
‘स्पिक मॅके’ विस्ताराच्या वळणावर!
आयआयटी, दिल्ली येथील प्रा. डॉ. किरण सेठ यांनी १९७७ मध्ये स्थापन केलेली ‘स्पिक मॅके’ ही संस्था भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची ओळख तरुण मुलांना व्हावी, या उद्देशाने कार्यरत आहे. देशभरातील अधिकाधिक तरुणांपर्यंत पोहोचावे, या उद्देशाने डॉ. सेठ यांनी चक्क वयाच्या ७४ व्या वर्षी नुकतीच श्रीनगर ते कन्याकुमारी अशी सायकल यात्रा काढली. ही यात्रा परतीच्या वाटेवर असताना त्यांनी पुण्यालाही भेट दिली. त्यावेळी त्यांच्याशी साधलेला संवाद.
प्रश्न - भारतीय शास्त्रीय संगीतासह विविध कलाप्रकारांच्या प्रचारासाठी आपण काम करत आहात. या कलांशी आपला कसे जोडला गेला?
उत्तर - मी दिल्ली येथे आयआयटीत शिकत असताना पाश्चात्य संगीताचा रियाज करत असे. तेथील एक शिक्षक मात्र दरवर्षी एकदा संपूर्ण रात्रभर चालणाऱ्या भारतीय शास्त्रीय संगीताची मैफिल आयोजित करत असायचे. त्यात रस नसल्याने मी शेवटच्या रांगेत बसून त्याकडे दुर्लक्ष करायचो, पण या संगीताची बीजे माझ्या मनात नकळत रुजली गेली. त्यानंतर पीएचडीसाठी अमेरिकेत वास्तव्यास असताना उस्ताद नसीर अमीनुद्दीन डागर आणि उस्ताद फरीदुदीन डागर यांचे ध्रुपद गायन ऐकले. त्या मैफिलीने मी प्रचंड प्रभावित झालो. भारतीय शास्त्रीय संगीताच्या प्रेमातच पडलो. हे संगीत म्हणजे केवळ कला नसून त्यापलीकडे आत्मिक आनंदाकडे नेणारी गोष्ट आहे, हे माझ्या लक्षात आले. त्यानंतर माझा संगीत आणि इतर सर्व भारतीय कलांशी भावबंध जुळला, तो कायमचाच!
‘स्पिक मॅके’ची सुरूवात कशी झाली? ही संकल्पना आपल्याला कशी सुचली?
भारतीय शास्त्रीय संगीतामुळे मी तर प्रचंड प्रभावित झालो होतो. त्याची ताकद सर्वांपर्यंत पोहोचावी, अशी इच्छा निर्माण झाली. त्या कल्पनेतून मग काही सहकाऱ्यांसह पहिला संगीताचा कार्यक्रम आयोजित केला. तो फारसा यशस्वी झाला नाही. पण मी प्रयत्न सुरू ठेवले. हळूहळू कार्यक्रमांना गर्दी वाढायला लागली. संगीतासह योगाचा कार्यक्रमही ठेवला. सुरुवातीला आम्ही काही विद्यार्थीच यात असल्याने ‘मेकॅनिकल इंजिनियरिंग फायनल इयर ऑपरेशन रिसर्च ग्रुप’ असे नाव ठेवले होते. नंतर या चळवळीला ठोस नाव असावे, असे वाटले. त्यावेळी मग ‘सोसायटी फॉर प्रमोशन ऑफ इंडियन क्लासिकल म्युझिक अँड कल्चर अमंग युथ’ अर्थात ‘स्पिक मॅके’ असे नाव सुचले आणि या संस्थेची सुरूवात झाली. संस्थेचा विस्तार ठरवून नाही तर अगदी नैसर्गिकपणे झाला.
संस्थेच्या ४६ वर्षांच्या प्रवासाचे संचित काय?
सुरुवातीला भारतीय शास्त्रीय संगीत आणि योग, या दोन प्रकारांमध्येच आम्ही काम करत होतो. नंतर लोककला, चित्रपट, नाटक, हस्तकला, चित्रकला, शिल्पकला अशा सर्वच कला प्रकारांचा समावेश केला. देशातील अनेक आघाडीच्या शैक्षणिक संस्थांमध्ये आम्ही कार्यक्रम केले. परदेशातही स्टॅनफोर्ड विद्यापीठ, कोलंबिया विद्यापीठ अशा जागतिक दर्जाच्या अनेक संस्थांमध्येही नियमित कार्यक्रम होतात. आजच्या घडीला ‘स्पिक मॅके’तर्फे एका वर्षात तब्बल पाच हजार कार्यक्रम होतात. हजारो-लाखो व्यक्ती आमच्याशी जोडले गेले आहेत. ते भारताचा सांस्कृतिक वारसा समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
सायकल यात्रेची कल्पना कशी सुचली? यामागील हेतू काय?
मी यापूर्वी म्हटल्याप्रमाणे आम्ही वर्षभर पाच हजार कार्यक्रम करतो. पण देशभरात वीस लाख शैक्षणिक संस्था आहेत, त्या तुलनेत हे कार्यक्रम नगण्य आहेत. यावर संस्थेच्या बैठकीत विचार करत असताना मी सायकल यात्रा करतो, असे सहज म्हणून गेलो. मी कल्पना मांडली, पण मलाच ते पूर्ण करता येईल का, याची खात्री वाटत नव्हती. म्हणून आधी दिल्ली, जयपूर, उदयपूर, अहमदाबाद अशी एक सायकल यात्रा करून पाहिली. त्यातून आत्मविश्वास मिळाल्याने मग श्रीनगर ते कन्याकुमारी प्रवासाला सुरूवात केली. गतवर्षी १५ ऑगस्ट रोजी यात्रेला सुरूवात केली, यावर्षी १९ फेब्रुवारी रोजी यात्रा पूर्ण केली. यात्रेंतर्गत माझा आत्तापर्यंत सात हजार पाचशे किलोमीटरचा प्रवास झाला आहे. आता पुण्यातून मी मुंबईला जाणार आहे.
संस्थेमार्फत येत्या काळात कोणत्या योजना राबवण्यात येणार आहेत?
प्रत्येक मुला-मुलीला आपल्या अमूल्य संस्कृतीची ओळख व्हावी, हे आमचे उद्दिष्ट आहे. त्याच उद्देशाने मी सायकल यात्रा काढली. देशाच्या कानाकोपऱ्यातील विद्यार्थ्यांपर्यंत आमचे काम पोहचवण्याचा प्रयत्न असेल. यासह आमचे नियमित कार्यक्रम सुरू आहेत. येत्या २९ मे ते ४ जून या कालावधीत नागपूर येथे आमचे अधिवेशन होत आहे. या कार्यक्रमांचा अधिक विस्तार करण्याचा मानस आहे.
आव्हानांचा सामना करण्यास उपयुक्त
आज मी जेथे-जेथे जातो, तेथे सगळे विद्यार्थी त्यांच्यावरील ताणतणावांबद्दल बोलत आहेत. अनेकांना नैराश्याचा सामना करावा लागत आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढते आहे, पण दुसरीकडे वैयक्तिक पातळीवर त्यांना भावभावनांचे व्यवस्थापन करता येत नाही. यावरचा उपाय आपल्या भारतीय कलांमध्ये आहे. शास्त्रीय संगीताच्या सान्निध्यात आलेली प्रत्येक व्यक्ती आपल्यामध्ये परिवर्तन झाल्याचा अनुभव सांगते. विद्यार्थ्यांना एकाग्रता वाढल्याचा अनुभव येतो. मानसिक शांतता लाभते. त्यामुळे बदलत्या जगाच्या आव्हानांचा सामना करताना हे अधिकच मोलाचे आहे, असे वाटते.