अहंकार की नाती? (पहाटपावलं)

Marathi Article_Editorial_Positive Topic_Dr. Sapana Sharma
Marathi Article_Editorial_Positive Topic_Dr. Sapana Sharma

"परंतु डॉक्‍टर, मी म्हणतो ते ती अजिबात ऐकत का नाही? मला तिच्यापेक्षा जास्त कळतं तरीही ती दर वेळी उलट प्रश्न करते. मग भांडण नाही का होणार?'' हे वाक्‍य तुम्हालाही ओळखीचं वाटत असेल ना? "कहानी घर घर की' असं म्हणायला हरकत नाही. माझ्याकडे अशी तक्रार घेऊन येणाऱ्या नवऱ्याला, बायकोला, सासूला, सुनेला, आईला, मुलाला मी एकच प्रश्न विचारते, "हे जे तुम्ही जिवाच्या आकांताने पटवून देण्याचा प्रयत्न करता, त्यात जीवन-मरणाचे किती मुद्दे असतात?'' तुम्हीही हाच प्रश्न स्वतःला विचारण्याचा प्रयत्न करा. उत्तर जवळ जवळ सारखंच असतं, "तसं नाही, पण...' 

आपण या "तसं नाही, पण...' वर लक्ष केंद्रित करू. काही गोष्टी आयुष्यात अशा असतात, की ज्याचं महत्त्व कळालं नाही तरी ते ऐकणं किंवा करणं आवश्‍यक असतं. उदाहरणार्थ, अर्ध्यावर शिक्षण सोडण्याचा मुलांचा अट्टहास किंवा किरकोळ खर्चासाठी दीर्घकालीन गुंतवणूक मोडणं, तब्येत बरी नसताना लांबचा प्रवास करणं... अशा बाबतीत कुणी तरी एकानं आग्रहानं आपले नियम लावायलाच हवेत आणि त्यामुळं कुणी नाराज झालं तरी हरकत नाही. परंतु असे जीवन-मरणाचे मुद्दे आयुष्यात किती वेळा येतात? थोडा विचार करता तुमच्याही लक्षात येईल, की जितकी भांडणं आणि वाद तुम्ही करता, त्यातील काही मोजकीच कामाची असतात. आणि उरलेली? उरलेले मुद्दे केवळ स्वतःचा अहं सुखविण्याच्या उद्देशानं मांडले जातात. स्वतःबद्दल, स्वतःच्या बुद्धिमत्तेबद्दल आणि कर्तबगारीवर विश्वास नसल्यानं जो प्रच्छन्न न्यूनगंड आपल्या मनात दडलेला असतो, त्याचं शमन करण्याच्या धडपडीत आपण काही ना काही कारणानं दुसऱ्यांना खोटं व छोटं आणि स्वतःला खरं व मोठं सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत असतो. या धडपडीत आपण या भांडणातून काय साध्य करणार आहोत हा शहाणा विचारही विसरून जातो. तुम्ही वादात जिंकता- कधी शब्दांनी, कधी आवाज चढविल्यानं, कधी धमकी दिल्यानं किंवा कधी हिंसक वृत्ती दाखविल्यानं. तुम्ही जिंकता, पण शेवटी उरतो तो राग, द्वेष, भीती आणि नकारात्मकता. तुम्हाला जिंकल्याचा आनंद काही क्षण मिळत असेल, परंतु दर वेळी नात्यांच्या दोरखंडातला एक धागा तुटलेला असतो, कधीही न जोडला जाण्यासाठी. तेव्हा अधिक महत्त्वाचं काय आहे? तुमचा अहं की जवळची नाती? 

सातत्याने जवळच्या व्यक्तींशी वितर्क जिंकणाऱ्यांना नेहमीच हा अनुभव असतो, की माझ्यावर कुणी प्रेम करत नाही, किंवा माझी कुणाला कदर नाही, माझी मुलं माझ्याकडे फक्त पैसा मागायला येतात. आपला अहं जोपासताना अशा परिस्थितीतही त्यांची हीच भावना असते, की मी सगळ्यांचं इतकं मार्गदर्शन करतो, त्यांच्या भल्यासाठी सतत विचार करतो, परंतु कुणीही मला समजून घेत नाही. स्वतःला आजच्या या विषयाच्या चाळणीतून काढून पाहा. महत्त्वाचं काय? प्रेम आणि आनंद की दुसऱ्याला चुकीचं ठरवून त्या नात्याच्या थडग्यावर आपला अहं बसवणं? 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com