arankalle
arankalle

योग आणि योगायोग

सुख सुखाकडं कसं पाहत असेल? आनंदानं? प्रेमानं? आपलीच प्रतिमा म्हणून? की मत्सरानं? असूयेनं? आपला स्पर्धक म्हणून? अशा परस्परविरोधी भावनांनी सुख सुखाकडं पाहतच नसेल, तर मग काय बरं होत असेल? मुळात, सुखाला सुखाकडं पाहावंसं वाटत असेल का? समजा, सुखानं असं पाहिलं, तरी त्याची दृष्टी समन्यायी असेल का? की सुखाला सुख पाहवतच नसेल? त्याचा चांगुलपणा सुखाला खुपत-टोचत असेल?

दुःखानं दुःखाकडं पाहायचं ठरविलं, तर ते कसं पाहील? सुखाची सुखाकडं पाहताना जी स्थिती होईल, तशीच अवस्था दुःखाच्याही वाट्याला येत असेल का? दुःखाकडं पाहताना दुःखाच्या काळजातही काजळी धरत असेल का? त्याचं अंतरही दुःखावेगानं मुसमुसत असेल का? की समानधर्मी म्हणून दोन्ही दुःखं एकमेकांना कडकडून भेटतील? मुळातल्या वेदना अधिक खोलवर घर करून राहू नयेत, म्हणून दुःख दुःखाकडं पाहणं टाळतच असेल का?

या दोन्ही प्रयोगांत नेमकं काय घडून येईल, त्याचा अंदाज नाही बांधता येत. हं; पण उलटं घडलं, तर मात्र खूपसे अंदाज चपखल करता येऊ शकतात. म्हणजे, सुखानं दुःखाकडं किंवा दुःखानं सुखाकडं पाहायचं ठरविलं तर? -तर दोघांनाही ते निश्‍चित खूपच आवडेल. छिद्रान्वेषी टीकाकाराच्या भूमिकेत ते सहज जाऊन बसतील आणि उणिवांची भलीमोठी यादी करतील. परस्परांना बोल लावतील. यश-अपयश, सौंदर्य-कुरूपता, प्रकाश-अंधार, उंची आणि खुजेपणा या प्रकारच्या परस्परविरोधी गोष्टींचे संसार अशा भावनांवरच उभे राहिलेले असतील? आणि म्हणूनच ते गुण्यागोविंदानं नांदत असतील?

सुख सुखाकडं किंवा दुःख दुःखाकडं पाहू शकणार नाही; कारण तसं पाहण्यासाठी जे धैर्य लागतं, त्याचा या दोघांकडंही अभाव असतो. सुखाकडं पाहताना सुखाला त्यातील त्रुटी दिसल्या, तरी त्या मान्य करण्याचं औदार्य त्याच्याकडं हवं. मनाची कमालीची पारदर्शकता हवी. सुंदरातील असुंदराच्या सूक्ष्म-तरल छटा टिपण्याची समज त्याच्याकडं हवी. आपल्याच प्रतिमेत अडकून पडलेल्यांना पलीकडचं पाहता येत नाही; कारण त्यांच्या दृष्टिपटलावर ढगांचे कभिन्न झाकोळ जमा झालेले असतात. 

स्वतःची प्रतिमा आरशात पाहणं जेवढं सुसह्य असतं, तेवढं आपल्यातून बाजूला होऊन आपल्याकडं पाहणं चक्रावून-गोंधळवून टाकणारं असतं. तिथं दिसणारी आपली सत्यरूपं आपल्याला पाहवणारी, सहन होणारी आणि मान्य होणारी नसतात. योगमार्गात प्रगती केलेल्या अनेकांना स्व-रूप पाहणं जमलेलं नसतं. माणसांना दुसऱ्यांकडं सहजपणानं पाहता येतं, त्यांच्या अंतरंगांत डोकावता येतं; किंबहुना तोच कित्येकांचा छंद असतो. माणूस स्वतःकडं पाहत नाही, स्वतःपासूनच स्वतःला सारखा लपवीत राहतो, त्याचं कारणही हे असंच काही असेल का?

आपला संपूर्ण दिवस आनंदचिंब होण्यासाठी पारदर्शी मनानं ‘आपण आपल्याकडं पाहणं’ यासारखा दुसरा योग नाही आणि ही उपरती होण्यासारखा दुसरा योगायोगही नाही!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com