अंधश्रद्धेचे अनर्थ

marm
marm

अंधश्रद्धेचे भूत मानगुटावर बसले, की नातीगोती, मानवता, विधिनिषेध सगळ्याला गुंडाळून ठेवत माणसाला पशूपेक्षा हिंस्र कसे बनवते, याचा प्रत्यय अनेक घटनांमधून येतो. टाके हर्ष (ता. त्र्यंबकेश्‍वर, जि. नाशिक) येथील दोघी बहिणींना अंधश्रद्धेपोटी ठार केल्याची घटना घडली होती, त्यातील अकरा संशयितांना जन्मठेपेची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. अंधश्रद्धा, जादूटोणाविरोधी कायद्यान्वये संशयितांना जन्मठेपेची शिक्षा होण्याची महाराष्ट्रातील ही पहिलीच घटना. एक महिला आणि तिची बहीण काळी जादू करते, असे मांत्रिक महिलेने सांगितल्याने त्यावर आंधळेपणाने विश्‍वास ठेवून त्या दोघींना अतिशय क्रूरपणे ठार मारण्यात आले. अंधश्रद्धा माणसाला पशूच्याही पलीकडे वागायला कशी भाग पाडते, याचे उदाहरण या घटनेत पाहायला मिळते. यात बळी पडलेल्या दोन्हीही महिलांना त्यांची मुले, भाचे यांनी निर्दयीपणे तुडवून तुडवून मारले होते. हे गैरकृत्य करताना त्यांचे अंतःकरण अजिबात हेलावले नाही, की त्यांच्यात आई, मावशी, बहीण यांच्याबाबत दयामाया उत्पन्न झाली नाही. अशा घटनांना आवर घालण्यासाठी, अंधश्रद्धेला मूठमाती देण्याकरता "जादूटोणा आणि अंधश्रद्धा विरोधी कायदा' महाराष्ट्रात झाला. पण हा कायदा व्हावा, यासाठी "अंनिस'सारख्या संघटनांना सातत्याने पाठपुरावा करावा लागला होता. वेगवेगळ्या सबबींखाली या प्रयत्नांना विरोध केला गेला; परंतु अशा भीषण घटना या कायद्याची आवश्‍यकताच प्रकर्षाने समोर आणणाऱ्या आहेत. कर्नाटकानेही आता महाराष्ट्राच्या धर्तीवर असा कायदा केला आहे. 
आपली अंधश्रद्धा जोपासताना दुसऱ्याचा जीव घेण्यापर्यंत मजल मारणाऱ्यांना चाप बसला पाहिजे. त्यादृष्टीने हा निकाल दूरगामी परिणाम करणारा ठरेल. तथापि, केवळ कायद्याच्या बडग्याने अंधश्रद्धा संपणार नाही. त्याकरिता समाजातील उपेक्षित, दुर्लक्षित आणि दुर्गम भागात शैक्षणिक प्रगती साधणे, त्या प्रगतीचे किरण तळागाळापर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. सर्वदूर वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे, अंधश्रद्धा निर्माण करणाऱ्या घटनांमागील कार्यकारणभाव उलगडून दाखवणे यांवर भर दिला पाहिजे. शिक्षितही अंधश्रद्धेच्या वाटेला जातात, यामागची सामाजिक मानसिकता लक्षात घेऊन त्यांनाही त्यापासून परावृत्त करणारे प्रबोधनात्मक उपक्रम राबवले पाहिजेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com