आप तो ऐसे न थे! 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 जानेवारी 2018

गुजरातमध्ये भाजप आणि दिल्लीत 'आप' या दोन पक्षांमध्ये गेल्या काही दिवसांत अंतर्गत मतभेदांना तोंड फुटले आहे. ते पाहता अन्य पक्षांपेक्षा स्वत:ला वेगळे म्हणवून घेणाऱ्या या पक्षांचे पितळ उघडे पडले आहे. 

गुजरातमध्ये भाजप आणि दिल्लीत 'आप' या दोन पक्षांमध्ये गेल्या काही दिवसांत अंतर्गत मतभेदांना तोंड फुटले आहे. ते पाहता अन्य पक्षांपेक्षा स्वत:ला वेगळे म्हणवून घेणाऱ्या या पक्षांचे पितळ उघडे पडले आहे. 

भारतीय जनता पक्ष आणि आम आदमी पक्ष या पक्षांचे नाते हे अगदी विळ्या-भोपळ्याचे! नरेंद्र मोदी यांच्या हातात भाजपची सूत्रे गेली आणि अवघ्या देशाला सुशासन व विकासाची स्वप्ने पडू लागली. आम आदमी पक्ष म्हणजेच 'आप'चा उदय 'लोकपाल आंदोलना'तून झाला, तेव्हाही हा नवा पक्ष देशाची व्यवस्था आरपार बदलून टाकणार, असे जनतेला वाटले होते. दोन्ही पक्षांची ध्येयधोरणेही, धार्मिक अजेंडा सोडला, तर निदान कागदावर तरी सारखीच दिसणारी आणि जनतेला कॉंग्रेसच्या जोखडातून मुक्‍त करण्याची आशा दाखवणारी! दोन्ही पक्ष हे देशातील पारंपरिक पक्षांपेक्षा स्वत:ला वेगळे म्हणजेच 'पार्टी वुईथ डिफरन्स' म्हणवून घेणारे; मात्र गेल्या काही दिवसांत या दोन पक्षांत ज्या अंतर्गत कुरबुरी, धुसफूस सुरू आहे, ते बघितल्यावर आपल्या या स्वप्नांचा चुराडा झाल्यासारखेच देशातील आम आदमीला वाटू लागले असेल.

'आप'ने दुसऱ्याच विधानसभा निवडणुकीत दिल्लीत दणदणीत बहुमत मिळवले आणि पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांची एकाधिकारशाही सुरू झाली. भाजपमध्येही अशीच एकाधिकारशाही सुरू असल्याचे बोलले जाते; मात्र ती खरे तर एकाधिकारशाही नसून मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांची 'द्विअधिकारशाही' असल्याचे दिसत आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकीतील जबरदस्त फटक्‍यानंतर भाजपमधील अंतर्गत कुरबुरी बाहेर येत आहेत. प्रथम उपमुख्यमंत्री नितीन पटेल आणि आता मत्स्योद्योगमंत्री पुरुषोत्तम सोळंकी यांनी पक्षनेतृत्वाला आव्हान दिले आहे. भाजपमध्ये हे असे बहुधा प्रथमच घडत आहे.

दुसरीकडे 'आप'मधील अंतर्गत मतभेदांना राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने तोंड फुटले आहे. दिल्ली विधानसभेतून तीन खासदार राज्यसभेवर जाणार असून, ते तिन्ही उमेदवार 'आप'चेच असतील, असे संख्याबळ सांगते. पक्षाचे स्थापनेआधीपासूनचे कार्यकर्ते कुमार विश्‍वास यांनी त्यासाठी उमेदवारी मागितली होती; मात्र तेव्हा केजरीवाल हे रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्यापासून अनेकांची नावे घेत होते. प्रत्यक्षात या सर्वांनी अनिच्छा दर्शविली, त्यामुळे अखेर केजरीवाल यांना संजयसिंग, तसेच कोणा एन. डी. आणि सुशील अशा दोन गुप्तांना उमेदवारी बहाल करणे भाग पडले! केजरीवाल यांचे पितळ लगेचच उघडे पडले; कारण हे जे सुशील गुप्ता आहेत, ते काही दिवसांपूर्वीपर्यंत कॉंग्रेसचे सदस्य होते.

केजरीवाल यांच्या कारभाराविरोधात आवाज उठवल्याची ही शिक्षा आपल्याला मिळाली आहे, असा आरोप कुमार विश्‍वास यांनी केला आहे; मात्र लोकपाल आंदोलन तसेच 'आप'च्या स्थापनेत 'मेंटॉर'ची भूमिका बजावणारे आणि केजरीवाल यांच्याशी झालेल्या मतभेदानंतर बाहेर पडलेले योगेंद्र यादव यांची टिप्पणी अधिक बोलकी आहे. 'बाकी काहीही असले तरी केजरीवाल हे कधीही विकले जाणार नाहीत, असे आपल्याला वाटत होते. आता मात्र या उमेदवारांना बघून मला लाज वाटते आणि माझी वाचाच बंद झाली आहे,' ही यादव यांची प्रतिक्रियाच 'आप'मध्ये काय सुरू आहे, यावर प्रकाश टाकते. 

दिल्लीत हे असे 'आप'चे धिंडवडे निघण्यापूर्वी गुजरातेत नितीन पटेल यांनी, त्यांना मिळालेल्या दुय्यम खात्यांमुळे बंडाचे निशाण फडकवले होते. खरे तर पाटीदार आंदोलनांनतर हे 'पटेल' मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने पाहत होते; मात्र विजय रूपानी हे शहा यांच्या ओंजळीने पाणी पित कारभार करत असल्याने पुन्हा तेच मुख्यमंत्री झाले आणि नितीन पटेल यांची निराशा झाली; मात्र खातेवाटपानंतर त्यांनी रुद्रावतार धारण केल्यानंतर अखेर त्यांना अर्थखाते देण्याशिवाय मोदी-शहा यांच्यापुढे दुसरा पर्याय उरला नाही. त्यानंतर आता कोळी समाजाचे प्रतिनिधित्व करणारे पुरुषोत्तम सोळंकी यांनी आपल्या राज्यमंत्रिपदाविरोधात आवाज उठवला असून, मंत्रिमंडळाच्या बैठकीवरही बहिष्कार टाकला आहे. खरे तर या सोळंकीमहोदयांना 'स्वच्छ कारभारा'चे डिंडिम वाजवणाऱ्या मोदींनी मंत्रिपद दिलेच कसे, हाच खरा प्रश्‍न आहे.

त्यांच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल असून, पूर्वी मुंबई महापालिकेत नगरसेवकपद भूषवतानाही त्यांच्यावर अनेक बालंटे आली होती. सोळंकी हे भावनगरमधून पाच वेळा निवडून आले असले तरी 'चाल-चलन-चारित्र्य' अशी त्रिसूत्री मिरवणाऱ्या भाजपला, मच्छीमारीची कंत्राटे देताना 400 कोटींचा गैरव्यवहार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे, हे ठाऊक नव्हते काय? आताही गुजरातेत 20 टक्‍के असलेल्या कोळी समाजाला खूष करण्यासाठी सोळंकी यांच्याही मिनतवाऱ्या केल्या गेल्या, तर नवल वाटू नये. एकूणातच भाजप असो की 'आप', त्यांचे पितळच या घटनांमुळे उघडे पडले आहे.

Web Title: marathi news Delhi News AAP Arvind Kejriwal Kumar Vishwas Gujarat BJP