महाराष्ट्र ऍथलेटिक्‍सला नवसंजीवनी

महाराष्ट्र ऍथलेटिक्‍सला नवसंजीवनी
महाराष्ट्र ऍथलेटिक्‍सला नवसंजीवनी

एक मूळची आणि दुसरी नोकरीच्या निमित्ताने महाराष्ट्रात आली. दोघींनी ऍथलेटिक्‍समध्ये कारकीर्द घडवली. एक आपली आणि दुसरी बाहेरची म्हणून महाराष्ट्राने कधी दुजाभाव केला नाही. दोघींना सारखेच प्रोत्साहन दिले. दोघींनी त्याचे चीज केले. त्या दोघी म्हणजे संजीवनी जाधव आणि सुधा सिंग. आंतरराष्ट्रीय स्तरावर दोघींची कारकीर्द नेहमीच चर्चेत राहिली. सध्या भुवनेश्‍वर येथे सुरू असलेल्या आशियाई ऍथलेटिक्‍समध्ये सुधाने तीन हजार मीटर "स्टिपलचेस'मध्ये सुवर्णपदक पटकावले; तर संजीवनी जाधवने 5 हजार मीटरमध्ये ब्रांझपदक पटकावले. आता दोघींच्या एकूण कारकिर्दीचा विचार केला, तर संजीवनीची सुरवात म्हटली तरी चालेल. पण, दुसरीकडे सुधा कारकिर्दीच्या अंतिम टप्प्यावर आली आहे. पुढील वर्षी होणाऱ्या आशियाई आणि राष्ट्रकुल स्पर्धेनंतर ती पूर्णपणे मॅरेथॉनकडे वळू शकेल. आशियाई क्रीडा स्पर्धा, आशियाई विजेतेपद, तीनदा रौप्यपदक आणि दोन ऑलिंपिक यामुळे सुधासमोर आंतरराष्ट्रीय कारकीर्द कायम ठेवण्याचे दुसरे "मोटिव्हेशन' नाही. तसे तिने बोलून देखील दाखवले.

संजीवनी तीन दिवसांनी ती 21वा वाढदिवस साजरा करणार आहे. तिचे भविष्य उज्ज्वल आहे. पण, तिला अजून बराच मोठा पल्ला गाठायचा आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर विद्यापीठ स्पर्धेचा अपवाद वगळता वरिष्ठ गटातील तिची ही पहिलीच आंतरराष्ट्रीय स्पर्धा. प्रशिक्षक विजेंदर सिंग यांनी तिला तयार केली. पदकाचा निर्धार आणि तयारी उत्तर होती. सुरवातही चांगली झाली; पण अनुभव कमी असल्याचा फरक पडला. तीन वर्षांपूर्वी आशियाई कुमार स्पर्धेत तीन हजार मीटर स्पर्धेत जिच्याकडून पराभूत झाली, तिनेच याही वेळी तिला धक्का दिला. कुस्तीसारखा रांगडा खेळ सोडून ऍथलेटिक्‍सकडे वळालेली संजीवनी आशियाई युवा, ज्युनिअर, विश्‍व शालेय, विश्‍व विद्यापीठ असा प्रवास करीत ती एका टप्यावर पोचली आहे. ती कविता राऊत-तुंगार, मोनिका अठारे या नाशिककर धावपटूंची परंपरा पुढे नेत आहे. लांब पल्ल्याच्या शर्यतीत ऑलिंपिक पात्रततेचे उद्दिष्ट तिच्यासमोर आहे. त्यासाठी या दडपणाचा ती कशा प्रकारे सामना करते यापेक्षा तिला ऑलिंपिकसाठी योग्य पद्धतीने सांभाळण्याची गरज आहे. जितक्‍या अधिक स्पर्धेत ती सहभागी होईल, तितका तिचा आत्मविश्‍वास बळावणार आहे. महाराष्ट्राच्या धावपटूंना ऑलिंपिकच्या पदकापर्यंत पोचता आलेले नाही. पण, ही मरगळ झटकून महाराष्ट्राच्या ऍथलेटिक्‍सला नवी संजीवनी देण्याची क्षमता तिच्यात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com