स्वतःला साठवूया पुस्तकांच्या पानात

mansi vaidya
mansi vaidya

#यूथटॉक
मी  शाळेत असताना, ‘तुमचा आवडता छंद कोणता’ या प्रश्नाला ९९ टक्के वर्गाचं उत्तर असायचं, ‘वाचायला आवडतं.’ पुस्तकांनी भरलेली कपाटं, गर्दीनं गजबजलेली पुस्तक प्रदर्शनं हे दृश्‍य आजही दिसतं; पण लहानपणी ‘वाचायला आवडतं’ असं सांगणारा आजचा तरुण वर्ग या दृश्‍यात तितकासा आढळत नाही, ही काहीशी चिंतेची बाब आहे. ‘वाचणं, लिहिणं यासाठी वेळच मिळत नाही,’ अशी बहुतांश लोकांची तक्रार असते. आजची वेगवान जीवनशैली पाहता, ते खरंही आहे. पण वाचन आपल्या जगण्याचा भाग बनतं, तेव्हा त्यासाठी लागणारा वेळ आपोआपच मिळतो.

जग बदलतंय... घडणाऱ्या बदलांना सामोरं जाताना, स्वतःला सिद्ध करण्यासाठी झगडताना, लवकर यशस्वी होण्याच्या इतरांच्या आणि स्वतःच्या अपेक्षा पूर्ण करताना तरुणपिढी भोवतालापासून दुरावून अधिकाधिक स्वतःत गुंतत चाललीये. पूर्वी पुस्तकांच्या दुकानात जाऊन पिशव्या भरभरून पुस्तकं घरी आणण्याचा, एक एक पुस्तक भराभर वाचून संपवण्याचा साधासा आनंद आज खूप कमी जणांना मिळतो. (ताज्या बातम्या मोबाईलवर मिळवा, 'सकाळ'चे App डाऊनलोड करा) पुढच्या पिढ्यांना पुस्तकांचा हा स्पर्श अनुभवता येईल काय? की त्यांच्यासाठी पुस्तकं फक्त एक वस्तू बनून जातील? इतर निर्जीव वस्तूंसारखी? हे तितकंसं बरं चित्र नाही. पुस्तकं मात्र हे सगळं कोडं सोडवतील. पुस्तकं आपल्याला जगाशी, भोवतालाशी जोडून ठेवतील.

ही झाली एक बाजू, पण दुसरीकडे वेळात वेळ काढून जमेल तसं वाचणारा हौशी तरुण वाचकांचाही गट आहे. आजची स्थिती पाहता, समाजाला गरज आहे, ती संवेदनशील तरुण पिढीची. ही संवेदनशीलता, समाजाचा एक घटक म्हणून असलेल्या जबाबदारीची जाणीव, या गोष्टी पुस्तकांमुळे सहजपणे आपल्या व्यक्तिमत्त्वाचा भाग होतील.

आभासी जग, इंटरनेट, व्हिडिओ गेम्स या गोष्टींचा तरुणाईवर काहीसा पगडा आहे, नाही असं नाही; पण याच गोष्टीचा फायदा तरुणांपर्यंत अधिकाधिक पुस्तकं पोचावीत म्हणूनही करता येईल. Storytel, Anybooks सारखे ॲप्स, ब्लॉग्स वेगानं लोकप्रिय होत आहेत. हे चित्र आश्वासक आहे. Kindle सारख्या कुठंही आणि कितीही पुस्तकं वाचण्याच्या सोयीमुळे पुस्तकं आणि वाचक यांच्यातलं अंतर कमी झालंय. माध्यमं कितीही बदलली, तरी पुस्तकं मात्र तीच आहेत. पुस्तकं जगण्याचं भान देतात. पुस्तकांचं जग आपल्याला सहज सामावून घेतं.

पुस्तकं आज चित्रपटाच्या माध्यमातूनसुद्धा भेटतात. ‘ऑडिओ बुक्‍स’ ही संकल्पनासुद्धा लोकप्रिय आहे. मध्यंतरी आलेली कविता महाजनलिखित ‘कुहू’ ही कादंबरी, ‘पासवर्ड’चे ऑडिओ अंक हे याचंच उदाहरण. कवितांची आवड नव्या पिढीत रुजावी म्हणून करण्यात आलेला ‘कवितेचं पान’सारखा अनोखा उपक्रम धावपळीच्या, रूक्ष रुटीनमध्येसुद्धा कवितेचा ओलावा आणतोच. पुस्तकं म्हटली की, त्यातही अनेक प्रकार आलेच. कोणाला कथा भावते, तर कोणाला कादंबरी. कोणासाठी कविता जिव्हाळ्याचा विषय असतो, तर कोणाला चरित्रं आवडतात. आपल्या अस्तित्वाचा शोध घेण्यासाठी प्रत्येक जण प्रवास करत असतो. या प्रवासात पुस्तकं आपली सोबत करतात. पुस्तकांशी आपल्याही नकळत आपण अनामिक धाग्यानं जोडले जातो. प्रत्येक पुस्तकात आपण आपल्यातलं काहीतरी साठवत असतो. खूपदा आपल्यातच दडलेल्या कितीतरी गोष्टी शोधायला पुस्तकं मदत करतात. कपाटात बंद असलेल्या पुस्तकांची पानं कितीतरी मोठं, सुंदर जग खुलं करू पाहत असतात. गरज असते, ती फक्त त्यांना थोडासा वेळ देण्याची!

तंत्रज्ञानानं जग जवळ आणलंय, तसंच लेखक आणि वाचकही जवळ आणले आहेत. या गोष्टींचा पुरेपूर वापर करणारा तरुणवर्गही आहे, ही आशादायक बाब आहे. तरुण वर्ग वाचता होणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच उद्याच्या तरुणांचीसुद्धा पुस्तकांशी मैत्री होणं गरजेचं आहे. सरकार, शाळा, कॉलेज, पालक यांच्या एकत्रित प्रयत्नांतून हे शक्‍य होईल. याचं अलीकडचं उदाहरण म्हणजे, साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी केलेलं जाहीर आवाहन. पन्नासहून अधिक पुस्तकं एका वर्षात वाचणाऱ्या छोट्या वाचकांचा सन्मान करण्याच्या या उपक्रमावरून प्रेरणा घेऊन पुण्यातील ‘ज्ञानप्रबोधिनी’नं अशा वाचकांची यादी मागवली. याला उत्तम प्रतिसाद मिळाला आणि सतरा वाचनवेड्यांचा सन्मान करण्यात आला. या व अशा उपक्रमांमुळे आजची तरुणाई वाचन आणि पुस्तकं विसरणार नाही, अशी खात्री वाटते. इतकच वाटतं,

आभाळभर पुस्तकं, ओंजळभर आपण...
सरणाऱ्या वेळेसोबत रोज थोडे थोडे खर्च होत असतो.
खर्च होऊन जाण्याआधी स्वतःला थोडं साठवूया,
आपल्याला सामावून घेण्यासाठी आसुसलेल्या
पुस्तकांच्या पानांत...
थोडक्‍यात, लिहित्या हातांना वाचणारे डोळे मिळोत आणि वाचत्या मनात प्रतिभेचे अंकुर उमलोत!
(लेखिका सोलापुरातील अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनी आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com