पायात साप, हातात शिडी

जे लोक धर्माला राजकारणाशी काही देणेघेणे नाही, असे म्हणतात त्यांना धर्मच कळालेला नाही.
cm udhhav thakre
cm udhhav thakresakal

जे लोक धर्माला राजकारणाशी काही देणेघेणे नाही, असे म्हणतात त्यांना धर्मच कळालेला नाही.

- महात्मा गांधी

‘धर्माची राजकारणाशी सांगड घालणे, ही आमची मोठीच चूक होती आणि त्याचे फटकेही आम्हांला खावे लागले आहेत,’ असा स्पष्ट कबुलीजबाब शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस तसेच राष्ट्रवादी यांच्यासमवेत सरकार स्थापन केल्यानंतर लगेचच नागपूरच्या हिवाळी विधिमंडळ अधिवेशनात दिला होता. त्यास दोन वर्षे उलटल्यानंतर पुनश्च एकवार हिंदुत्वाची हाळी देणे शिवसेनेला भाग पडले आहे! मात्र, त्यास कारणीभूत ठरले आहे ते असदुद्दीन ओवेसी यांच्या ‘एमआयएम’ या महाराष्ट्राच्या राजकारणात आपला पाय रोवण्यासाठी उतावीळ झालेल्या पक्षाची अनपेक्षित खेळी! काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांना साथीला घेऊन, उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाचे सत्ता राखण्याचे मनसुबे उधळून लावल्यापासून आता ‘शिवसेना मुस्लिमधार्जिणी झाली असल्याची’ टीका भाजप नेते सातत्याने करत आहेत.

या पार्श्वभूमीवर ‘एमआयएम’चे खासदार इम्तियाज जलील यांनी आपण या ‘महाविकास आघाडी’त सामील होऊ इच्छितो, असे जाहीरपणे सांगितले. तेव्हापासून महाराष्ट्रात पुन्हा हिंदुत्वाच्या राजकारणाला फोडणी घालण्याचे काम भाजपने सुरू केले आहे. त्यास उत्तर देताना ठाकरे यांनी ‘शिवसंपर्क अभियाना’साठी झालेल्या शिवसेना खासदार तसेच जिल्हाप्रमुखांच्या बैठकीत भाजपवर घणाघाती हल्ला चढवत पुन्हा हिंदुत्वाचीच हाक दिल्याने हा राज्यातील प्रमुख सत्ताधारी पक्ष सापळ्यात अडकला आहे.भाजपला हे सारे हवेहवेसेच असले, तरी त्यामुळे राज्यातील जनतेचे रोजी-रोटीचे प्रश्न मागे पडून पुन्हा एकदा कोणाचे हिंदुत्व अधिक जाज्ज्वल्य ते दाखवून देण्याची स्पर्धा सुरू झाली आहे.

मात्र, ‘महाविकास आघाडी’त सामील होण्याचा ‘एमआयएम’चा प्रस्ताव उद्धव ठाकरे तसेच आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांनीही ठामपणे फेटाळून लावल्यानंतर देखील इम्तियाज जलील प्रस्तावावर ठाम आहेत. त्यासाठी उद्धव ठाकरेंची भेट घेण्याचेही त्यांनी ठरवले आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर खळबळ उडवून देणाऱ्या ‘एमआयएम’चा बोलविता धनी कोणी वेगळाच नाही ना, अशा चर्चांना उधाण आले आहे. दस्तुरखुद्द ठाकरे यांनी तर या ‘बोलवित्या धन्या’चे नाव भाजप असे जाहीर करून टाकल्याने आरोप-प्रत्यारोपांचा खेळही सुरू झाला आहे.

अर्थात, शिवसेनेने काँग्रेसशी आघाडी केल्यानंतर फार काही आदळआपट करण्याची भाजपला मुळातच गरज नव्हती; कारण शिवसेनेची स्थापना झाली तेव्हाच या पक्षाची पाठराखण काँग्रेस करत असल्याचे स्पष्ट दिसत होते. १९६७ मध्ये जॉर्ज फर्नांडिस या आपल्या ‘मित्रा’ची पाठराखण करण्याऐवजी बाळासाहेब ठाकरे यांनी स. का. पाटील यांना पाठिंबा जाहीर केला होता. १९८० मध्ये विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचा प्रचारही केला होता! दरम्यान, मधू दंडवते यांचा प्रजा समाजवादी पक्ष आणि रा. सु. गवई यांचा रिपब्लिकन पक्ष यांच्याशी हातमिळवणी करताना शिवसेनेने मुस्लिम लीगचे नेते बनातवाला यांच्यासमवेत भायखळ्याच्या मस्तान तलावावर संयुक्त सभाही आयोजित केली होती. भाजपनेही अटलबिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदी यांच्या राजवटीत पाकिस्तानशी मैत्री जोडण्याचे प्रयत्न अनेकदा केले होते.

त्यामुळेच आपले हिंदुत्व अधिक जाज्ज्वल्य आहे, हे दाखवण्यासाठी आता उद्धव ठाकरे त्या घटनांना उजाळा देत आहेत. यातून एकमेकांच्या उखाळ्या-पाखाळ्या जरूर काढता येतील; पण इतिहासाचा धांडोळा घ्यायचे ठरवले तर सर्वच पक्षांनी या अशा संधीसाधू आघाड्या कशा केल्या होत्या, याचे दाखलेही मिळत राहतील. मात्र, यामुळे आपल्या देशात बहुतेक सर्वच पक्षांचे पाय मातीचे आहेत, हे दाखवून देण्यापलीकडे फारसे काही साध्य होणार नाही.

मात्र, उद्धव ठाकरे आता नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावरही अचानक पाकिस्तानात जाऊन नवाझ शरीफ यांची गळाभेट कशी घेऊन आले होते, याची आठवण करून देत आहेत. शिवाय, ‘आम्हाला जनाब म्हणणार असाल, तर मुस्लिमबहुल वस्तीत उर्दू शाळा सुरू करू पाहणाऱ्या सरसंघचालक मोहन भागवत यांना काय म्हणायचे?’ असा सवाल उद्धव ठाकरेंनी केल्यामुळे भाजपच्या नाकाला मिरच्याच झोंबल्या असणार!

‘एमआयएम’च्या या प्रस्तावाचा होता होईल तेवढा राजकीय लाभ उठवण्याचा भाजपचा प्रयत्न स्पष्ट आहे आणि तो त्यांच्या ‘महाविकास आघाडी’ची बदनामी करण्याच्या खेळाला दोन पावले पुढेच नेणारा आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी संतप्त होऊन भाजपच्या इतिहासाला उजाळा देण्याचे काम केले. मात्र, हा सारा एकमेकांच्या पायात साप सोडण्याचा खेळ आहे. ठाकरे यांचे सरकार पडत नाही आणि राज्याची सत्ता आपल्या हाती येत नाही, यामुळे या आघाडी सरकारची विश्वासार्हता जमेल तेवढी मोडीत काढण्याचा प्रयत्न भाजप नेते हिरिरीने करत होतेच. आता चार राज्यात आणि विशेषत: उत्तर प्रदेशात सत्ता पुन्हा राखल्यामुळे त्यास अधिक गती आलेली आहे. खरे तर आता, उत्तर प्रदेशात आणि त्याआधी बिहारमध्ये ‘एमआयएम’ने मुस्लिमबहुल मतदारसंघांत उमेदवार उभे करून भाजपला केलेली मदत इतिहासात नोंदली आहे. त्यामुळेच भाजपची ‘बी टीम’ म्हणून प्रसिद्धी पावलेल्या ‘एमआयएम’ला अचानक या महाविकास आघाडीबद्दल प्रेमाचा पान्हा कसा फुटला, हे गूढच आहे. भाजपच्या कुटील राजकारणाला मात्र त्यामुळे अधिक बळच मिळाले, यात शंका नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com