गाता गळा, शिंपता मळा

मल्हार अरणकल्ले
गुरुवार, 6 जुलै 2017

आधी साधना करावी, तपश्‍चरण करावं आणि मग त्याचं यश पदरात घ्यावं; किंबहुना, निरपेक्ष साधना करणाऱ्या कुणालाही त्या साधनेचे काही ना काही लाभ मिळतातच. एखाद्या विषयात गती मिळविणं असो; उत्तम आरोग्य मिळविण्याचं उद्दिष्ट असो; कलेत पारंगत होणं असो किंवा गरजूंपर्यंत मदतीचे हात पोचविणं असो; त्याला रियाझासारखा सातत्याच्या प्रयत्नांशिवाय दुसरा मार्ग नाही

गायिकेच्या सुरांबरोबर वाद्यं जुळविली जात होती. एकेका वाद्याचे आरोह-अवरोह एकमेकांत मिसळत होते. उंचावलेले स्वर खाली येत होते. खालच्या पट्टीतले स्वर वर उचलले जात होते. तबल्याच्या बंदांना किंचित ताण देऊन किंवा ते सैल करून स्वरमेळाशी जोडले जात होते. एकातून दुसरा स्वर ओळखू येईनासा झाला... त्याच क्षणी गायिकेचा आलाप भवताल व्यापत गेला. त्या सुरेल कंपनांनी लक्षावधी झंकार-तरंग लहरत राहिले. उंचावणाऱ्या हातांची, डोलणाऱ्या मानांची, स्वरांचे कळीदार सौंदर्य डोळे मिटून साठवून घेणाऱ्यांची; आणि "वाह, क्‍या बात है!' अशी दाद देणाऱ्यांची विविधरंगी दर्शनं नंतर तिथं वारंवार दिसू लागली. निवळशंख स्वरांचे अनेक झरे आजूबाजूनं धावत येताहेत; आणि त्यांचा गाणारा हलका धबधबा मनात उतरतो आहे, असा दिव्य अनुभव अनेकांच्या ठायी जमा होत होता.

कोणताही रियाझ जितका श्रद्धेनं आणि अथकपणानं करावा, तेवढी यशाच्या तेजाला दिव्यत्वाची झळाळी लाभते. तेज चमकतंच; पण त्याला दिव्यत्वाचा स्पर्श झाला, तर ते अंतर्बाह्य प्रकाश देतं. गाण्याचा, सुरांचा रियाझ करणाऱ्याचा गळा सुरेल होत जातो; आणि मशागत करणाऱ्याचा, वेळच्या वेळी शिंपण करणाऱ्याचा मळा फुलत जातो. कुठलीही निवड करण्याच्या वेळी आपण "उत्तमात उत्तम' असलेल्याला प्राधान्य देतो. आयुष्यात आपल्या साऱ्याच अपेक्षा याच अत्युच्च दर्जाशी जोडलेल्या असतात. ते मिळण्याचा अधिकार आपल्याला असतो; पण त्यासाठीच्या रियाझाची किंमत चुकविताना अनेकदा आपण टाळाटाळ करतो. तशी वेळ आली, की कित्येकदा सबबी शोधत बसतो. छोट्या रोपट्यावर फूल उमलून यायलाही त्याचा विशिष्ट काळ जावा लागतो. त्यासाठी हवा-पाणी, अन्नरस यांची गरज असते. अनेकांना यश झटपट हवं असतं. त्यांच्याकडे वेळ कमी असतो; आणि संयमाचाही अभाव असतो. जशी मशागत, तसं पीक हा निसर्गनियम आहे. तो बदलण्याचा प्रयत्न आपण करतो; आणि यशाची वाट पाहण्यात कालापव्यय करीत राहतो.

यशाच्या, सुख-समाधानाच्या प्रत्येकाच्या कल्पना भिन्न असतात. सगळ्यांची धडपड त्यासाठीच सुरू असते; "आधी द्यावं; मग घ्यावं' हे व्यावहारिक तत्त्वही आपण जाणून घेत नाही. आधी साधना करावी, तपश्‍चरण करावं आणि मग त्याचं यश पदरात घ्यावं; किंबहुना, निरपेक्ष साधना करणाऱ्या कुणालाही त्या साधनेचे काही ना काही लाभ मिळतातच. एखाद्या विषयात गती मिळविणं असो; उत्तम आरोग्य मिळविण्याचं उद्दिष्ट असो; कलेत पारंगत होणं असो किंवा गरजूंपर्यंत मदतीचे हात पोचविणं असो; त्याला रियाझासारखा सातत्याच्या प्रयत्नांशिवाय दुसरा मार्ग नाही. भव्यतेचा प्रारंभ छोट्या बिंदूपासूनच होतो; आणि तेवढा बिंदू तर प्रत्येकाजवळ असतो. एका बिंदूतच सिंधुरूप सामावलेलं असतं. आपल्या ओंजळीतल्या बिंदूचं असं परिवर्तन व्हावंसं वाटत असेल, तर साधनेच्या आवर्तनांची आवश्‍यकता अनिवार्य आहे. त्यासाठी ओंजळीतल्या बिंदूचा शोध घ्यायला हवा.

Web Title: malhar arankalle writes about music