणाऱ्या मोदी यांनी मंदिर उभारणीस काँग्रेसमुळेच विलंब झाल्याचा गंभीर आरोप करत गेल्या काही दिवसांपासून देशात सुरू असलेल्या ‘रामायणा’त आपणही सहभागी होत असल्याचे दाखवून दिले आहे. अशीच व्यूहनीती त्यांनी दीड वर्षापूर्वी उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत वापरली होती. त्या निवडणुका शेवटच्या टप्प्यात आलेल्या असताना तोपावेतो विकासाचा मुद्दा प्रचारात अग्रभागी ठेवणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक ‘दिवाळी आणि ईद’ तसेच ‘समशान आणि कबरस्तान’ असे मुद्दे उपस्थित करून ध्रुवीकरण साधले होते. आताही पुन्हा त्यांनी अस्मिताबाजीचा आधार घेण्यास सुरवात केली आहे. देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचारमोहिमेतील मध्य प्रदेश तसेच मिझोराम या दोन राज्यांतील प्रचाराच्या गदारोळावर सोमवारी सायंकाळी पडदा पडला, तेव्हा हा प्रचार किती खालच्या पातळीवरून केला गेला, त्याच्याच आठवणी बाकी उरल्या. मध्य प्रदेशातील २३० आणि मिझोराममधील ४० जागांसाठी उद्या, बुधवारी एकाच टप्प्यात मतदान होत असून, आता फक्‍त राजस्थान तसेच तेलंगणा या दोन राज्यांतील मतदान बाकी आहे.
मध्य प्रदेशात गेली १५ वर्षे भारतीय जनता पक्षाची सत्ता असून, प्रस्थापित विरोधी लाटेच्या जोरावर ती सत्ता हस्तगत करण्यासाठी काँग्रेसने काहीही करणे बाकी ठेवलेले नाही! त्यातील सर्वांत प्रमुख बाब म्हणजे भाजपइतकीच आपल्यालाही गोमातेचे माहात्म्य मान्य आहे, हे दाखवून देण्याचा केलेला आटापिटा! खरे म्हणजे शिवराजसिंग चौहान सरकारच्या कारभारातील ‘व्यापमं’सारखे अनेक गैरव्यवहार, कारभारातील चुका आदी मुद्दे काँग्रेसच्या भात्यात होते. पण काँग्रेसच्या मध्य प्रदेश जाहीरनाम्यात गोरक्षणापासून अनेक मुद्द्यांची भाजपच्या जाहीरनाम्यातून केलेली उचलेगिरी स्पष्ट दिसत आहे! त्यामुळेच केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी काँग्रेस ‘गाईचे शेपूट धरून फरफटत जात आहे!’ अशी मार्मिक टिप्पणीही प्रचारात केली आणि टाळ्या घेतल्या. शिवाय, दस्तुरखुद्द राहुल गांधी हेही आपण हिंदुत्ववादात कमी नाहीत, हे दाखवण्यासाठी भगवान शंकराच्या मंदिराचे उंबरठे गावोगाव झिजवत आहेत. मात्र, या सर्वांपेक्षा कहर केला तो राजस्थानचे मुख्यमंत्री बनण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या सी. पी. जोशी यांनी! त्यांनी मोदी तसेच उमा भारती यांच्या जातींचा उल्लेख करून, ‘ते दोघे हिदुत्वाबद्दल बोलण्यास पात्र नाहीत, एवढेच नव्हे तर ते हिंदूच नव्हेत!’ असे जाज्वल्य उद्‌गार काढल्यामुळे सर्वांनाच गुजरात विधानसभा प्रचारात मणिशंकर अय्यर यांच्या मोदी हे ‘नीच’ जातीचे आहेत, या वक्‍तव्याची आठवण झाली. अय्यर यांच्या याच एका विधानामुळे हातातोंडाशी आलेल्या गुजरातचा घास काँग्रेसच्या हातातून निसटला होता, असे सांगण्यात येते. जोशी यांच्या या विधानामुळे भाजपच्या हाती आयतेच कोलीत आले असून, शिवाय त्यामुळे मध्य प्रदेश तसेच राजस्थानातही गुजरातची पुनरावृत्ती होते काय, या भीतीपोटी काँग्रेस नेत्यांच्या पोटात गोळा आला आहे. त्या आधी राज बब्बर यांनीही डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या होत असलेल्या घसरणीचा बादरायण संबंध थेट मोदी यांच्या आईच्या वयाशी जोडून वादळ उठवले होतेच.

अर्थात, भाजप नेतेही अशा प्रकारच्या खोट्या प्रचारात मागे नाहीत. काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद नेहरू-गांधी घराण्यापलीकडे जात नाही, असा धादान्त खोटा आरोप खुद्द मोदी यांनी केला आणि पी. चिदंबरम यांनी लगेचच स्वातंत्र्यानंतर या घराण्याबाहेरील १७ काँग्रेस अध्यक्षांची नावे जाहीर केली! भोपाळमध्ये बोलताना मोदी हे वारंवार तेथील गॅस दुर्घटनेतील आरोपी अँडरसन याचा उल्लेख करत होते. मात्र, अँडरसनचे वकीलपत्र अरुण जेटली यांनीच घेतलेले होते, याकडे त्यांनी तेव्हा सोयीस्कर दुर्लक्ष केले. आरोप-प्रत्यारोपांच्या या गदारोळात कोणताच पक्ष मागे नसल्यामुळे आपण सत्तेवर असताना जनहितासाठी नेमके काय केले किंवा सत्तेवर आल्यास नेमके काय करू, हे कोणीच सांगत नाही.

भाजपकडे सांगण्यासारखे काही नाही आणि काँग्रेस पक्ष पूर्णपणे गोंधळलेला असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता मतदानाच्या वेळी मध्य प्रदेश असो की मिझोराम, येथील मतदारांना स्वत:च सारासार बुद्धीने विचार करून मतदान करावे लागणार आहे. एका अर्थाने ही चांगलीच बाब आहे. डॉ. राममनोहर लोहिया हे प्रचारमोहीम म्हणजे जनतेचे प्रबोधन करण्याची एक संधी असते, असे म्हणत. आता त्याऐवजी प्रतिपक्षाची उणी-दुणी काढणे, म्हणजेच स्वपक्षाचा प्रचार असे समजू जाऊ लागले आहे. त्यामुळे प्रचाराची पातळी अगदीच खालच्या स्तराला गेली, तरी त्याची पर्वा ही कोणालाच उरलेली नाही. शिवाय, गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेले रामगीत गायन हे आपल्याला तारून नेईल, असे भाजप नेत्यांना वाटत आहे आणि त्यामुळेच राममंदिर हे काँग्रेसच बांधू शकते, हे सांगण्यापर्यंत काँग्रेसजनांची मजल गेली. आता या अशा प्रचाराचा फटका नेमका कोणाला बसतो, हे समजण्यासाठी आपल्याला ११ डिसेंबरपर्यंत वाट बघावी लागणार आहे!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com