कानगोष्ट! 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 डिसेंबर 2017

ज्येष्ठ कमळ नेते श्रीमान नाथाभाऊंनी ज्येष्ठ राष्ट्रवादी नेते ऊर्फ धाकले धनी ऊर्फ दादासाहेब बारामतीकर ह्यांच्या कानात काय सांगितले? साय कांगितले? काय...काय...काय? ह्या सवालामुळे आमची झोप उडाली आहे. तशी ती उडणार हे धाकल्या धन्यांनी सांगितलेच होते. त्यामुळे रात्रभर आमच्या डोळ्याला डोळा नाही. 

ज्येष्ठ कमळ नेते श्रीमान नाथाभाऊंनी ज्येष्ठ राष्ट्रवादी नेते ऊर्फ धाकले धनी ऊर्फ दादासाहेब बारामतीकर ह्यांच्या कानात काय सांगितले? साय कांगितले? काय...काय...काय? ह्या सवालामुळे आमची झोप उडाली आहे. तशी ती उडणार हे धाकल्या धन्यांनी सांगितलेच होते. त्यामुळे रात्रभर आमच्या डोळ्याला डोळा नाही. 

त्याचे असे झाले की जळगावात राष्ट्रवादी नेत्यांच्या व्यासपीठावर नाथाभाऊ टेचात गेले आणि भाषण देऊन आले. त्यांच्यासारखा जबर्दस्त नेता कोणाला नको आहे? साहजिकच त्यांना राष्ट्रवादीने खुली ऑफर दिली. परंतु, जे तुमच्या मनात आहे, ते माझ्या मनात नाही, असे नाथाभाऊंनी तिथे सांगितले खरे, पण धाकल्या धन्यांच्या कानात काहीतरी निराळेच सांगितले! 
ते नेमके काय सांगितले? हा खरा सवाल आहे. 

अखेर न राहवून आम्ही थेट मुक्‍ताईनगरातच पोचलो. थेट नाथाभाऊंनाच गाठले. म्हटले, माणूस इतका दिलखुलास. शिवाय नाना चौकश्‍यांना सरावलेला. आपल्या चौकशीने एवढे काय होणार आहे? गेलो, झाले!! मुक्‍ताईनगरच्या मळ्यात त्यांना भेटावयास गेलो तर पाहातो तो काय! नाथाभाऊंनी खास बामणोदची वांगी मागवून भरीताचा बेत रंगवला होता. 

""प्रणाम नाथाभाऊ!,'' आम्ही. 
""शतप्रतिशत म्हणायचं...काय?,'' बडजीत भाजके वांगे कुटत नाथाभाऊ म्हणाले. (खुलासा : बडजी : खान्देशी भरीत कुटायचे एक हत्त्यार कम भांडे!) म्हंजे अजूनही नाथाभाऊ "आमच्यात' आहेत तर!! हुश्‍श!! 
""सध्या वांग्याचे दिवस आहेत नै?,'' आम्ही हवापाण्याच्या गप्पा सुरू केल्या. 
""भरीताचे आहेत!,'' नाथाभाऊंनी बडजीत दणके दिले. 
"" चांगलं तिखट करा!,'' आम्ही. नाही म्हटले तरी आमच्या जिभेला पाणी सुटले होते. 
"" लसूणपात आणा बरं जरा!,'' नाथाभाऊंनी आज्ञा सोडली. आम्ही लसूणपातीचा हिरवागार गड्‌डा त्यांच्याकडे सोडला. 
""एक विचारायचे होते...विचारू? राग नाही ना येणार?,'' आम्ही. 

""मेलं कोंबडं आगीला भ्येत नसतं आणि भाजकं वांगं बडजीला!! आजपर्यंत आमच्या दहा वेळा चौकश्‍या झाल्या! किती? दहा!! येवढ्या त्या सिंचनवाल्यांच्या पण नाही झाल्या!! वाट्‌टेल ते विचारा..,'' बडजीतल्या दणक्‍यांना अचानक जोर चढून गेला होता. 
""...नको असेल तर राहू दे!,'' आम्ही हळहळलो. एवढा मोठा डोंगरासारखा नेता, पण आज वांगी कुटतो आहे...आम्ही नमते घेतले. 
""कर नाही त्याला डर कशाची? विचारा!,'' नाथाभाऊ म्हणाले. 
""तुम्ही पुन्हा मंत्री कधी होणार?'' आम्ही विचारले. 

""हा पक्ष वाढवला आम्ही!! आम्ही गावोगाव हिंडून पणत्या लावल्या, म्हणून आज हे लोक हेलिकॉप्टरनं फिरून ऱ्हायले आहेत, आणि आम्ही इथं वांगी कुटतो आहोत!! आमच्या मंत्रिपदाचं आता विसरा..!,'' हिरव्या गार मिरच्यांचा जुडगा बडजीत टाकत नाथाभाऊ तिखटपणाने म्हणाले. 
...त्यांचे म्हणणे खरेच होते. 
""दादासाहेबांच्या कानात आपण जे काही सांगितले ते नेमके काय होते?,'' मनाचा हिय्या करून अखेर आम्ही थेट वांग्याच्या देठालाच...आय मीन मूलभूत सवालालाच हात घातला. 
""वेळ आली की तेच सांगून देतील की..!,'' नाथाभाऊंनी आम्हाला उडवून लावले. 

""आम्हाला सांगायला काय हरकत आहे?,'' आम्ही. 
...क्षणभर विचार करून नाथाभाऊ म्हणाले : ""मघाशी तुम्ही काय विचारत होता? पुन्हा मंत्री कधी होणार...असंच ना?'' 
आम्ही होकारार्थी मान डोलावली. 
""तेच आम्ही धाकल्या धन्यांना कानात विचारलं येवढंच! घ्या कुटा वांगं!'' आमच्या पुढे बडजी ढकलत नाथाभाऊ म्हणाले. 
 

Web Title: marathi article kangosht editorial pune edition

टॅग्स