होरपळीचे वास्तव (अग्रलेख)

water shortage
water shortage

एकीकडे उष्म्याचा दाह आणि दुसरीकडे पाण्याची चणचण यामुळे अनेक भागांत लोक हैराण झाले आहेत. या प्रश्‍नावर व्यापक उपाययोजनांचा कार्यक्रम हाती घेऊन त्याची कार्यक्षमतेने अंमलबजावणी झाली पाहिजे.

विदर्भ, मराठवाडा, खानदेशासह राज्यातील बहुतांश भागांत सूर्य आग ओकत आहे. आगीत होरपळून मृत्यू यावा तसे उष्माघाताने अनेकांचे जीवन संपविले आहे. हा आक्रोश ऐकण्याच्या मनःस्थितीत कोणी आहे की नाही, असाच प्रश्‍न आहे. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्‍यात पाण्यासाठी आडात उतरलेल्या तिघांचा गुदमरून मृत्यू झाला. त्या घरातील दोन कमावत्यांना जीव गमवावा लागल्याने हे कुटुंबच निराधार झाले आहे. एकीकडे आपण पाणी हेच जीवन असे म्हणतो खरे; दुसरीकडे पाण्यासाठीच जीव जात आहेत. महाराष्ट्रात गेल्या दोन-तीन हंगामात पडणाऱ्या दुष्काळाकडे काणाडोळा झाल्याने  प्रश्‍नाचा दाह वाढला आहे. एकीकडे उन्हाचे प्रखर झोत आणि दुसरीकडे आटलेले-आक्रसलेले भूजल, अशी स्थिती ओढवली आहे. नागपूर विभागात गेल्या तीन दिवसांत उष्माघाताने बारा जणांचे जीवन संपविले. पाणी नाही, घरात पुरेसे अन्न नाही, अशा अवस्थेत जगणे मुश्‍कील झालेल्यांचा कुणीच वाली नाही. विदर्भातील वाशिम जिल्ह्यातील नेवसाळ येथे एका पालावर सिंधू कोरडकर यांनी ४४ अंश सेल्सिअस तापमानात बाळाला जन्म दिला. औरंगाबादच्या मुकुंदवाडी रेल्वेस्थानकावर पाच दिवस उपाशीपोटी असलेल्या एका व्यक्तीची करुण कहाणी ‘सकाळ’ने समाजासमोर आणल्यानंतर एका खासगी रुग्णालयाने तत्परेतने त्याच्यावर मोफत उपचार केले. पण ही झाली तात्पुरती उपाययोजना. समाज म्हणून या संपूर्ण समस्येशी आपण कसा सामना करणार, हे पाहणे महत्त्वाचे आहे. पाण्यासाठी एकामागून एक बळी जात असतानाही प्रशासकीय पातळीवर अजूनही हालचाली दिसत नाहीत. दुष्काळासाठी व्यापक उपाययोजना करण्यात आचारसंहितेचा अडसर येता कामा नये. निवडणूक आयोगाने याविषयी लवचिक भूमिका घेणे अपेक्षित आहे आणि सरकारांनीही दुष्काळनिवारण हा प्राधान्यक्रम ठरवायला हवा.
भर उन्हात बैलांना गाडीला जुंपवून शेपटी पिरगाळल्याच्या मुद्द्यावरून एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. नागपूरमधील मानद पशुकल्याण अधिकारी करिष्मा गिलानी यांनी केलेल्या तक्रारीवरून ही कारवाई झाली; अशीच तत्परता माणसांविषयीपण दाखविली जावी, ही अपेक्षा अनाठायी नाही. हाडामांसाच्या माणसांचा जीव जाताना आपली यंत्रणा तडफ आणि तळमळ का दाखवत नाही, हा खरा प्रश्‍न आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आणखी काही दिवस तापमान वाढतच जाईल, असे दिसते. विदर्भ, मराठवाड्यातील शहरांमध्ये कधी काळी ३५ च्या तापमानालाही लोक म्हणायचे ऊन खूप वाढले आहे. दरवर्षी लोक हेच म्हणतात ऊन खूप वाढले आहे. आता तापमान पंचेचाळिशी ओलांडते आहे.

 विविध स्वयंसेवी संस्था आणि काही अभिनेते, इतर संस्थांच्या माध्यमातून झालेल्या कामांमुळे पाण्याचा प्रश्‍न काही ठिकाणी सुटला किंवा थोडाफार सुसह्य झाला. जर त्यांना हे जमते तर मोठ्या प्रमाणावर हे काम का होऊ नये? त्या पाऊलवाटेने जायला कुणीही तयार नाही. निवडणुका कुणीही जिंको; जर लोकांना केवळ पाण्यासाठी जीव गमवावा लागत असेल, तर कोणत्याच राजकीय पक्षाला बोलण्याचा अधिकार नाही. औरंगाबादमध्ये निवडणुकीइतकाच पाण्याचा प्रश्‍न तापला आहे. यवतमाळमध्ये नागरिकांनी पाणीपुरवठा यंत्रणेची अंत्ययात्रा काढून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. एकीकडे पाण्यासाठी जिवानिशी गेलेल्यांच्या अंत्ययात्रा आणि दुसरीकडे प्रशासकीय विभागावरची नाराजी, हे वास्तव आहे. विस्तवावरून चालणाऱ्यांच्या पायाला बसलेले चटके आपल्याला दिसत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे.

खेड्यापाड्यातील लोकांना जगण्यासाठी काय करावे, हा प्रश्‍न भेडसावत आहे. तात्पुरती मदत आणि दुष्काळी कामे हा एक मार्ग आहे. प्रत्यक्षात आगामी काळात पर्यावरणाचा बिघडणारा समतोल हाही मुद्दा गांभीर्याने विचारात घ्यायला हवा.
पर्यावरणासाठी झाडे लावा, पाण्यासाठी गाळ काढण्याची कामे करा, असे आपण सांगतो. काही ठिकाणी झाडे लागतात. काही ठिकाणी जलसंधारणाची कामे केली जातात; तरीही तेवढ्याने पाण्याचा प्रश्‍न सुटत नाही आणि पर्यावरणाचाही. पाऊसमान किती होते, यापेक्षा आभाळातून आलेले पाणी आपण कसे वापरतो, हे महत्त्वाचे ठरणार आहे. ते पाणी कसे साठवता येईल, याचा विचार आवश्‍यक आहे. कमी पाऊस पडला, तरी पाण्याचा प्रश्‍न उत्तम नियोजनातून सुटू शकतो. त्यासाठी नव्या दिशेने वाटचाल होणार का? आपल्यापुढे जलसंकटाचा महाभयंकर असा राक्षस उभा आहे. तो सगळेच गिळंकृत करायला निघालाय. त्याला रोखावेच लागेल. पाणीदार आभाळमाया, हेच आपले खरे छत्र आहे, याचा विसर पडायला नको.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com