महाराज भूमिबल अतुल्यतेज (वुई द सोशल)

महाराज भूमिबल अतुल्यतेज (वुई द सोशल)

थायलंडची राजधानी बॅंकॉकच्या राजप्रासादासमोर शनिवारी रात्री दोन लाख थाई (सयामी) जनतेने दिवंगत राजे भूमिबोल अडुल्यडेज यांना श्रद्धांजली म्हणून राष्ट्रगीताचे सामूहिक गायन केले. अशा अद्‌भुत व ऐतिहासिक श्रद्धांजलीचे कारण म्हणजे भूमिबोल अडुल्यडेज हे ९ जून १९४६ ते १३ ऑक्‍टोबर २०१६ अशी तब्बल सत्तर वर्षे, जगात सर्वाधिक काळ सिंहासनावर विराजमान राहिलेले बहुचर्चित राजे होते. थायलंडमध्ये राजेशाहीच्या आधीन असलेली लोकशाही आहे. तशी ती म्हणायलाच; कारण, राजे अडुल्यडेज यांच्या कारकिर्दीत तब्बल ३७ पंतप्रधान झाले. अनेक लष्करी उठाव झाले. राजकीय अस्थिरता कायमच राहिली. तरीदेखील देश अखंड राहिला व प्रगतही बनला. त्याचे कारण, ६ कोटी ७० लाखांवरील सामान्य थाई जनता राजावर प्रचंड प्रेम करायची. आदरापोटी त्यांना बुद्धाचा अवतार, राष्ट्रपिता मानायची.

आपल्या मणिपूरपासून म्यानमारमार्गे थायलंडच्या टाक प्रांतापर्यंत जाणारा आंतरराष्ट्रीय महामार्ग तयार होतोय; पण या भौतिक अनुबंधापेक्षा दोन्ही देशांमधील सांस्कृतिक ऋणानुबंध अत्यंत प्राचीन आहेत. रामायणाची सयामी आवृत्ती अनेकांना माहिती आहेच. ९५ टक्‍के थाई जनता बौद्धधर्मीय. सम्राट अशोकाच्या पुढाकाराने थायलंडमध्ये धम्माचा प्रसार झाला. म्हणूनच संस्कृत व पाली भाषेचा थायलंडच्या भाषिक संस्कृतीवर प्रचंड पगडा. अनेक शब्द तत्सम म्हणजे या भाषांमधून घेतलेले. इतकेच कशाला राजे भूमिबोल अडुल्यडेज हे नावच मुळी महाराज भूमिबल अतुल्यतेज या अस्सल भारतीय नावाचा भ्रंश आहे. १७८२ पासून थायलंडवर राज्य करणाऱ्या चक्री राजघराण्यातले ते नववे राजे. घराण्याचे राजचिन्ह सुदर्शन चक्र व त्रिशूल ही अनुक्रमे विष्णू व शंकराची आयुधे. राजाला राम म्हणण्याची प्रथा. भूमिबल अतुल्यतेज हे नववे राम. राजपुत्र महिडोल अतुल्यतेज हे त्यांचे वडील. आईचे नाव श्रीनगरिंद्रा. काकाचे नाव वजीरयुद्ध. गादीवर येण्यापूर्वीच वडिलाचे निधन झाले. भूमिबल सर्वांत धाकटे अपत्य. सातवे राम प्रजाधिपोक यांच्यानंतर थोरला भाऊ आनंदा महिडोल आठवा राम म्हणून गादीवर आला; पण विसाव्या वर्षीच त्याचा गोळी लागून मृत्यू झाला. राजगादी भूमिबल यांच्याकडे आली. महाराणीचे नाव सिरिकिट कित्यकारा. दांपत्याला चार अपत्ये. दहावे राम बनतील ते राजपुत्र महा वजिरालोंगकोर्न; तसेच उबोलरत्न राजकन्या, महा चक्री श्रीधोरण व चुलाभोर्न वलाईलाक या तीन मुली.

गेले काही महिने महाराज अडुल्यडेज आजारी होते. ते बरे व्हावेत म्हणून सोशल मीडियाच्या ‘वॉल’ दीर्घायुष्य व आरोग्याचे प्रतीक असणाऱ्या गुलाबी व पिवळ्या रंगाने व्यापल्या होत्या. तशाच रंगाच्या वेषामध्ये राजवाड्यासमोर प्रार्थना करणाऱ्यांची संख्याही लाखोंच्या घरात असायची. गेल्या गुरुवारी, १३ ऑक्‍टोबरला ‘किंग भूमिबोल अडुल्यडेज’ यांच्या निधनाची घोषणा राजवाड्यातून झाल्यानंतर थाई जनता शोकसागरात बुडाली. ‘गॉन, बट नॉट फरगॉटन’, अशा आशयाच्या श्रद्धांजलींचा सोशल मीडियावर महापूर आला. कुणी आकाशातल्या ताऱ्यांमध्ये लाडक्‍या राजाचा चेहरा रेखाटला. अनंताच्या प्रवासाला निघून गेलेले राजे एका लहान सयामी मुलाला आशीर्वाद देत असल्याचे चित्र ‘ट्‌विटर’वर ‘व्हायरल’ झाले. ‘बॅंकॉक पोस्ट’सह अनेक दूरचित्रवाहिन्यांनी कृष्णधवल पडद्याच्या रूपाने दिवंगत राजाचे स्मरण केले. एरव्ही पाच रंगात झळाळणारा गुगलचा लोगोही थायलंडमध्ये एकाच म्हणजे काळ्या रंगात ठेवला गेला. राजे अडुल्यडेज हे नववे राम. म्हणून तो ९ आकडा अनेकांनी आदर व्यक्‍त करण्यासाठी वापरला. एका आघाडीच्या अभिनेत्रीने महाराज अडुल्यडेज हे मुलगी राजकन्या उबोलरत्न राजकन्या यांचे लाड करतानाचे रेखाटन आपल्या ‘वॉल’वर ठेवले. तरीदेखील अडुल्यडेज हे अखेरीस राजेच. त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल, राजेशाही थाटाबद्दल कुचाळक्‍या करणारे असणारच. त्याच कारणाने त्यांची तीनही चरित्रे थायलंडमध्ये विकली जात नाहीत. पहिल्या चरित्रावर अघोषित तर दोन चरित्रांवर अधिकृत बंदी आहे. राजाच्या निधनानंतर ऑस्ट्रेलियातील ‘चॅनल १०’वरील एका विनोदी कार्यक्रमात राजावर वेड्यासारखे प्रेम करणाऱ्या थाई जनतेची टिंगल केली गेली, तर तिथल्या थाई राजदूतांनी कडक शब्दांत चॅनलच्या प्रमुखांना पत्र लिहून तो कार्यक्रम वेबसाइटवरून हटवायला भाग पाडले. गुगलकडेही थायलंड सरकारने तक्रार केल्यानंतर तशा आशयाचा मजकूर ‘सर्च इंजिन’वरून हटवण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com