खुणांची जोडणी

life
life
धुळीनं भरलेल्या रस्त्यावरून एखादं वाहन पुढं जातं; आणि झेपावणाऱ्या धुळीचे पापुद्रे मागं रेंगाळत राहतात. त्यांचा एक पडदा तयार होतो. कुठं दाट. कुठं झिरझिरीत. एकत्र आलेले धुळीचे कण हळूहळू विरळ होत जातात. दडी मारून बसलेला रस्ता मगच दिसू लागतो. रस्त्यावरून उचलल्या गेलेल्या पावलाची काही ना काही खूण मागं राहिलेली असते. नुकत्याच सरलेल्या दीपोत्सवातील झगमगाटाच्या कित्येक खुणा अजूनही सगळीकडं पसरलेल्या आहेत. हसू मिटता मिटता स्मिताकाराचे वळसे दिसत राहावेत, तशा. दिवाळीतल्या बावनकशी आनंदाचं एक वेगळेपण असतं. त्याचे अनेक रेशीमस्पर्श दीर्घ काळ आपली सोबत करीत राहतात. हे स्पर्श आणि खुणा आपल्या मनांत आकाशदिवे लावत राहतात. त्यांच्या तेजांची झुंबरं दारात आनंदप्राजक्ताचे सडे घालतात. रांगोळ्यांची नक्षीदार आणि चित्रमय अंगणं मनांत खुली होतात. नव्या वस्तूंचं घरातलं अस्तित्व आठवणींची रिमझिम सुरू ठेवतं. दिवाळीत पहाटे अनुभवलेले सांगीतिक कार्यक्रम स्वरमोही दरवळ पसरवीत राहतात. असल्या सगळ्याच खुणा वत्सल आशीर्वादासारख्या असतात. कोणत्याही गोष्टीच्या मूळच्या अस्तित्वात खुणांचे कित्येक कवडसे लपलेले असतात. त्यांतून मूळ रूपाचा पुनःप्रत्यय मनात झिरपत राहतो.

नदीच्या दोन्ही काठांना जोडून घेतलेल्या तुडुंब पाणीसाठ्यांत पावसाच्या ओल्याचिंब खुणा दिसतात. आकाशाचा निळा रंग अंगावर ओढून घेतलेले पाऊसथेंब जमिनीवर उतरतात, तेव्हा कोंभांच्या शब्दांत आपल्या कवितांच्या खुणाही पेरतात. फुलांच्या गंधभरल्या खुणा दरवळाच्या रूपानं सगळीकडं वाहत राहतात; आणि त्या गंधधारा आपल्याला एका विलक्षण चैतन्याशी जोडतात. रंग, रेषा आणि आकार यांचा महोत्सव निसर्गात नेहमीच सुरू असतो. चित्रं आणि शिल्पं यांच्या रूपानं या महोत्सवाच्या खुणा मानवी संस्कृतीचं जतन करतात. शतकानुशतकांच्या इतिहासाचं अंतर त्या क्षणांत पुसून टाकतात. अंधाररात्रीच्या खुणा दिवसा सावल्यांच्या हालचालींत दडलेल्या असतात; तर दिवसाच्या खुणा रात्रीच्या तारकांनी ओंजळीत घेतलेल्या असतात. शब्दांच्या खुणा ध्वनींत; आणि ध्वनींच्या खुणा कंपनांत झंकारत असतात. शब्दांना नंतर अर्थांचा मोहर लगडतो; आणि माणसांचे परस्परांतील संवाद जगण्याचं तत्त्वज्ञान लिहीत राहतात.

सगळ्याच खुणांना बहुधा चिरंतनत्वाचं देणं लाभलेलं असतं. अशा निर्मितींच्या खुणा बदलत्या स्वरूपात पुढच्या काळाशी जोडल्या जात असतात. माणसं एकमेकांना शुभेच्छा देतात, तेव्हा तेदेखील अशा स्नेहशील खुणांचीच देवघेव करीत असतात. कुणी तरी केलेल्या सहकार्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण इतरांना मदतीचे हात देतो; तेव्हाही दातृत्वाच्या खुणाच ठळक करीत असतो. फुलं उमलतात, ती बीजांसंबंधीची आपली ऋणभावना व्यक्त करण्यासाठी. फुलंही तो धागा नव्या सर्जनापर्यंत नेऊन पोचवितात. हजारो वर्षं बरोबर घेऊन घट्ट होत गेलेली माणसांची संस्कृती म्हणजे रेषा आणि बिंदू यांची अविरत जोडणीच असते. दोन बिंदू जोडले जातात, तेव्हा रेषा साकारते; आणि त्या रेषेला पुढील नवा बिंदू साद घालीत राहतो. ती रेषा आपले हात पसरून त्यालाही सामावून घेते; आणि संस्कृतीला नवा आयाम जोडला जातो.

आयुष्यात मागं वळून पाहताना आपल्यालाही अनेकविध खुणा; आणि त्यांची जोडणी एवढंच दिसतं. आताचा हा क्षणसुद्धा आधीच्या क्षणाशी जोडलेलाच आहे. खुणांचे अनेकविध बिंदू जोडण्यासाठी आपल्या विचारांच्या आणि कृतींच्या रेषा मात्र सरळच हव्यात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com