पैसे!

पैसे!

प्रति, 
श्री. नानासाहेब फडणवीस, 
मुख्यमंत्री, स्टेट ऑफ महाराष्ट्र 
प्रत रवाना : 1. मा. श्री. श्रीश्रीपाद श्रीजोशी, 
अध्यक्ष, अखिल भारतीय 
साहित्य महामंडळ 
2. मा. श्री. राहुलजी गांधीजी, 12, तुघलक रोड, 
नवी दिल्ली 

विषय : पैसे! पैसे! पैसे! 

आपणांस हे विदित असेलच, की बडोदे (गुजरात) येथे आगामी 91वे अखिल भारतीय साहित्य संमेलन भरविण्यात येत आहे. सदर संमेलनास सारे रसिक पदरचे पैसे खर्च करून येत असताना अन्य निमंत्रित व सहभागी लेखकांनीही शुल्क भरूनच यावे, असा आग्रह आयोजकांकडून धरण्यात येत आहे. "मराठी सारस्वतांमध्ये नवा पायंडा पाडतो आहो,' असे साभिमान सांगत महामंडळ अध्यक्षांनी तीन हजार रुपये भरल्याचेही कळते! हा साराच प्रकार अत्यंत दुर्दैवी, मराठी साहित्याला मारक आणि शतप्रतिशत धिक्‍कारार्ह आहे, हे कळविण्यासाठी सदर निवेदन देण्यात येत आहे... 
सारस्वताच्या अंगणात हल्लीच्या काळात ज्ञानोबा माउलीच्या "पैसा'पेक्षा पैशाला महत्त्व आले आहे. मराठी साहित्य सकस व्हायला हवे असेल, तर संमेलने झोकात व्हावीत, संमेलनाच्या मांडवातील (बौद्धिक, भावनिक व आन्निक) खुराकामुळेच मराठी साहित्य सकस होऊ शकेल. पुस्तक आणि पुख्खा हे दोन पुकारच मराठी साहित्य आणि मराठी भाषेला पुष्ट करतील, यात शंका नाही. 
साहित्य संमेलनास आठ कोट रुपये देण्याचा कर्नाटकचा निर्णय आचरट्‌ट (हा शब्द कानडी नव्हे!) आहे, हे कुठल्याही मराठी माणसास मान्य व्हावे. आठ कोट म्हंजे आठावर किती पूज्ये हेदेखील मराठी माणसास एका दमात सांगता येणार नाही. साहजिकच आठ कोट रुपयांची खबर ऐकून मराठी सारस्वताच्या प्रांतात अक्षरशः हाहाकार उडाला. गावोगाव लेखकू मंडळी बेशुद्ध पडल्याचे वृत्त आहे. (अचानक कांद्याची मागणी वाढल्याचे तुमच्या ध्यानी आले असेलच! असो.) साहित्य संमेलनासाठी आपले सरकार पंचवीस लाखांचे मानधन (खळखळ करत) देते. वाढती महागाई, नोटाबंदी आणि जीएसटीचा विचार करून तो आकडा वाढवून फार तर एक कोट रुपयांपर्यंत न्यावा, अशी आमची रास्त मागणी आहे. तिचा लौकरात लौकर विचार व्हावा, ही विनंती. (सदर पत्राची प्रत श्रीमान राहुलजी गांधी यांना पाठवलीच आहे. तुम्ही म्हणत असाल तर धनंजयरावजी मुंडे ह्यांनाही पाठवू! दर दिवसाआड ते कुठली ना कुठली भरपाई मागतच असतात! पुन्हा असो.) आमचे मागणे लई नाही. एक कोट सरकारला जड नाहीत असे वाटते. कुठे आठ कोट मागतो आहो? उलट तसे काही करू नका!! म्हातारी मेल्याचे दुःख नाही, काळ सोकावतो. कठीण परिस्थिती होईल! आठ कोट रुपये मिळाल्यानंतर प्रकाशक सरकारकडे कर्जमाफी मागतीलच; पण एखाद्या पुस्तकाची एडिशन फेल गेली तर नुकसानभरपाईही मागतील!! आम्हा लेखकांची अवस्था कायमच दुष्काळी प्रदेशात मशागत करणाऱ्या शेतकऱ्यासारखी असते. आम्हाला काय, "मागण्याला अंत नाही; आणि देणारा मुरारी' अशी आमची पर्मनंट अवस्था असते. माणसाने पचेल तेवढेच खावे, म्हणतात. असो. 
निमंत्रितांनी आणि लेखकांनी शुल्क भरून आम रसिकाप्रमाणे संमेलनाच्या मांडवात पाऊल घालावे, हा आग्रह धिक्‍कारार्ह असतानाच आता निमंत्रित आणि लेखकांनी प्रवासशुल्कदेखील मागू नये, असा आग्रह धरण्यात येत आहे. ही मात्र मराठी लेखकांच्या पाठीवरील शेवटची गवतकाडी ठरावी! संमेलनासाठी आम्ही ब्याग भरायला घेतली होती, हे ऐकून पुन्हा ब्यागेतून कपडे उपसायला घेतले आहेत. अशाने मराठी संस्कृती आणि साहित्याचा किती ऱ्हास होईल, ह्याची तरी कल्पना करा. हे सारे वेळच्या वेळी सरकारी निधी न मिळाल्यामुळे होत आहे, हे आपल्या लक्षात आले असेलच. तेव्हा तो निधी त्वरित सोडावा व आमचा बडोद्याचा मार्ग सुकर करावा, ही कळकळीची विनंती. कळावे. आपला. एक मराठी लेखक. 
ता. क. : उंधीयोचे दिवस आहेत. या तुम्हीही बडोद्याला! 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com