ज्वालामुखीच्या तोंडावर! 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 डिसेंबर 2017

मुंबईतील आगीची दुर्घटना हा अपवाद नव्हे. अशा दुर्घटना म्हणजे राज्यकर्ते, प्रशासकीय यंत्रणा आणि बेकायदा पद्धतीने धंदे करणाऱ्यांच्या साट्यालोट्यातून आणि बेजबाबदार कारभारातून घडलेली हत्याकांडे आहेत. 

देशाचे नाव जगाच्या नकाशावर ठळकपणे अधोरेखित करणाऱ्या या मायावी, मोहमयी मुंबापुरीचा मुखवटा पावडर-कुंकू लावून सुशोभित करण्याचा प्रयत्न सर्वपक्षीय राज्यकर्ते गेली अनेक वर्षे करत असले तरी, त्या मुखवट्याआड दडलेले वास्तव किती भीषण आणि क्रूर आहे, याचेच प्रत्यंतर मध्य मुंबईतील कमला मिल परिसरात लागलेल्या भीषण आगीमुळे आले आहे. सरत्या वर्षाला निरोप देण्याची तयारी मोठ्या जोमाने सुरू असतानाच, एका वाढदिवसाच्या सोहळ्यातील आगीने त्याच युवतीसह आणखी किमान डझनभर बळी घेतले आहेत. 

एकंदरीतच हे सरते वर्ष मुंबईकरांसाठी जीवघेणे ठरले आणि त्यास या महानगरातील अधिकृत बांधकामे डोळ्यांवर कातडे पांघरून दृष्टिआड करणाऱ्या यंत्रणाच कारणीभूत आहेत, हीच बाब या जळितकांडाने पुन्हा ठळकपणे समोर आणली आहे. सरत्या वर्षाचा आढावा घेतल्यास मुंबईकरांसाठी ते अपघात आणि दुर्घटनांचे वर्ष ठरले, असेच म्हणावे लागते. गेल्याच आठवड्यात साकीनाका परिसरात एका फरसाणाच्या दुकानाला लागलेल्या आगीत 12 जीव आगीच्या भक्षस्थानी पडले होते. त्या आधी एलफिन्स्टन रोड रेल्वे स्थानकावरी पुलावर झालेल्या अभूतपूर्व चेंगराचेंगरीत 22 जणांचा हकनाक बळी गेला होता आणि याच दुर्दैवी वर्षात घाटकोपर तसेच भेंडीबाजार येथे इमारती कोसळून अनेकांना आपले प्राण गमवावे लागले होते. त्यामुळे या मुंबापुरीतील जीवन केवळ धोकादायकच नव्हे, तर कसे ज्वालामुखीच्या तोंडावर वसलेले आहे, तेच पुनश्‍च एकवार उघड झाले आहे. 

कमला मिलचा परिसर हा अवघ्या काही वर्षांपूर्वी गिरणगाव नावाने ओळखला जात होता आणि तेथे दीड-दोन लाख कामगार कापड गिरण्यांमध्ये घाम गाळून आपली रोजी-रोटी कष्टाने कमावत होते. पुढे याच कामगारांच्या संपात हा परिसर उजाड होऊन गेला आणि त्यानंतर गिरण्यांच्या जमिनी विकून कोट्यवधींची माया पदरी बांधण्याची शक्‍कल धनाढ्य मिल मालकांना सुचली. राज्यकर्ते आणि नोकरशहा तर त्या वेळी या धनदांडग्या मालकांच्या दावणीला बांधल्यासारखेच वागत होते. या जमिनी विकल्यामुळे मग हे दीड-दोन लाख कामगार तर देशोधडीला लागले आणि त्यानंतर तेथे पंचतारांकित सुविधा पुरवणारे मॉल्स, पब तसेच आलिशान रेस्टॉरंट उभी ठाकली. ही बांधकामे होताना, सारेच नियम; मग मुंबई महापालिका असो की राज्य सरकार, यांनी धाब्यावर बसवले होते. नागरिकांच्या सुरक्षिततेचा कोणताही विचार न करता या सुविधा तेथे उभ्या राहत गेल्या आणि त्याकडे दुर्लक्ष करून जनताही या सुविधांची मौज चाखू लागली. शिवाय, या वारेमाप बांधकामांमुळे केवळ या परिसरातीलच नव्हे तर अख्ख्या मुंबईतील वाहतुकीचा बोजवारा उडाला. मात्र, तेव्हा राज्यकर्ते आणि प्रशासन आपण या मुंबापुरीचे रूपडे कसे बदलून टाकत आहोत, याच धुंदीत होते. शुक्रवारी झालेल्या अग्नितांडवास ही अशी भली मोठी आणि मुंबईकरांच्या नशिबी आलेली दुर्दैवी पार्श्‍वभूमी आहे. 

मुंबईत आज राजकारणी, बडे पैसेवाले तसेच नोकरशहा यांच्या संगनमताने या साऱ्या गोष्टी घडत आहेत, त्यास अर्थातच या सात बेटांनी मिळून बनलेल्या आणि पुढे अक्राळविक्राळ पद्धतीने वाढत गेलेल्या महानगरातील जमिनीस असलेला सोन्याचा भाव कारणीभूत आहे. शिवाय, नियोजनशून्य पद्धतीने दिले जाणारे असंख्य परवानेही अनर्थाला कारणीभूत आहेत. त्यामुळेच मग शुक्रवारच्या आगीत अनेक युवतींचा हकनाक बळी घेणारा "हाय-फाय' पब असो की साकीनाक्‍यातील साधे फरसाणाचे दुकान असो की घाटकोपर येथे मनमानी पद्धतीने बांधकाम करताना हलवलेल्या पिलर्समुळे कोसळलेली इमारत असो; हे सारे साधे अपघात नव्हेत. खरे तर या दुर्घटना म्हणजे राज्यकर्ते, प्रशासकीय यंत्रणा तसेच बडे धंदेवाले यांच्या संगनमताने आणि बेजबाबदार कारभारातून घडलेली हत्याकांडे आहेत. 

आता चौकशीचा फार्स होईल, काही अधिकारी निलंबित होतील आणि सर्वसामान्य मुंबईकरही पायाला चाके लावून रोजच्या रोज धावावे लागत असल्याने या दुर्घटना विसरूनही जातील. आताही पाच अधिकारी निलंबित झाले आहेतच; पण केवळ या कारवाईमुळे राज्यकर्ते तसेच नोकरशहा यांनी सुटकेचा निःश्‍वास सोडून चालणार नाही. त्याचे कारण म्हणजे हे सारे असेच वर्षानुवर्षे सुरू आहे. मात्र, सरत्या वर्षात घडलेल्या या दुर्घटनांमुळे किमान आता तरी साऱ्या यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या आणि त्यांनी मुंबईकरांच्या सुरक्षिततेसाठी काही ठोस उपाय योजले तरच कमला मिलमध्ये बळी पडलेल्यांच्या आत्म्यांना दिलासा मिळू शकेल. 

Web Title: marathi news editorial jwalamukhichya tondavar pune edition article