
- चंद्रकांत वानखडे
भांडवलाची गुंतवणूक वाढते आहे; पण त्यामध्ये माणसांची गुंतवणूक होत नसेल तर त्याचा काय उपयोग? काम नसल्याने त्या बेकारांचे हातच तोडून टाकाल की त्यांना काम मिळेल, अशई व्यवस्था तयार कराल, हा महात्मा गांधींनी उपस्थित केलेला प्रश्न आजही तेवढाच ज्वलंत व तेवढाच प्रस्तुत आहे. महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने एक चिंतन.
‘द्वे ष’ ही अशी विषाची गोळी आहे की, ती आपण घेतो आणि आपला विरोधक वा दुष्मन मरेल यांची वाट पाहतो.’’ हे वाक्य मी कधी, कशासंदर्भात वाचलं आठवत नाही. पण हे वाक्य कायम स्मरणात आहे आणि सद्यःस्थितीत तर त्याचे स्मरण पदोपदी होते. याचे कारण सध्या या देशात द्वेषाच्या गोळीचे मोठ्या प्रमाणात वाटप होत असून ती प्रत्येकाने खावी, असा प्रयत्न होतो आहे की काय, असं वाटतं. अशा वातावरणात आयुष्यभर प्रेमाची शिकवण देणाऱ्या महात्मा गांधींची आठवण माझ्यासारख्याला प्रकर्षाने येत असेल तर नवल नाही.
जग बदललं आहे, असं आपण म्हणतो. रोज लागणाऱ्या नवीन शोधांबाबत, नवीन तंत्रज्ञानाच्या बाबतीत हे खरेही आहे. पण सनातन मूल्यांच्या बाबतीत हे खरं आहे का? सत्य, प्रेम, अहिंसा, प्रामाणिकता आजही सर्वांनाच हवी आहे. जग बदललं असेल; पण जगात असा कोण आहे ज्याला प्रेम नकोय.
असा कोण आहे, ज्याला इतरांनी त्याच्याशी खोटं बोललेल आवडेल? स्वतःपुरता विश्वास, प्रामाणिकता कोणाला नको आहे? कोणाला इतरांच्या बंदुकीच्या गोळीने मरावं असं वाटेल? कोणालाच असे वाटणार नाही. खरा पेच इथंच आहे.
मी साऱ्या जगाचा द्वेष करेन; पण मला मात्र जगाकडून प्रेमच हवे आहे. मी जगाचा विश्वासघात करेन; पण जगाकडून मला मात्र विश्वासच पाहिजे. मी जगाशी अप्रामाणिक राहीनच; पण जगाने मात्र माझ्याशी प्रामाणिक राहावे. मी हिंसा करेन; पण कोणाच्या बंदुकीच्या गोळीला मी मात्र बळी पडता कामा नये. माझ्या बाबतीत मला अहिंसाच पाहिजे.
मी लोकांशी वाईट वागत असलो तरीही लोकांनी माझ्याशी चांगले वागले पाहिजे. ही व्यक्तीची अपेक्षा असते. हीच अपेक्षा बहुतांश समाजाची, जगभरातील लोकांचीही असते. ही अपेक्षा जोपर्यंत आहे, तोपर्यंत गांधी हा व्यक्तीसाठी, समुहांसाठी, देशात, परदेशात, एवढंच नव्हे तर साऱ्या जगात पूर्वीही प्रस्तुत ठरत होता आणि आजही तेवढाच प्रस्तुत ठरतो. कारण गांधी सत्य, अहिंसा, प्रेम, प्रामाणिकपणा याच मूल्यांचं प्रतिनिधित्व करतो ना?
‘पेराल तेच उगवेल’ हा तर निसर्गनियम. टोमॅटोचं बी पेरलं आणि वांग्याचं रोप उगवलं असं होतं नाही. धोत्र्याचं कलम लावलं व त्यावर मोगरा फुलला हे शक्य नाही. त्याचप्रमाणे प्रेम हवे असेल तर प्रेमच पेरावे लागेल. सत्य हवे असेल, तर सत्याचीच कास धरावी लागेल. इथेच गांधीचं आणि आपलं थोडं बिनसतं. आम्हाला प्रेम तर हवे आहे; पण द्वेषाची पेरणी करून.
आम्हाला अहिंसा तर हवी आहे, पण हिंसेचा मार्ग पत्करून. यालाच गांधींनी साधन आणि साध्य म्हटले आहे. साध्याच्या अनुरूपच साधन असावे, हा त्यांचा आग्रह म्हणूनच आहे. शुद्ध परिणामांची अपेक्षा असेल तर शुद्ध साधनांचाच वापर केला जावा, हा त्यांचा कटाक्ष होता. धर्मकारणात असलेली ही बाब त्यांनी राजकारणातही मोठ्या प्रमाणावर प्रथमतःच उपयोगात आणली.
त्यांच्या मते साधन आणि साध्य ह्यात संबंध नाही असे म्हणणे म्हणजे समुद्र तरुन जायचा आहे आणि बैलगाडीचा वापर केला तर काय बिघडते असा प्रश्न विचारण्यासारखा आहे. समुद्र पार करून जायचा असेल तर साधन जहाज हेच होऊ शकेल. त्याऐवजी आपण बैलगाडीच पाण्यात घातली तर त्या गाडीसकट आपण सर्वच तळ गाठू. जसा देव तशी पूजा. साधन हे बीज आहे आणि साध्य हे झाड आहे. बीजाचा आणि झाडाचा जसा आणि जितका संबंध आहे तसा आणि तितकाच संबंध साधन आणि साध्यात आहे. सैतानाची भक्ती करुन ईश्वर-भजनाचे फळ मिळणे शक्य नाही.
विचारांची प्रस्तुतता
आपण जर असे म्हटले की, आम्हाला ईश्वराचीच भक्ती करावयाची आहे, मग साधन सैतान असले म्हणून काय झाले? तर मग हे म्हणणे अगदीच अज्ञानाचे होईल. गांधींचे हे म्हणणे आजच्या ही काळात प्रस्तुत आहे. गांधी यंत्रविरोधी होते म्हणून ते विकासविरोधीही आहेत, असाही एक सार्वत्रिक गैरसमज आहे. कोणत्याही यंत्राचा वापर करायचा असेल, तर तो शेवटच्या माणसांचा विचार करूनच केला पाहिजे, हा त्यांचा आग्रह होता. तो यंत्रविरोधी नसून यंत्रविवेकी होता.
ते म्हणायचे, ‘‘भारतावर व साऱ्या मानवजातीवर प्रेम करणाऱ्याने स्वतःला एकच प्रश्न विचारायचा आहे. आपले करंटे दैन्य, दारिद्र्य कमी करण्यासाठी कोणती व्यवहार्य साधने व मार्ग आपणास संघटित करता येतील?’
’ मोठ्या उद्योगांमुळे उत्पादन व वाटप मूठभर लोकांच्या हातात केंद्रित होतात. त्यामुळे विशेषाधिकार व मक्तेदारी तयार होते. त्यांचा त्यांना मनस्वी तिटकारा होता. त्यामुळेच ‘मास प्रॉडक्शन’ की ‘प्रॉडक्शन बाय मासेस’ हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. त्यांनी त्या काळात उपस्थित केलेला तो प्रश्न आजही तेवढाच प्रस्तुत आहे.
भारत महासत्ता बनतो आहे, असे म्हणायचे तर दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढताहेत हेही मान्य करायचे. विकासाचा दर वाढतो आहे असेही म्हणायचे व दुसऱ्या बाजूला बेकारीही तेवढ्याच प्रमाणात वाढते आहे याचीही कबुली द्यायची.
अन्नधान्याची कोठारं भरली आहेत हे वास्तव असेल; पण याच देशात आदिवासी भागात कुपोषणाने माणसं मरताहेत व क्रयशक्तीअभावी अन्नधान्य विकत घेता येत नाही म्हणून उपाशीपोटी राहणाऱ्यांची संख्या कमी नाही,
हे जळजळीत व तेवढंच भीषण वास्तव शिल्लक आहेच ना? भांडवलाची गुंतवणूक वाढते आहे, पण त्यामध्ये माणसांची गुंतवणूक होत नसेल तर काम नसल्याने त्या बेकारांचे हातचं तोडून टाकाल, की त्यांना काम पुरवण्याचा प्रयत्न करेल? हा त्यांचा तेव्हाचा प्रश्न आजही तेवढाच ज्वलंत व तेवढाच प्रस्तुत नाही का?
अर्थशास्त्राची व्याख्या
एका माणसाने त्यांना तुमची अर्थशास्त्राची परिभाषा काय असा प्रश्न केला होता.`What is the definition of your economics?` या प्रश्नाला उत्तर देताना गांधी म्हणाले, ``to convert waste into wealth, it is the definition of my economics.`` जे जे म्हणून टाकाऊ,बेकार आहे त्याचे संपत्तीत रुपांतर करणे ही माझ्या अर्थशास्त्राची व्याख्या आहे. त्या व्याख्येच्या अनुषंगाने जरी आज विचार केला, तरी काय काय ‘बेकार’ आहे या देशात? मोठ्या प्रमाणावर जमीन पडीक आहे, म्हणजेच बेकार आहे.
पावसाचे पडणारे पाणी बऱ्यापैकी वाया जात आहे. पाऊस पडतो आणि मोठया प्रमाणात ते पाणी समुद्रात अक्षरशः वाया जाते. सूर्यशक्ती अशीच वाया जात आहे. माणसांच्या हाताला काम नाही म्हणून ते बेकार ठरत आहेत. त्यांचे हात, त्यांची बुद्धी ‘श्रमशक्ती’च्या रुपात व्यर्थ पडून आहे. ह्या सर्वांचे संपत्तीमध्ये रुपांतर करण्याची कल्पना, त्याप्रमाणे नियोजन केले पाहिजे, हा त्यांचा आग्रह, याला ‘गांधींचे खूळ’ कसे म्हणता येईल?
याउलट आजचे वास्तव चित्र काय आहे? आज जर अर्थशास्त्राची परिभाषा काय, असे विचारले तर संपत्तीचाच कचरा करणे ही आजच्या अर्थशास्त्राची व विकासाची दिशा आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कचऱ्यातून संपत्ती निर्माण करण्याचा गांधींचा विचार कोठे आणि संपत्तीचाच कचरा करण्याची आजची स्थिती कोठे? अर्थात जिथे गांधींचाच ‘कचरा’ करण्याचा खटाटोप केला गेला, तिथे गांधीविचारांची उपेक्षा केली जात असेल तर त्यात नवल नाही.