वाघाचा घास..! 

PNE17N16596
PNE17N16596

तांबडं फुटलं होतं. दोन-चार चुकार ढग सोडले, तर आभाळ निरभ्र होतं. पूर्वेपर्यंत पसरलेल्या माळावर दहिवराचा गालिचा अंथरलेला. रानानं हिरवाई अजून सोडली नव्हती; पण गवत मात्र चिक्‍कार माजलेलं. पावसकाळ्यात अभयारण्य बंद असतं. जीपवाटांचा चिखल होतो. चहूकडून रान माजतं. झाडं पडतात आणि कुजतात... दूरवर आभाळात एका सर्पगरुडाला उघड्या खडकावर उन्हासाठी आलेलं पिवळंधम्म जित्राब दिसलं. त्याने पंख पसरून मोहरा वळवला. काही पाणपक्षी कलकल करत पाण्यावर उतरले. हरणांचा एक कळपही पाण्याकडे सावधगिरीने सरकत होता. त्यातल्या अल्फा नरानं इशारा करताच हरणं पाणी पिऊ लागली. 

नैर्ऋत्येला कच्च्या जीपरस्त्याच्या कडेला असलेल्या उंबराच्या प्राचीन झाडावर माकडांच्या टोळीनं रात्रभर मुक्‍काम केला होता. त्यांच्या तोंडफाट्या नरानं काटेसावरीचा शेंडा गाठून दूरवर चावळ घेतली. धोका नव्हता. तशी माकडांची टोळी पाण्याकडे निघाली. मधली सडक पार करणं हे आव्हान होतं. पण लेकुरवाळ्यांनी पोटाला असलेली पोरं सांभाळत दाणदाण उड्या टाकत पाणवठा गाठला... 

""अहो, ऐकलंत का?'' दूरवर पाहात मिसेस वाघ म्हणाल्या. 
""ऊंऽऽ..,'' मिस्टर वाघांचे डोळे उघडत नव्हते. केवढी मरणाची थंडी? छे!! 
""मेलं किती दिवस तेच तेच हरीण मारून खायचं? कंटाळा आला!'' मिसेस वाघ म्हणाल्या. 
""आता ह्या वयात गवा कुठून आणू तुझ्यासाठी?'' मिस्टर वाघ कुरकुरले. हो, कुरकुरलेच... गुरगुरले नाहीत. 
""जीभ नुसती चाभरट झाली आहे... उठा की! झोपून काय राहता? कसं काय एका जागी इतका वेळ बसवतं कुणास ठाऊक! समोर इतकं रान भरलं आहे प्राण्यांनी! पण तुम्हाला हौस म्हणून नाही काही...'' मिसेस वाघ करवादल्या. 
""हे अभयारण्य आहे, मॅडऽऽम... तो काय मॉल आहे का?'' मिस्टर वाघांनी उगीचच युक्‍तिवाद करण्याचा असफल प्रयत्न केला. 
""गेले चार दिवस खारी नि ससे खाऊन काढले आहेत! जरा हातपाय हलवा! मी उत्तरेला जाते, तुम्ही पश्‍चिमेला जा... बघू या काय गावतंय!,'' मिसेस वाघांनी त्यांना ढोसकलंच. मिस्टर वाघ बळेबळेच उठले. वाघाचं एक बरं असतं. सकाळी उठल्यावर ना दात घासायचे, ना दाढी की अंघोळ! शेर को कभी मूंह धोते देखा है? 

चार पायांवर उभे राहात मिस्टर वाघांनी आळोखे पिळोखे दिले. चाऱ्ही पाय ताणून एक जांभई दिली. त्यासरशी काटेसावरीवरल्या तोंडफाट्या नरानं "खर्र.. खॅक खॅक..' असा इशारा केला. पाणवठ्यावरून हरणंही धूम पळाली. सर्पगरुडानं अचानक मोहरा वळवून तो तिसरीकडेच गेला. 
...बऱ्याच वेळ काही घडलं नाही. रान शांतच राहिलं. माध्यान्ह उलटून वाघाचं जोडपं अंजनाच्या झाडाखाली परतलं. मिसेस वाघांच्या जबड्यात एक खाण्याचा डबा होता. दोघांनी तो उत्सुकतेनं उघडला आणि दोघंही चवीनं जेवू लागले. भरपेट जेवण झाल्यावर मिस्टर वाघांना पुन्हा झोप आली. जवळच्या गवतात किंचित आडवारत त्यांनी डोक्‍याखाली पंजा घेतला. मिसेस वाघ नंतरचं आवरत होत्या. 

""डबा परत करताना त्या वनखात्याच्या बाईंना सांग... आज वांग्याच्या भरितात मीठ कमी होतं. आणि हो, लसणीच्या चटणीत किती तिखट? त्रास होतो हल्ली...'' मिस्टर वाघ म्हणाले. 
""अगं बाई, लक्षातच आलं नाही! मेला, माझा उपास मोडला की!.. मार्गशीर्षातला गुरवार हो! च..च...!!'' मिसेस वाघ कमालीच्या हळहळल्या. 
...ताडोबातला दिवस निम्माशिम्मा टळला होता. 
- ब्रिटिश नंदी 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com