लपाछपीचा खेळ

मल्हार अरणकल्ले
गुरुवार, 12 ऑक्टोबर 2017

आपल्यापैकी कित्येकांचे लपाछपीचे असले खेळ आता घरंगळून मागं राहिले असले, तरी आपण नव्यानं तोच खेळ खेळतो आहोत. कुणी सुखाला शोधतं आहे. कुणाला आनंदाला पकडायचं आहे. कुणाला मानमरातब हवा आहे; तर कुणाला भौतिक समृद्धी हवी आहे

पावसाळ्याच्या दिवसांत डोंगरउतारांवरून किंवा उंचवट्याच्या रस्त्यांवरून पाण्याचे प्रवाह धावत यावेत, तशी मुलं वेगवेगळ्या दिशांच्या वाटांकडून एकत्र आली आहेत. मुलांचं जणू एक तळंच तिथं भरून गेलं आहे. मुलांच्या गोलात नवे भिडू मिसळताना आरोळ्यांच्या अन्‌ टाळ्यांच्या लाटा फुटत आहेत. गोलाच्या काठावर पोचलेल्या मित्रांनी बोटे एकमेकांत गुंतवून हात उंचावले आहेत. त्या गलक्‍यातून एक आरोळी ऐकू येते आहे ः एक, दोन... आणि तीन! त्याबरोबर हात खाली येऊ लागले आहेत; आणि स्वतःच्याच तळहातावर टाळी देऊन ते थांबले आहेत. काही तळवे उलटे; तर काही सुलटे. असं पहिलं आवर्तन पूर्ण होताच, दावा-प्रतिदावा करणाऱ्या आवाजांच्या कित्येक तलवारी म्यानांतून बाहेर आलेल्या आहेत ः मी सुटलो! मी पण सुटले! नाही-नाही, हा खोटं बोलतोय!

"सुटले'ले भिडू गोलातून बाजूला झाले आहेत. उरलेल्यांनी पुन्हा हात उंचावले आहेत; आणि क्षणांत खाली येऊन टाळ्यांच्या आवाजाबरोबर थांबले आहेत. त्यांतले "सुलट्या' टाळ्यांचे मित्र "सुटले' आहेत. एकामागून एक गोल. प्रत्येक वेळी काही "सुटले'ले आणि काही "अडकलेले'. आता दोघेच उरलेले. त्यांनीही हात उंचावून बोटं गुंफली आहेत. साऱ्यांची उत्कंठा शिगेला पोचली आहे. दोघांचे हात टाळ्यांच्या पूर्णविरामाशी थबकले आहेत. "राज्य कुणावर' त्याचा निर्णय झाला आहे. राज्य आलेल्याच्या डोळ्यांवर ठेवून त्यांतल्याच एकानं सगळ्यांना लपून बसण्याचा इशारा केला आहे; आणि गोलातले एकेक भिडू वेगवेगळ्या दिशांनी निघाले आहेत. ""हा बघतो आहे, याला दिसतं आहे'' असे आक्षेप घेऊन काही मित्र परत फिरले आहेत. हाताची बोटं पुढं धरून, "ही बोटं किती?' अशी विचारणा करून त्याची परीक्षा पाहिली जात आहे. राज्य आलेल्यानं अंदाजानं सांगितलेली संख्या समोर धरलेल्या बोटांच्या संख्येशी जुळली, की पुन्हा गलका होतो आहे. अखेर, अंधार पडल्यावर व्हावं, तसं सगळीकडं चिडीचूप झालं आहे. झाडांच्या बुंध्यांच्या आडोशाला, एखाद्या खड्ड्याच्या आसऱ्याला, गाड्यांच्या निवाऱ्याला लपून बसलेली मुलं अंग आक्रसून घेत आहेत. तिथल्या अनेक जागा परस्परांना ठाऊक असल्या, तरी काहींनी आधीच नवी ठिकाणं हेरून त्यांचा आश्रय घेतलेला आहे. कुणी कुणी लपल्याची ठिकाणं उघड होऊ लागल्याचे आवाज येताच, तोपर्यंत न सापडलेल्यांच्या काळजाचं पाणी होऊ लागलं आहे. भलताच धाडसी आणि चपळ असलेला एखादा मित्र दबा धरून राज्य आलेल्याच्या मागं मागं जातो आहे. सगळ्यांचा शोध लागला, तरी हा एकटाच त्याला गुंगारा देतो आहे. बऱ्याच वेळानं ती शिकारही टिपली गेली आहे. मग पुन्हा एकावर राज्य; आणि त्याची लपून बसलेल्यांना शोधण्याची मोहीम...

आपल्यापैकी कित्येकांचे लपाछपीचे असले खेळ आता घरंगळून मागं राहिले असले, तरी आपण नव्यानं तोच खेळ खेळतो आहोत. कुणी सुखाला शोधतं आहे. कुणाला आनंदाला पकडायचं आहे. कुणाला मानमरातब हवा आहे; तर कुणाला भौतिक समृद्धी हवी आहे. अशा गोष्टींना आपण शोधू पाहतो आहोत; आणि त्या मात्र आपल्याच आजूबाजूला लपून बसलेल्या आहेत!

Web Title: malhar arankalle writes about life