भाजलेले चिंचोके

गुरुवार, 7 डिसेंबर 2017

चिवचिवणाऱ्या कोवळ्या हाकांनी आणि आरोळ्यांनी शाळेचा परिसर बहरून गेला होता. नदीपात्रातून पाण्याचा प्रवाह धावत असावा, एखाद्या खडकाशी अडून तो उसळी घेत असावा किंवा उंच कातळावरून धबधब्यासारखा कोसळत असावा, तसं दृश्‍य मुलांच्या उत्साहातून दिसत होतं.

चिवचिवणाऱ्या कोवळ्या हाकांनी आणि आरोळ्यांनी शाळेचा परिसर बहरून गेला होता. नदीपात्रातून पाण्याचा प्रवाह धावत असावा, एखाद्या खडकाशी अडून तो उसळी घेत असावा किंवा उंच कातळावरून धबधब्यासारखा कोसळत असावा, तसं दृश्‍य मुलांच्या उत्साहातून दिसत होतं. शालेय गणवेशातलं, एकसारख्या दिसणाऱ्या प्रफुल्लित चेहऱ्यांचं बाल्य साऱ्या परिसरात हिंदोळत होतं. आजूबाजूला जागा शोधून कुणी खेळाची तयारी सुरू केली होती. कुठल्या गोलाकारात हशा-टाळ्यांचा जल्लोष रंगू लागला होता. वर्गात अळंटळं केल्यानं लिहून घ्यायचं राहिलेलं पूर्ण करण्याची घाई शाळेच्या काही पायऱ्यांवर सुरू होती. खेळताना "टाइम प्लीज'चं निशाण फडकावून त्या वेळात कुणी पाण्याच्या रंगीबेरंगी बाटल्या ओठांवर टेकविल्या होत्या. गर्दीच्या वेगवेगळ्या गोलांतून शिताफीनं रस्ता शोधत काही मित्रांचा लपाछपीचा खेळ सुरू होता. भिरभिरणारे अनेक डोळे टाचा व माना उंचावून गर्दीच्या प्रवाहापलीकडं आई-बाबांचा किंवा रिक्षावाल्या-व्हॅनवाल्या काकांचा शोध घेत होते. कावरेबावरे झालेले, हास्यानं ऐसपैस पसरलेले आणि त्यामुळं अपरी नाकं गालांत आणखीच बुडून गेलेले गोबरे चेहरे त्या कोलाहलात जागोजागी दिसत होते. काही गोलाकारांच्या मध्यभागी दप्तरांची ओझी विसावली होती. गुडघे टेकवून त्यांतून खाऊचे डबे बाहेर काढण्याची उत्सुकता तिथल्या सगळ्याच चेहऱ्यांवरून ओघळत होती. बंद डबे बाहेर निघत होते; आणि ते कानांशी हलवून आतील खाऊचा अंदाज घेतला जात होता. काही डब्यांतून आलेले आवाज खाऊचा प्रकार पुरेसा स्पष्ट करणारे होते; पण काही डब्यांतून आवाजच येत नसत, तेव्हा डब्यांची घट्ट झाकणं उघडून पाहण्याची घाई सगळीकडं उडालेली दिसे. "वेंधळेपणा'चा शिक्का बसलेल्या मित्रांच्या डब्यांची झाकणं अधिक घट्ट होती; आणि ती उघडताना दुमडलेल्या जिभांचे विविधाकार ओठांच्या व गालांच्या आजूबाजूला पसरवीत त्यांचं शक्तिप्रदर्शन सुरू होतं. डबा झटकन्‌ उघडला जाऊन खाऊतला काही वाटा आपोआपच जमिनीला दान केला जात होता. खाऊचे घास परस्परांपर्यंत पोचविले जात होते. चवींच्या त्या अजब महोत्सवात सारेच मित्र कमालीचे विरघळून गेले होते. त्यांतल्या एका मित्रानं अनेक गाठी बांधलेला रुमाल खुला केला; आणि भाजलेल्या चिंचोक्‍यांचे पांढरे-तपकिरी तुकडे हातावर घेतले. घोळक्‍यातल्या इतर मित्रांचे हात त्या दिशेनं झेपावले; आणि सारे तुकडे क्षणार्धात गायब झाले. साऱ्या चेहऱ्यांवर भाजलेल्या चिंचोक्‍यांची चव उतरू लागली होती. अधूनमधून कडकडणारे आवाज येत होते; आणि नंतर बराच वेळ केवळ गालांचे चंबू हलत राहत होते. 
बरीच वर्षं कुठंतरी हरवून गेलेलं हे दृश्‍य परवा अगदी अचानक पाहायला मिळालं; आणि कित्येक वर्षांपूर्वीची भाजलेल्या चिंचोक्‍यांची खरपूस चव जिभेवर उतरून दीर्घ काळ रेंगाळत राहिली. चिंचोक्‍यांच्या संख्येवरून मित्रांचं वर्तुळ मोठं करीत राहणारे तेव्हाचे मित्र आठवले. अधिकाधिक चिंचोके जमा करीत जाण्याची निर्मळ स्पर्धा आठवली. चिंचोके साठवून ठेवलेल्या तेव्हाच्या हिंगडब्या डोळ्यांपुढं आल्या. फुललेल्या लालबुंद निखाऱ्यावर चिंचोके भाजतानाचा विशिष्ट वास दाटून आला. ती दौलत मित्रांना वाटण्यातला आनंद मनात भरून गेला. झाडांवर लटकणाऱ्या चिंचांचे अर्धगोलाकार आकडे डोळ्यांपुढं हलू लागले. हिरवट चिंचांची चव, गाभुळलेल्या चिंचांची हवीहवीशी चव, चिंचा तयार झाल्यावरची आंबट-गोड चव, कोवळ्या चिंचोक्‍यांची खोबऱ्यासारखी चव... असं काय काय मनात जागं झालं. भाजलेल्या चिंचोक्‍यांच्या चवीसारख्या अनेक सुखद आठवणी, त्याचा निखळ आनंद आपण विसरून जातो; आणि आयुष्याची चवच हरवून बसतो. भाजक्‍या चिंचोक्‍यांची खरपूस चव पुनःपुन्हा अनुभवता आली, तर आपल्या सध्याच्या धावपळीच्या-ताणाच्या आयुष्यातही चिंचेची झाडं मोहरून जातील...

Web Title: Marathi news Bhajlele chinchoke