गुजरातेतील वादळवाट (अग्रलेख)

गुजरातेतील वादळवाट (अग्रलेख)

गुजरातच्या किनारपट्टीवर घोंगावणारे ‘ओखी’ वादळ फारसे काही नुकसान न करता पुढे गेले असले, तरी याच परिसरात गेले महिनाभर सुरू असलेले राजकीय तुफान नेमके काय परिणाम घडवणार आहे, त्याची आजमितीला कोणालाही शाश्‍वती देता येत नाही! भारतीय जनता पक्षाच्या गुजरातेतील २२ वर्षांची राजवट उलथवून टाकण्यासाठी काँग्रेसने गेल्या तीन-साडेतीन वर्षांत प्रथमच आपली ताकद पणाला लावली आहे. या ‘ओखी’ वादळाने आणलेला पाऊस तसेच झोंबरे वारे यामुळे गेल्या चार दिवसांत तेथील प्रचारावर परिणाम झाला असला, तरी त्याबद्दल हळहळ व्यक्‍त केली जात आहे ती भाजपच्याच गोटातून. या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात अर्धा गुजरात मतदान करणार असून, त्यात गेल्या तीन दशकांत प्रथमच भाजपच्या विरोधात उभा ठाकलेल्या पाटीदार समाजाचे वर्चस्व असलेल्या सौराष्ट्राचा तसेच दक्षिण गुजरातचा प्रामुख्याने समावेश आहे. या निवडणुकीचे पडघम वाजू लागले, तेव्हा भाजप पुनश्‍च एकवार बाजी मारणार, असे वातावरण प्रसारमाध्यमांमधून दिसत होते आणि विकासाचे ‘गुजरात मॉडेल’ पाठीशी असल्यामुळे त्याबाबत कोणी शंकाही घेत नव्हते. मात्र, राहुल गांधी यांना हळूहळू प्रतिसाद मिळत गेला आणि हार्दिक पटेल या बंडखोर पाटीदार युवकाच्या सभांनाही गर्दी होऊ लागली. त्यामुळेच ही लढत म्हणजे ‘काँटें की टक्‍कर’ बनली असून, डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना प्रचारात उतरल्याबद्दल त्यांची खिल्ली उडवणारे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक दिवसाआड गुजरातच्या फेऱ्या मारणे भाग पडताना दिसत आहे.

खरे तर गुजरातेत प्रचार सुरू झाला तेव्हाच तेथील जनता मोदी यांच्या नोटबंदीच्या तसेच ‘जीएसटी’ कायद्यातील जाचक तरतुदींमुळे संत्रस्त झाल्याचे दिसू लागले होते. पुढे हार्दिक पटेल बरोबरच ‘ओबीसी’ समाजातील एक तरुण अल्पेश ठाकूर तसेच दलितांचा ‘हीरो’ जिग्नेश मेवाणी यांनीही काँग्रेसच्या पारड्यात आपले बळ टाकले आणि लढत चुरशीची होऊन गेली. त्यामुळे सौराष्ट्राची ‘राजधानी’ मानल्या जाणाऱ्या राजकोटमध्ये खुद्द मुख्यमंत्री विजय रूपानी यांनाही कठोर परिश्रम करण्यावाचून पर्याय उरलेला नाही! मात्र, हार्दिक, अल्पेश तसेच जिग्नेश हे तिघे एका बाजूला उभे ठाकल्याने गुजरातेतील जातीय समीकरणेही या निवडणुकीने पुरती बदलून टाकली आहेत. प्रदीर्घ काळ धनिक-वणिक पाटीदारांच्या ‘दादागिरी’ला कंटाळलेला दलित तसेच ओबीसी समाज आणि पाटीदारच असलेला हार्दिक हे एकत्र आल्यामुळे काँग्रेसला बळ मिळाले आहे. प्रचाराचा पहिला टप्पा संपत असताना स्पष्ट झालेली बाब म्हणजे दोन्ही बाजूंनी वैयक्तिक आणि भावनिक मुद्यांना महत्त्व देण्यात येत आहे. परस्परांवर हेत्वारोप आणि चिखलफेक यांनाही उधाण आले आहे. ‘विकास गांडो थयो गयो छे!’ ही या निवडणुकीची ‘कॅचलाइन’ व्हायरल झाली आणि त्यामुळे भाजपला अखेर ‘गुजरातची अस्मिता’ याच भावनिक मुद्यावर लढणे भाग पडले. मोदी यांनी या पहिल्या टप्प्यातच जवळपास दीड डझन सभा घेतल्या, हे लक्षात घेतले की भाजपला गुजरातचे राज्य टिकवण्यासाठी किती आणि कसे प्रयत्न करावे लागत आहेत, हे लक्षात येते. राजकोटमधील पाटीदार असोत की पोरबंदरचे मच्छीमार असोत, की सुरतचे व्यापारी असोत, पहिल्या टप्प्यातील या मोठ्या परिसरात भाजपविरोधात असलेली नाराजी हाच काँग्रेसच्या हातातील हुकमी एक्‍का बनला आहे, असे काँग्रेसला वाटते. या पार्श्‍वभूमीवर अयोध्येतील ‘बाबरीकांडा’च्या पूर्वसंध्येलाच, हा विषयही सर्वोच्च न्यायालयातील कामकाजामुळे ऐरणीवर आला आणि भाजपच्या विकासाला ‘हिंदुत्ववादा’चा भगवा रंग चढला. त्यामुळेच निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या प्रचाराच्या अखेरच्या चरणात मोदी यांनाही विकासाचा मुद्दा बाजूस सारून अयोध्येतील ‘राममंदिरा’चा प्रश्‍न हातात घ्यावा लागला आणि त्याशिवाय भावनिक आवाहनावर भर देणे भाग पडले. प्रचाराला भाजपने भगवा रंग देणे पसंत केले, तर काँग्रेसने आर्थिक मुद्यांवर भर दिला. नोटाबंदी तसेच ‘जीएसटी’ याबरोबरच बेरोजगारी, शिक्षणाकडे झालेले दुर्लक्ष याच विषयांवर भर देताना राहुल गांधीच्या मंदिरवाऱ्या घडवून सॉप्ट हिंदुत्वाची कास पकडण्याचा प्रयत्न केला गेला. प्रचार संपता संपता काँग्रेसचे नेते मणिशंकर अय्यर यांनी मोदींविषयी वादग्रस्त शब्दप्रयोग करून भाजप आतुरतेनं वाट पहात असलेली संधी आणून दिली आहे. पंतप्रधानांपासून सारे जण या संधीचं सोनं करण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहेत. कोणत्याही ट्रॅपमध्ये अडकायचं नाही असा अतिसावध प्रचार करणाऱ्या राहुल यांची अय्यर यांनी चांगलीच अडचण करून ठेवली. भाजपला घेरण्याचा शक्‍य तितका प्रयत्न काँग्रेसने केला आहे; तर भाजपची भिस्त अजून टिकून असलेला मोदींचा करिष्मा आणि तळापर्यंतचे मजबूत संघटन यावरच असेल. मतदारराजा कोणावर भरवसा ठेवणार, यावर देशाच्या राजकारणाची दिशा ठरणार असल्याने ही निवडणूक मोलाची बनली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com