विजय कोणाचा? (ढिंग टांग!)

ब्रिटिश नंदी 
बुधवार, 20 डिसेंबर 2017

दिवसभर टीव्हीसमोर बसूनही "गुजरातच्या निवडणुकीत नेमका विजय कोणाचा झाला?' हे आम्हाला अखेरपर्यंत समजले नाही. विजय कोणाचा झाला, हेच न कळल्याने विजयाचे श्रेय कोणाला द्यावयाचे हेही आम्हाला उमजले नाही, आणि खातो आहोत ती मिठाई कोणत्या पक्षाच्या कार्यालयातून आली आहे, हेदेखील कळले नाही. एकंदरीत सगळा घोळ आहे, कन्फ्यूजन आहे, संभ्रम आहे!!! 
या निवडणुकीचे सांगोपांग विश्‍लेषण करून आम्ही काही निरीक्षणे येथे नोंदवितो आहो. निरीक्षणे अचूक असली तरीही निष्कर्ष काढण्यात मात्र आम्ही सपशेल अपयशी ठरलो आहो. आमची काही निरीक्षणे खालीलप्रमाणे : 

दिवसभर टीव्हीसमोर बसूनही "गुजरातच्या निवडणुकीत नेमका विजय कोणाचा झाला?' हे आम्हाला अखेरपर्यंत समजले नाही. विजय कोणाचा झाला, हेच न कळल्याने विजयाचे श्रेय कोणाला द्यावयाचे हेही आम्हाला उमजले नाही, आणि खातो आहोत ती मिठाई कोणत्या पक्षाच्या कार्यालयातून आली आहे, हेदेखील कळले नाही. एकंदरीत सगळा घोळ आहे, कन्फ्यूजन आहे, संभ्रम आहे!!! 
या निवडणुकीचे सांगोपांग विश्‍लेषण करून आम्ही काही निरीक्षणे येथे नोंदवितो आहो. निरीक्षणे अचूक असली तरीही निष्कर्ष काढण्यात मात्र आम्ही सपशेल अपयशी ठरलो आहो. आमची काही निरीक्षणे खालीलप्रमाणे : 
1. हा अनुभव विदारक होता...आमचे एग्झिट पोल सर्वात करेक्‍ट आले, असे एका च्यानलाने सायंकाळी जाहीर केले. म्हणून आम्ही त्यांना अभिनंदनाचा मेसेज पाठवला. च्यानल बदलल्यावर आधीच्या च्यानलचा दावा सपशेल खोटा असून याच च्यानलचे एग्झिट पोल अचूक आले, हे ध्यानात आले. आम्ही त्यांना मेसेज पाठवला! तिसऱ्या च्यानलावर पाहातो तो काय! आधीचे दोन्ही च्यानल अत्यंत खोटारडे निघाल्याचे कळले. मग त्यांनाही मेसेज पाठवावा लागला. असे बराच काळ चालू राहिल्यानंतर असे लक्षात आले की कोणाचेच एग्झिट पोल चुकलेले नसून सर्वच्या सर्व भाकिते खरी ठरली आहेत. 
2. गुजराथेत मोटाभाई अमितभाई सहा ह्यांची पार्टी जिंकल्याचा कुणाचा गैरसमज झाला असेल, तर कृपया तो मनातून काढून टाकावा. गुजराथेत कमळ पक्षाचा विजय झालाच नाही, उलट नैतिक पराभवच झाला आहे! विजयाचे दोन ढोबळ प्रकार मानले जातात. अ) खरा विजय आणि अर्थात ब) खोटा विजय! काय कळले? 
3. खरा विजय पं. राहुलजी गांधी ह्यांचाच झाला. त्यांचा आणि त्यांच्या 122 वर्षे जुन्या ग्रॅंड ओल्ड अँड यंग पार्टीचा हा शंभर नंबरी खरा विजय आहे. 
3. तसे पाहू गेल्यास, गुजराथेत कमळ पक्षाचा विजय झाला असे म्हणता येईल, आणि पं राहुल गांधी ह्यांच्या ग्रॅंड ओल्ड यंग पार्टीचा विजय झाला, असेही म्हणता येईल. कारण एक धड जिंकला नाही, दुसरा धड हारला नाही, अशीच परिस्थिती आहे. 
4. दोन्ही पक्ष थोडे थोडे जिंकले असे म्हटले तर वावगे होऊ नये किंवा दोन्ही पक्ष थोडे थोडे हरले असे म्हटले तरी वावगे होऊ नये. 
5. कमळ पक्षाचा हा पराभव असला तरी नमोजींचा मात्र शतप्रतिशत विजय आहे. 
6. ग्रॅंड ओल्ड यंग पार्टीचा हा पराभव असला तरी पं. राहुलजींचा मात्र सौफीसदी विजय आहे. 
7. दोघेही पराभूत आहेत...खरा विजय हार्दिकभाई पटेल आणि गॅंगचा झाला. 
8. वंशवाद, सामंतवाद ह्यांच्या विरोधात कमळ पार्टी लढली, इति मोटाभाई. (हाहाहा!!) 
9. शालीनता आणि धैर्य हे दोन ग्रॅंड ओल्ड यंग पार्टीचे दोन अलौकिक गुण आहेत, इति पं. राहुलजी. हाहाहाहाहा!!! 
10. मा. नमोजी आणि मा. मोटाभाई ह्यांना मतमोजणीच्या वेळी प्रचंड घाम फुटला होता. 
11. पं. राहुलजी ह्यांनी तेव्हा थंडी वाजते म्हणून स्वेटर चढवला होता... 
12. कमळ पार्टीला गुजराथेत बहुमत मिळाले, ह्यात आश्‍चर्य वाटण्याजोगे काही नाही. 
13. ग्रॅंड ओल्ड यंग पार्टीला भरघोस यश मिळाले, त्यातही काही नवल नाही. 
14. ह्या विजयाचे किंवा पराजयाचे खरे श्रेय जाते ते फक्‍त एकाच व्यक्‍तीला...तिचे नाव श्रीमान मणिशंकर अय्यर!! 
15. राजकीय पक्षांना धडा शिकवणाऱ्या गुजराथच्या तमाम मतदारांचाच हा विजय आहे. श्रेय त्यांनाच दिले गेले पाहिजे. कर्तृत्व त्यांचेच आहे. त्यांनी दिलेल्या कौलाची फळे तेच चाखतील. त्याचा अभ्यास व्हायला हवा. पण तो कोण लेकाचा करणार आहे? 
असो! 
दरम्यान, तुम्हास काही निष्कर्षाप्रत येता आले तर कृपया कळवावे...आय मीन कोणाला तरी कळवावे! (आम्हाला नको!!) आम्ही तूर्त च्यानल बदलला आहे... 

 

 

Web Title: Marathi News Editorial Page British Nandi Gujarat elections Narendra modi Amit shah