फॅडग्रस्ताची कैफियत! (ढिंग टांग)

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 मार्च 2018

""बाप रे!'' आम्ही धक्‍का बसल्यासारखे दाखवले. ""कुणी जवळचे नातलग आहेत का इथं?'' त्यांनी हळूवार आवाजात विचारले. नातलग आहेत; पण आमच्याशी ते आणि आम्ही त्यांच्याशी इतक्‍या हळूवार आवाजात बोलत नाही, असे सांगणार होतो; पण काही बोललो नाही. 

बातमी तितकीशी बरी नाही; पण आपल्या माणसापासून काय लपवायचे? कुठे बोलू नका; पण आम्हाला (किनई) "फॅड' याने की "फेसबुक ऍडिक्‍शन डिसॉर्डर' ही असाध्य बीमारी जडली आहे. कालच रिपोर्ट आले...डॉक्‍टरांकडे गेलो होतो. त्यांनी आधी आमच्याकडे बघून "बसून घ्या', असे सांगितले. आम्ही खुर्चीचे हात घट्‌ट पकडून बसलो. ""एक वाईट बातमी आहे, एक चांगली...कुठली आधी सांगू?'' डॉक्‍टर म्हणाले. ""आधी चांगली सांगा!,'' आम्ही. माणसाने हमेशा सकारात्मक राहावे. कुजका शेंगदाणा खाल्ल्यानंतर निरोगी शेंगदाणा खाल्ला तरी तो कुजकाच लागतो, हा सापेक्षतेचा सिद्धात आम्ही कोळून प्यालो आहो. ""तुम्हाला "फेसबुक ऍडिक्‍शन डिसॉर्डर' नावाचा रोग झाला आहे...बॅड लक!,'' रिपोर्टवर टिचकी मारत डॉक्‍टर म्हणाले. 

""बाप रे!'' आम्ही धक्‍का बसल्यासारखे दाखवले. ""कुणी जवळचे नातलग आहेत का इथं?'' त्यांनी हळूवार आवाजात विचारले. नातलग आहेत; पण आमच्याशी ते आणि आम्ही त्यांच्याशी इतक्‍या हळूवार आवाजात बोलत नाही, असे सांगणार होतो; पण काही बोललो नाही. ""विमा वगैरे उतरलाय का?,'' डॉक्‍टर. त्यांच्या डोळ्यात वेगळीच चमक दिसली. गृहस्थाचे इस्पितळसुद्धा आहे!! 

""नाही...अहो; पण चांगली बातमी आधी सांगणार होतात ना?'' आम्ही कळवळून म्हणालो. आमच्याकडे सपशेल दुर्लक्ष करून त्यांनी ह्या आजाराची माहिती दिली. ती ऐकून तर आम्हाला "फीलिंग सॅड' असे स्टेटस टाकावेसे वाटू लागले. मित्रहो, फॅड हा एक टेरिफिक आजार आहे. अन्य गंभीर आजारांमध्ये मनुष्य आयुष्यातून उठतो; पण ह्या बीमारीने मनुष्यमात्र आयुष्यात "बसतो.' हा एक संसर्गजन्य रोग असून, तो मोबाइल फोनद्वारे पसरतो, असे निदर्शनास आले आहे. अर्थात फॅडग्रस्तांचा आजार बरा करण्याचे काही मार्ग आहेत; पण आजारापेक्षा इलाज थोडा हिंस्त्र आहे. आमच्या वळखीच्या एका फॅडग्रस्त मुलाच्या बापाने त्याचा रोग सुमारे आठ-दहा मिनिटांत सोडविला. हा इलाज केल्यानंतर तीनेक महिने त्याला हाडवैद्याकडे नियमित उपचार घ्यावे लागले. असो. 

ह्याहूनही भयानक गोष्ट म्हंजे फेसबुकावरील आपली माहिती परस्पर दुसऱ्याला विकून तिसऱ्याने त्याचा गैरवापर करून चौथ्याला निवडणुकीत जिंकवता किंवा हरवता येते, हे कळल्यानंतर तर आम्हाला फीलिंग अँग्री वाटू लागले. 
केंब्रिज अनालिटिका नावाच्या परदेशी कंपनीने काही फेसबुक खात्यांची माहिती राजकीय पक्षांना विकून निवडणुकांमध्ये हेराफेरी केल्याचे डॉक्‍टर म्हणाले. उदा. "कोकणातील आंबा आला...अहाहा!!' अशी माहिती तुम्ही फेसबुक भिंतीवर टाकली रे टाकली की त्याचे अनालेसिस होते.

सदरील मनुष्य आंब्यासाठी आसुसलेला असून त्याला तो परवडण्याजोगा नसल्याने उगीचच भाव मारतो आहे, असा निष्कर्ष काढून ह्या माणसाला अच्छे दिनांचे स्वप्न दाखवण्यास हरकत नसल्याने हा संभाव्य कमळ पक्षाचा मतदार आहे, असे ओळखता येते. किंवा- तुम्ही फेबु भिंतीवर पोष्टिले की "बुवा, देवगड हापूस आणि कर्नाटक हापूस कसा ओळखावा?' तर ह्या पोष्टचे अनालेसिस करून सदर इसम सुखवस्तू असून शंभर टक्‍के कांग्रेसवाला असणार असे अनुमान काढता येते. डॉक्‍टरांनी हे तपशीलवार सांगितले तेव्हा आम्ही विचारात पडलो. परवा आम्ही "फेबु'वर कालीमिरी चिकनची रेसिपी "लाइक' केली होती. ही माहिती साधारण किती डालरला विकली गेली असेल? 
तेवढ्यात डॉक्‍टर खाकरले. आम्ही भानावर आलो. 

""आता एकदाची वाईट बातमी सांगून टाका!'' सारे पुराण ऐकून आम्ही डॉक्‍टरांना म्हणालो. "" भले! तुमच्या जोरावर इतर लोक पैसे मिळवतात, तुम्हाला एक दमडी मिळत नाही...ही वाईट बातमी नाही?'' डॉक्‍टर शांतपणे म्हणाले. 
...कुठाय तो झुक्‍या? बघतोच! 

Web Title: Marathi Article On Fad affected Peoples in Dhing Tang Article