जळजळ!

ब्रिटिश नंदी 
शुक्रवार, 15 डिसेंबर 2017

तूर्त नागपुरात आहो! आढ्याकडे तोंड करून डोळ्यात नाना तऱ्हेची मलमे घालून पडले राहिलो आहो!! शरीर थकून गेले असून डोळे सुजून गेले आहेत...होय, आमची ही अवस्था भडिमार कारभार आणि डल्लामार आंदोलनामुळे झाली आहे. भडिमार कारभाराला जमेल तितके पाठबळ दिल्यानंतर आम्ही अखेर डल्लामार आंदोलनात सामील झालो. डल्लामार मोर्च्यातही आम्ही आघाडीला राहिल्याने पोलिसांच्या जीपगाडीत पहिला झोळणा गेला तो आमच्याच देहाचा. राजकारणात माणसाने सारखे सावध असले पाहिजे!! 

तूर्त नागपुरात आहो! आढ्याकडे तोंड करून डोळ्यात नाना तऱ्हेची मलमे घालून पडले राहिलो आहो!! शरीर थकून गेले असून डोळे सुजून गेले आहेत...होय, आमची ही अवस्था भडिमार कारभार आणि डल्लामार आंदोलनामुळे झाली आहे. भडिमार कारभाराला जमेल तितके पाठबळ दिल्यानंतर आम्ही अखेर डल्लामार आंदोलनात सामील झालो. डल्लामार मोर्च्यातही आम्ही आघाडीला राहिल्याने पोलिसांच्या जीपगाडीत पहिला झोळणा गेला तो आमच्याच देहाचा. राजकारणात माणसाने सारखे सावध असले पाहिजे!! 
डल्लामार आंदोलनाचे आम्ही खरेखुरे पाईक ठरलो. पायी पायी चालणारे ते पाईक! अर्थात आंदोलनात आमच्यापेक्षा अधिक पायी चालणारे बरेच लोक होते. पण त्या सर्वांना दोनच पाय होते. आम्हाला तीच पायपीट दुप्पट वाटली. त्यात डोळ्यांचे दुखणे उपटले!! अधिवेशनाच्या जागी पायऱ्यांवर बसून डल्लामारगिरी करत असताना अचानक आमच्या डोळ्यात जळजळ सुरू झाली. बाजूने जाणाऱ्या पुण्याच्या बापटकाकांनी विचारले की, ""काय? डल्लामार जोरात दिसतंय! डोळे जरा लालऽऽच दिसतायत!!'' आम्ही काही बोललो नाही. आमचे लाल डोळे बघणारे हे बापटकाका नेहमी असेच टोंचून बोलतात. वास्तविक डल्लामार आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व ज्येष्ठ नेत्यांना आम्ही "गॉगल आहे का, गॉगल?' असा एकच प्रश्‍न विचारत होतो; 
पण दरवेळी आम्ही प्रश्‍न विचारला की नेता खिश्‍यातून गॉगल काढून स्वत:च्या डोळ्यांवर चढवत असे. परिणामी आमचे डोळे लाल होतच गेले, होतच गेले... 
यापुढे एकही सरकारी बिल देणार नाही, असा आम्ही निश्‍चय जाहीर केल्यानंतर तर आमचे डोळे भयंकर लाल झाले. तो व्यवस्थेविरुद्धचा संताप आहे, असे आम्ही लागलीच (सावधपणाने) सांगून टाकत होतो. पण आमच्या डोळ्यांकडे बघून लोकांना वेगळेच काही वाटत होते असावे! सरकार सतत दुर्लक्ष करत असेल तर सामान्य माणसाने जगावे तरी कसे? कर्जमाफीची नौटंकी कशाला केली? खोट्यानाट्या भूलथापांनी मराठी माणसाला फसवण्याचे राजकारण किती दिवस चालणार? अशा अनेक सवालांमुळे आमच्या डोळ्यांची लाली वाढत गेली, हे मात्र शतप्रतिशत सत्य आहे... 
डल्लामार आंदोलनाच्या सुरवातीला आमचे डोळे निर्मळ होते. इतके की मोर्च्याच्या सुरवातीला आम्ही एका मोर्चेकऱ्याला विचारले : का हो, आमचे डोळे कसे दिसताहेत?'' 
""पांढरे तर आहेत!...का?'' असे त्यांनी उलट विचारले. आम्ही पुन्हा गप्प बसलो. मोर्चा संपता संपता आम्ही त्याच मोर्चेकऱ्याला पुन्हा विचारले, ""डोळ्यांची जळजळ होऊन राहिली आहे...लाल झालेत का?'' 
""मला का विचारता?'' असे त्याने खेकसून उत्तर दिले. आम्ही चमकून बघितले तर ते दुसरे तिसरे कोणीही नसून सुनील तटकरेजी होते. आम्हाला बघून त्यांनी स्वत:च्या डोळ्यांवर गॉगल चढवला. जाऊ द्या झाले! डल्लामार आंदोलन संपता संपता आमच्या डोळ्यांमध्ये आणखी खून उतरला. डोळ्यांची जळजळ होऊ लागली. डोळे सुजले आणि त्यातून चिपाडे येऊ लागली. डोके किंचित दुखू लागले, आणि नाक वाहू लागले. ही सारी कंजक्‍टिवायटिसची लक्षणे! आपल्यामुळे अन्य मोर्चेकऱ्यांना डोळे येऊ नयेत, म्हणून आम्ही खबरदारीचा उपाय म्हणून डॉक्‍टरकडे गेलो. 
""बाटली आणलीय का?'' असे कंपौंडरने विचारल्यावर "नाही' असे उत्तर देऊन आम्ही नुसतेच नंबर लागण्याची वाट बघत दवाखान्यात बसून राहिलो. पेशंट येत होते, जात होते. 
""अहो, शुकशुक..,'' शेजारचा पेशंट आमच्या मांडीला ढोसकत होता. 
""काय आहे?'' किलकिल्या डोळ्यांनी आम्ही म्हणालो. डोळे आले की शिंचे डोळे उघडणे अशक्‍य होते. 
त्या पेशंटाने इकडे तिकडे बघत पटकन डोळ्यांवरचा गॉगल काढला. आमच्या नजरेला (जमेल तितकी) नजर भिडवत त्याने विचारले : का हो, डोळ्यांची जळजळ होऊन राहिली आहे...लाल झालेत का?'' 
निरखून बघत आम्ही आश्‍चर्याने किंचाळलो. म्हणालो, "" फडणवीसनाना, तुम्हीसुद्धा?'' 
तात्पर्य : आंदोलन डल्लामार असो किंवा भडिमार...डॉक्‍टरांचे बिल देणेही आलेच! असो!! 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi news editorial page dhing tang