अकोल्याचे मराठा हॉटेल; सुरतचे भरत-दक्षा दाम्पत्य

अकोल्याचे मराठा हॉटेल; सुरतचे भरत-दक्षा दाम्पत्य

नोटाबंदीचा ऐतिहासिक निर्णय घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांच्या हल्ल्याला सामोरे जाण्याची दिशा आता निश्‍चित केलीय. "पंतप्रधानांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात बोलावंच', असा आक्रोश विरोधकांनी उभा केल्यानंतर अन्‌ राज्यसभेत तासभर दर्शन दिल्यानंतर ते किमान चार ठिकाणी नोटबंदीच्या मुद्यावर जाहीरपणे बोलले. जगात असंच घडत आलंय. बहुतेक लोकप्रिय नेते अंतर्गत किंवा बाह्य विरोधकांचा सामना करताना राजकीय व्यवस्थेबाहेर जाऊन थेट जनतेशी संवाद साधतात. मोदी त्याच वाटेवर आहेत. त्यातून काही चांगलं घडलं, तर ते देशाला हवंच आहे.

दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी नरेंद्र मोदी "मन की बात'च्या रूपाने थेट जनतेला उद्देशून भाषण करतात. कालच्या त्यांच्या संवादातून नोटाबंदीसंदर्भातील त्यांची दिशा पूर्ण स्पष्ट झाली. भारत हा तरुणांचा देश आहे आणि "कॅशलेस सोसायटी', "डिजिटल ट्रॅन्झक्‍शन्स' वगैरे गोष्टी तरुणांनाच चांगल्या कळतात. तेव्हा, मोदींनी या तरुणाईलाच "मन की बात'मध्ये हाक दिली. तरुण हे बदलाचे, परिवर्तनाचे वाहक असतात. तेव्हा, प्रत्येक तरुणाने "माय मोबाईल, माय बॅंक, माय वॉलेट'ची कार्यपद्धती अन्य दहा जणांना शिकवली तर देशात "कॅशलेस सोसायटी'चे स्थित्यंतर आल्याशिवाय राहणार नाही, हा विश्‍वास व्यक्‍त करून ही धुरा तरुणाईने खांद्यावर घ्यावी, असे आवाहन मोदींनी केलं.
लग्न किंवा अन्य समारंभांवर लोकांनी उधळपट्टी करू नये, ते साधेपणाने करावेत, हे सांगणारे कितीतरी मोठे लोक होऊन गेले. सामूहिक विवाहसोहळ्याच्या रूपाने त्यातूनच समाजसेवेचा एक मार्गही प्रशस्त झाला. पण, अशा समारंभाच्या निमित्ताने संपत्तीचे बटबटीत दर्शन घडविणे काही थांबेना. नोटाबंदीच्या निर्णयानंतर जे उपाय राबविले गेले; त्यात या लग्नावरील खर्चाचा उपाय खूपच ठळक होता. "लग्नपत्रिका दाखवा अन्‌ अडीच लाख काढा', ही योजना तिच्यातल्या जाचक अटींनी गाजली. "बेटी का ब्याह, मोदी क्‍या जाने?' अशी टीका झाली; पण महत्त्वाचे म्हणजे आता अन्य काही उपाय नाही म्हटल्यावर नाईलाजानं अनेक जण साधेपणानं विवाह उरकायला लागलेत. भरतभाई व दक्षाबेन या सुरतच्या नवपरिणत दाम्पत्याबाबतही असंच घडलं. लग्नाच्या खर्चासाठी हाती पैसाच नाही म्हटल्यावर दोघांच्या कुटुंबीयांनी चहापाण्यावर लग्न उरकले. सध्याचं वातावरण नोटामय असल्यानं या लग्नाची चर्चा खूप झाली. छायाचित्रं "व्हायरल' झाली. "चाय पे चर्चा'वाल्या मोदींनी "मन की बात'मध्ये या "चाय पे शादी'ची दखल घेतली. उपचार घेत असलेल्या रुग्णाला दवाखान्यात जाऊन नोटा देणाऱ्या बॅंक कर्मचाऱ्यांचंही पंतप्रधानांनी कौतुक केलं.

अशीच आणखी एक दखल विदर्भातील अकोल्याच्या हॉटेलची घेतली गेली. ते "मराठा फॅमिली रेस्टॉरंट' बाळापूर शहराबाहेर राष्ट्रीय महामार्ग क्र. 6 वर आहे. ""पैसे नसतील तरी जेवण करा. पुढच्या वेळी पैसे द्या'', असा फलक हॉटेलचे मालक मुरलीधर राऊत व संदीप पाटील यांनी लावला. त्याचं सर्वत्र जोरदार कौतुक झालं. त्यावर कळस चढवला गेला तो "मन की बात'मध्ये पंतप्रधानांनी या औदार्याचा उल्लेख केल्यामुळं.

नोटाबंदी अन्‌ विरोधबंदीही...
पाचशे व हजारच्या नोटा बंद करण्याच्या निर्णयानंतर देशभर निर्माण झालेल्या गोंधळाचा निषेध म्हणून विरोधी पक्षांनी आज ( सोमवारी) आक्रोश किंवा जनाक्रोश दिनाची हाक दिली आहे. हा "भारत बंद' असल्याचा प्रसार विरोधकांपेक्षा मोदींच्या समर्थकांनीच जास्त केला. गेले चार दिवस त्यावरून "सोशल मीडिया'त धुमाकूळ सुरू आहे. "मी "भारत बंद'मध्ये सहभागी होणार नाही. माझा मोदींच्या निर्णयाला पाठिंबा आहे', अशा आशयाचे असंख्य संदेश फिरत आहे. मोदींचे समर्थक विरोधकांवर तुटून पडले आहेत. मोदींनी नोटबंदीसोबतच त्या निर्णयाला विरोधबंदीही जाहीर केलीय की काय, असा प्रश्‍न पडण्यासारखं वातावरण आहे. सत्ताधाऱ्यांचा एखादा निर्णय, धोरण पटलं नाही तर त्याला संसदीय मार्गाने विरोध करण्याचा हक्‍क लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आहे. परंतु, हे मतस्वातंत्र्य मोदी समर्थकांना मान्य नाही. ""भारत बंद'ची गरजच काय, तसाही मोदींनी तो बंद केलाय', असं सांगत ममता बॅनर्जींसह प्रमुख विरोधी नेत्यांनी हा "आक्रोश दिन'च असेल, असे स्पष्ट केले. तेव्हा, "बघा, विरोधक घाबरले', असा दावा मोदींचे समर्थक करताहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com