ध्येयवादी वाटचालीचे शतक (नाममुद्रा) 

ध्येयवादी वाटचालीचे शतक (नाममुद्रा) 

स्वराज्यासाठीचा लढा आणि सुराज्यासाठीचे राजकारण या दोन्हींत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या नेत्यांमध्ये नगर जिल्ह्यातील बी. जे. खताळ-पाटील यांचा समावेश आहे. आज ते वयाच्या शंभरीत पदार्पण करीत असून, त्यांच्या प्रेरणादायी वाटचालीची नोंद घ्यायला हवी. ऐन शंभरीतही कार्यप्रवण असलेले खताळ याच बाबतीत नव्हे तर अनेक बाबतीत अनोखे व्यक्तिमत्त्व आहे. संगमनेर तालुक्‍यातील धांदरफळ या छोट्याशा गावाचा हा सुपुत्र. शिक्षण सुरू असतानाच स्वातंत्र्यसैनिकांना मदत करून ते सामाजिक कार्याशी जोडले गेले. पुढे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर विडी कामगार चळवळीच्या माध्यमातून आधी कम्युनिस्ट चळवळीत व नंतर कॉंग्रेसचे काम करता करता कायद्याचे शिक्षण घेतले. फौजदारी वकिलीनंतर न्यायाधीश म्हणूनही काही काळ काम केले; पण नंतर सक्रिय राजकारणात प्रवेश केला आणि 1962 मध्ये ते आमदार झाले. भटक्‍यांची पहिली वसाहत संगमनेरला उभे केली ती खताळ यांनी. 

गांधीविचार ही त्यांच्या कार्याची दिशा राहिली. त्यामुळे राजकारण आणि सत्ता या गोष्टी नेहमीच त्यांच्यासाठी "साधन' होत्या, साध्य नव्हे. हीच दृष्टी ठेवून त्यांनी सत्ता वापरली आणि राज्याच्या मंत्रिमंडळात सहकार, पाटबंधारे, कायदा-न्याय, महसूल, शेती इत्यादी खाती त्यांनी प्रभावीपणे हाताळली. राज्यात सहकाराचे सक्षम जाळे उभे करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.

राजकारण, समाजकारणाइतकाच त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील उल्लेखनीय भाग म्हणजे मोठा व्यासंग. मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू, गुजराती अशा विविध भाषांतील साहित्य त्यांनी वाचले आहे. अवतीभोवतीच्या घटनांचा कार्यकारणभाव जाणून घेण्यासाठी, जगणे समजून घेण्यासाठी प्रत्येकाने वाचन केले पाहिजे, असे ते सांगतात. तत्त्वज्ञान, अध्यात्म, राजकारण, एवढेच नव्हे, तर संगीत, आहार, आरोग्य, व्यायाम असे त्यांचे चौफेर वाचन सुरू असते. विधानसभेच्या वाचनालयाचा सर्वाधिक उपयोग करणारे आमदार म्हणून त्यांचा लौकिक होता. 

घरीही त्यांनी स्वतःचे ग्रंथालय विकसित केले आहे. यात सर्व भाषांतील विविध पुस्तकांचा समावेश आहे. आइन्स्टाइनचे साहित्य, तसेच कॅलिनिनचे कम्युनिस्ट एज्युकेशन, थर्ड वेव्ह, फायनल डेज, ब्रीफ हिस्टरी ऑफ टाइम व शेक्‍सपिअरचे साहित्य त्यांच्या विशेष आवडीचे. एक जाणकार रसिक आणि कलांचा चाहता असा हा नेता. सर्वच कार्यकर्त्यांसाठी आदर्श म्हणून बोट दाखवावे, अशी ही संपन्न शतकी वाटचाल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com