Central Vista
Central VistaSakal

राज आणि नीती : वास्तूरचना आणि वर्चस्ववाद

कर्तृत्वाचे प्रतीक म्हणून महाकाय वास्तू उभारण्याचे दिवस संपले आहेत. ज्यांनी तसे प्रयत्न केले, त्यांना यश आलेले नाही. लोकशाहीत विवेकबुद्धीने जनहिताचे निर्णय घेणे अधिक महत्त्वाचे असते.

कर्तृत्वाचे प्रतीक म्हणून महाकाय वास्तू उभारण्याचे दिवस संपले आहेत. ज्यांनी तसे प्रयत्न केले, त्यांना यश आलेले नाही. लोकशाहीत विवेकबुद्धीने जनहिताचे निर्णय घेणे अधिक महत्त्वाचे असते.

वास्तूरचनेचे फॅसिझमला चमत्कारिक असे आकर्षण आहे. १९३३ मध्ये हिटलर जर्मनीमध्ये सत्तेवर आल्यावर हजारो वर्षांच्या जर्मन राष्ट्रासाठी नवीन राजधानी वसवण्याची योजना अंमलात आणणे सुरू केले. बर्लिनच्या फेरउभारणीला सुरवात करून त्याने त्याचे जर्मेनिया नामकरण करायचेही ठरवले होते. १९२०च्या आसपास, ज्यावेळी हिटलर क्षितीजावरदेखील नव्हता, तेव्हाच त्याच्या मनात जर्मेनियाच्या उभारणीची ब्ल्यूप्रिंट आकार घेत होती. त्याचा ‘माईन काम्फ’मध्ये उल्लेखदेखील आढळतो. हिटलरला ज्या प्रशस्त इमारती उभारायच्या होत्या, त्याचे आराखडेही त्याने बनवलेले होते. हिटलर मनातल्या मनात त्याच्या डोळ्यासमोर तो एक मोठा शासक असण्यासोबतच अमर्त्य रचनाकार आहे, असे आणत असे. १९३६च्या वसंतात ॲडॉल्फ हिटलरने आपला लाडका आर्किटेक्‍ट अल्बर्ट स्पेआ याला आपल्या कल्पनेतील महानगरी वसवण्यासाठी कार्यान्वित केले, जे आगामी काळात त्याचे सत्ताकेंद्र असेल. हाच स्पेआ शस्त्रास्त्र खात्याचा मंत्री झाला.

हिटलरने ठरवलेले होते की, जर्मेनिया, जी आगामी काळात त्याच्या नाझी राष्ट्राची आणि संपूर्ण जगाचीच राजधानी असेल, तिची उभारणी १९५०पर्यंत पूर्ण करायची होती. १९३४पासून स्पेआ नाझींचा अप्रत्यक्षरीत्या वास्तूरचना महासंचालकच होता. त्याने विदेशी अभिजात वास्तूरचनेचे रूपांतर महाकाय आणि काहीसे इतरांना आव्हान देणारी, त्यांच्यावर अधिसत्ता दाखवणाऱ्या नाझी वास्तूरचनेत करून हिटलरवर छाप पाडलेली होती. स्पेआच्या कल्पनेतून आकाराला आलेल्या भव्यदिव्य रचना १९३४ मध्ये नाझी पक्षाच्या काँग्रेससाठी साकारलेल्या न्युरेम्बर्ग परेड ग्राऊंडच्या उभारणीतून स्पष्ट झाल्या होत्या. या अभिजात वास्तूचनेच्या भव्यदिव्यतेचा परिणाम नाझी माहिती आणि प्रोपगंडा यंत्रणेचा प्रभावी प्रमुख जोसेफ गोबेल्स याने नंतरच्या काळात साकारलेल्या विविध चित्रपटातून दिसतो.

नाझींची शिस्त, त्यांच्या क्षमता, वर्चस्व आणि नेत्यांविषयीचे समर्पण व एकनिष्ठा यांची प्रचिती देण्यासाठीचा विचारही या रचना करताना अग्रक्रमाने केलेला आहे. या वर्चस्वदर्शक वास्तूरचनेमागील राजकीय हेतू हा जगाला हे दाखवणे होते की, आम्ही शक्तिमान आहोत. एक लोक, एक राष्ट्र आणि एक समृद्ध जर्मनी अशी एकात्मतेची जाणीव देणे आणि तसे भासवणे हा या वास्तूरचनेतला प्रभावाचा आणि वर्चस्वाचा भाग होता. याच्यावरच हिटलर सातत्याने भर द्यायचा. तो एकात्मता सांगायचा आणि आंधळेपणाने जर्मन राष्ट्रवादाचे पालन करायलाही सांगायचा. गेली काही दिवस झाले आपण एक नेता, एक देश आणि एक निवडणूक हा नारा ऐकत आहोत. त्याच्यात आणि याच्यात काही साम्य वाटते की नाही? बर्लिनला समृद्ध जर्मनी राष्ट्रातील महान शहर करण्याचे हिटलरच्या मनात होते, तसे तो पाहात होता. त्याने स्वतःला कितीही चांगले भासवण्याचा प्रयत्न केला तरी, त्याने शेवटी जे काही केले, ते त्याचे स्वतःचे असे काही नव्हते. ती होती दुसऱ्याची केवळ नक्कलच. त्यांचे स्वतःचे असे कार्य एवढेच की, त्यांनी युरोपातील अत्यंत गाजलेल्या वास्तूंच्या वैशिष्ट्यांची सांगड घालून भव्यदिव्य स्वरूपात त्या साकारल्या होत्या.

हिटलर वास्तू आणि वास्तूरचनेला खूप महत्त्व देत होता आणि त्याचा वापर फसवा दरारा, भीतियुक्त आदर आणि धक्कातंत्रासाठी करत. राजकीय वर्चस्व दाखवून देण्यासाठी तो अशा महाकाय वास्तूरचनेचा शस्त्रासारखाच वापर करू पाहात होता. त्याच्यासाठी वास्तूरचना ही फक्त जागा भरण्यासाठी नव्हे; तर शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रभावी मार्ग होता. या बढाईखोर प्रकल्पासाठी अंदाजित खर्चाचे नियोजन होते ते ४-६अब्ज जर्मन मार्क त्यावेळी, म्हणजे आजच्या हिशेबाने ५०अब्ज अमेरिकी डॉलर. तेव्हाच्या युद्धाच्या काळात या प्रकल्पासाठी एवढा मोठा खर्च अशक्‍यप्राय वाटत असूनही हिटलरने खर्चाच्या तोंडमिळवणीकडे साफ दुर्लक्ष केले. स्वतः श्रेष्ठ असल्याच्या भ्रामक कल्पनेसमोर त्याला चिंता होती ती फक्त स्वतःचे वर्चस्व सिद्ध करण्याचीच आणि त्याला वाटे की, काळाच्या इतिहासात स्वतःचे नाव सुवर्णअक्षरात लिहिणे हे केवळ भव्यदिव्य वास्तूरचनेतून आणि स्मारकांमधूनच शक्‍य आहे.

स्वतःचे चिरस्थान निर्माण करण्यात आणि आपल्या सत्तेचा विस्तार करण्यात अशा प्रोपगंडा यंत्रणा वापरणारा नाझी हा पहिलाच पक्ष होता. या प्रोपगंडा यंत्रणेचा सूत्रधार जोसेफ गोबेल्सचे असे म्हणणे होते की, ज्या दिवशी हा प्रोपगंडा जनतेच्या लक्षात येईल, त्या दिवशी हे सगळे प्रयत्न निरूपयोगी ठरतील. ही गोष्ट लक्षात घेता, मुद्दामहून नाझी पक्षाने असे पसरवले की, जैसे थे स्थितीला विरोध करून त्यात ते परिवर्तन आणू पाहात होते, हे करताना त्यांनी त्यांच्या नेत्याला अधोगतीला लागलेल्या अभिजनांसाठी एक बाहेरचा आणि सर्वसामान्यांसाठी एक मसिहा असे दाखवण्याचा प्रयत्न केला. या परिस्थितीची आपण नवी दिल्लीतील ल्यूटन्स भाग आणि खान मार्केट येथे जे सुरू आहे, त्याच्याशी सांगड घालू शकत नाही का? हे सगळे करणारे फक्त नाझीच नव्हते. इटलीचा फॅसिस्ट हुकूमशहा बेनिटो मुसोलिनीनेही इमारती उभ्या करण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रमच राबवला होता.

स्मारकांना पूर्वी संस्कृतीचा आविष्कार, मूल्ये, कर्तबगारीचे, गुणवत्तेचे प्रतीक म्हणून पाहात, पण त्याचे हे महत्त्व छपाईच्या शोधानंतर कमीकमी होत गेले. एखाद्या संस्कृतीचा गाभा, त्याची क्‍लिष्टता, विविधता दर्शवणारे ग्रंथ त्या संस्कृतीचे प्रतिनिधीत्व करू लागले. लोकांचे विचार आणि कल्पना, आशा व आकांक्षा दर्शवण्यासाठी मोठमोठ्या आणि महागड्या वास्तूरचनेपेक्षा शब्दरचनांतून व्यक्त होऊन जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही सहज, स्वस्त स्वरूपात मिळणाऱ्या ग्रंथांनी आणि पुस्तकांनी ते काम अत्यंत प्रभावीपणे पार पाडले जातंय.

सर्वात मोठी चूक!

याच कारणामुळे आधुनिक भारताच्या संस्थापक वडीलधाऱ्यांनी समानता, बंधूभाव आणि न्याय यांच्या प्रस्थापनेचे ध्येय बाळगत त्यासाठी वास्तूरचना नव्हे तर एका वंदनीय ग्रंथाची मदत घेतली. तो ग्रंथ जो भारतभरातील सर्वोत्तम अशा ३०० महनीय व्यक्तींनी तीन वर्षे एकत्रित बसून, व्यापक चर्चेअंती आकाराला आणलेला भारताचा सगळ्यात मोठा ठेवा -भारताची राज्यघटना. लोकशाहीवादी विचारांचे सण-उत्सव साजरे करतात. न्याय आणि समानतेसाठी युद्ध पुकारतात. सर्जनशीलतेचे आनंदोत्सव साजरे करतात. ज्यामध्ये सर्व लोक समानतेच्या पातळीवर येऊन सहभागी होवू शकतात. फक्त भ्रामक समजुतीत अडकलेले फॅसिस्ट, राजेरजवाड्यांची मानसिकता असलेल्या हुकूमशहांनाच त्यांच्या जनतेला गुडघ्यावर आणण्यासाठी मोठमोठ्या स्मारकांची गरज वाटते.

फॅसिस्ट विचाराच्या मंडळी मोठमोठ्या स्मारकांनी, वास्तूंच्या उभारणीने आधुनिकतेतून आकाराला आलेल्या स्वातंत्र्याला, विवेकबुद्धीला कमी लेखू पाहतात. हेच आपल्याला सध्या काम सुरू असलेल्या सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पातून पाहायला मिळते, तेही जागतिक महासाथीने घेरलेले असताना आणि देशाला प्रचंड मोठी किंमत मोजावी लागलेली असताना. हाती घेतलेले धडाकेबाज प्रकल्प आणि चालवलेली मनमानी ही सरकारच्या अनेक चुकांमधील एक सर्वात मोठी चूक आहे. त्यांच्या या चुकीच्या निर्णयांचे परिणाम आपला देश गेली सात वर्षे भोगत आहे. अखेरीस, आपल्या प्राचीन संस्कृतीच्या परंपरा दर्शवणाऱ्या ग्रंथात (राज्यघटनेत) या मोठेपणा सांगणाऱ्या सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाची किंमत पानभरदेखील नसणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com