निःशब्द एल्गार (अग्रलेख)

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 सप्टेंबर 2016

मराठा समाजाच्या मूक मोर्चांमुळे राज्यातील समाजजीवन ढवळून निघाले आहे. विनानेता, विनागोंधळ, विनाघोषणाबाजी व शिस्तबद्ध आंदोलनातून मराठा समाजाच्या मनातील खदखद समोर आणली आहे. त्याची दखल राजकीय लाभहानीच्या पलीकडे जाऊन घ्यावीच लागेल.

यच्चयावत मराठा समाज आज महाराष्ट्राच्या रस्त्यांवर उतरला आहे. गावांमागून गावांत काढण्यात येत असलेल्या "क्रांती मोर्चा'मध्ये लाखांच्या घरात मराठे सामील होत आहेत. त्यात महिला, मुली आघाडीवर आहेत. पुण्यातील रेकॉर्ड ब्रेक गर्दीच्या मोर्चाने राज्यभर सुरू असलेल्या मोर्चांचा एक टप्पा पार पडला आहे. या वळणावर समाजाच्या मागण्या आणि त्यावरचे उपाय यावर विनाविलंब निर्णय करण्याची आवश्‍यकता आहे. आपला परंपरागत आक्रमक बाज या मोर्चांच्या निमित्ताने या समाजाने आरपार बदलून टाकला आहे आणि कोणत्याही आगलाव्या घोषणांविना त्याने आपली ताकद दाखवत, महाराष्ट्रात काही संघटना रुजवू पाहत असलेल्या "खळ्ळ खटॅक' संस्कृतीला पुरता छेद दिला आहे. हा अनेक अर्थांनी निःशब्द एल्गार आहे आणि आपली ताकद व एकजूट दाखवताना, या समाजाने जो काही संयम बाळगला आहे, त्याबद्दल आंदोलकांचे अभिनंदन करायला हवे. महाराष्ट्रात जवळपास 35 टक्‍के असलेल्या या समाजाच्या काही मागण्या आहेत आणि त्यात मराठा समाजाला शिक्षण व नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळावे या मागणीबरोबरच कोपर्डीतील अमानुष बलात्कार व हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, ही मागणीही आहे. तसेच ऍट्रॉसिटी कायद्यात सुधारणांचीही मागणी आहे. गेल्या दोन दशकांत आपल्याकडच्या शेतीची जी दुरवस्था झाली, त्यामुळे त्यावर अवलंबून असणाऱ्या फार मोठ्या समूहाची वेदना या आंदोलनातून मुक्रर झाली आहे. तो मूक असूनही एवढा प्रभावी ठरला, की त्याची दखल सरकारला घेणे भाग पडले आहे आणि त्यामुळेच देवेंद्र फडणवीस हे पुन्हा पुन्हा प्रश्न सोडवायची तयारी असल्याचे सांगत आहेत, तर आंदोलक ठोस कृतीची अपेक्षा करीत आहेत.

या मोर्चांमुळे गेल्या काही दिवसांत महाराष्ट्राचा सारा अजेंडाच बदलून गेला आहे आणि त्यामुळे आरक्षणाचा प्रश्‍न ऐरणीवर आला असला, तरी या मोर्चांची ताकद त्यापलीकडची आहे. सनदशीर मार्गाने निघणाऱ्या या मोर्चांनी एका अर्थाने पारंपरिक झापडबंद पद्धतीने आंदोलनांना प्रतिसाद देण्याची प्रक्रियाच नाकारली आहे. आपल्या मागण्या लोकप्रतिनिधींमार्फत सरकार दरबारी पोचवायच्या आणि विधिमंडळात त्यावर चर्चा घडवून आणायची, ही आजवर चालत आलेली रीत या मोर्चांनी धुडकावून लावत लोकप्रतिनिधींना थेट शेवटच्या रांगेत नेऊन उभे केले आहे. यात राजकीय वर्गाविषयी जो अविश्‍वास दिसत आहे, तो सर्वच पक्षांना आत्मपरीक्षण करायला लावणारा आहे. मराठा समाजातील आक्रोशाची दखल घेण्यात सारीच राजकीय व्यवस्था आणि समाजातले धुरीण कमी पडले हे तर स्पष्टच आहे. आता मोर्चांच्या मौनातून तयार झालेला आवाज संपूर्ण व्यवस्थेला हाच विषय केंद्रस्थानी आणण्यास भाग पाडतो आहे. आजवर देशभरात कोठेही आणि कोणत्याही मागण्यांसाठी निघणारे मोर्चे कोणत्या ना कोणत्या पक्ष-संघटनेचे बॅनर हातात घेऊन, कोणा न कोणा नेत्याच्या नेतृत्वाखाली निघत होते. या मोर्चाला नेतृत्व लाभले आहे ते साऱ्या मराठा समाजाचे! त्यामुळेच औरंगाबादमधील पहिल्या मोर्चानंतर वाढत जाणारी ताकद बघून आता सर्वपक्षीय मराठा नेते सामील होताना दिसत आहेत. तरीही नेतृत्व मात्र या समाजाकडेच राहिले आणि तेच या मोर्चांचे आगळेवेगळे महत्त्व आहे. कोपर्डीच्या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर या मोर्चांची सुरवात झाली आणि ऍट्रॉसिटी कायद्यातील सुधारणांची मागणी असली तरी मराठ्यांचे हे आंदोलन कोणत्याही जातीविरोधात, समूहाविरोधात नाही. ते तसे होणार नाही याची काळजी, मोर्चाचे रूढ पठडीतले नसलेले संघटक घेत आहेत, हेही लक्षणीय. आंदोलनातही आपण राज्यातला सर्वात मोठा समूह आहोत ही थोरल्या भावाची भूमिका मराठा विसरला नाही, याची नोंद घ्यायलाच हवी.

या मोर्चांनी महाराष्ट्रातील समाजजीवन आरपार ढवळून निघाले आहे. मोर्चाच्या मागण्या एव्हाना सर्वांपर्यंत पोचल्या आहेत. तो कोणा राजकीय पक्ष अथवा नेत्याच्या विरोधात नाही आणि कोणाच्या बाजूनेही नाही, हे पचायला सुरवातील पठडीबाज चष्म्यातून पाहणाऱ्यांना जड गेले तरी सर्वपक्षीय नेत्यांनी मोर्चात यायचे तर समाजाचे घटक म्हणून. या पक्ष नेतृत्वाच्या झुली बाजूला ठेवा हे ठणकावण्याचा कणखरपणा समाजाने दाखवला आहे. त्यामुळेच राज्यातील सत्ताबदलाचा आणि आंदोलनाचा संबंध लावण्याचा प्रयत्न वास्तवाशी काडीमोड घेण्याचेच निदर्शक आहे. आता आंदोलन राज्यभर पसरल्यानंतर त्याची धग सरकारलाही जाणवायला लागली आहे. यात अन्य मागण्या- अपेक्षांसोबतच रोजगार व्यवसायाच्या आक्रसलेल्या संधी हाही मुद्दा आहे. लाखोंत जमाणाऱ्या तरुणांच्या मनातली याविषयीची खदखद मोर्चाने जगजाहीर केली आहे. त्याचीही राजकीय लाभहानीच्या गणितांपलीकडे जाऊन दखल घ्यायला हवी. या मोर्चांमध्ये सामाजिक बदल घडविण्याची ताकद तर निश्‍चितच आहे; हे कसे घडते, ही अत्यंत कळीची बाब ठरणार आहे. सर्वपक्षीय प्रस्थापित नेतृत्वालाही मोर्चाने हादरे दिले आहेत. कधी नव्हे तो सकल मराठा समाज रस्त्यावर उतरतो आहे. राज्यभर घोंघावणारे हे वादळ राजधानी मुंबईतही धडकणार आहे. तोवर या मूक आक्रंदनाची कृतिशील दखल जितक्‍या लवकर घेतली जाईल तेवढे राज्याच्या भल्याचे आहे.

Web Title: Maratha Kranti Morcha