बिनतोड!

Dhing-tang-20.
Dhing-tang-20.

स्थळ : मातोश्री महाल, वांद्रे. 
वेळ : ओढवलेली! 
काळ : टाइम प्लीज म्हणणारा. 
प्रसंग : बांका. 
पात्रे : नेहमीचीच! 
.............................. 
कमळाबाई त्यांच्या अंत:पुरात कसली तरी आवराआवर करत आहेत. मधूनच आपला साजशृंगार ठीकठाक करत आहेत. आरशात निरखून बघत किंचित हसत, मुरकत आहेत. अधूनमधून दरवाजाकडे नजर टाकत आहेत. अब आगे... 
उधोजीराजे : (आल्या आल्या सतरंजीला अडखळत) ओय! हर हर महादेव... कित्तीही काळजी घेतली तरी हे तुमचे जाजम आम्हाला दगा देतेच! तुकडे तुकडे करून पायपुसणी करीन तेव्हा समजेल!! 
कमळाबाई : (शांतपणे) आत्ताची पायपुसणी आधीच्या जाजमाचीच आहेत म्हटलं!! नवी नको आहेत! गेल्या पंचवीस वरसांत पंचवीस जाजमं झाली!! 
उधोजीराजे : (रागारागाने मिशीला पीळ देत) बरं बरं! जीभ फार चुरुचुरु चालते तुमची हल्ली!! जीभ सुटत चालली आहे!! 
कमळाबाई : (आणखी शांतपणे) वयाचा परणाम!! सौंसार परिपक्‍व झाला की बायकांच्या जिभा आणि पुरुषांची पोटं सुटणारच!! हुहु!! 
उधोजीराजे : (गुळमुळीत घुश्‍शात) आमची पोटं नाही सुटली, तुमच्या जिभा मात्र सुटल्या!! 
कमळाबाई : (शिताफीनं विषय बदलत) आज कसं काय स्वारीनं येणं केलं? 
उधोजीराजे : (घुश्‍शात)...आमच्या मनाची मर्जी!! ह्या महाराष्ट्राच्या मुलखात आम्ही कुठंही जायला मुखत्यार आहो!! 
कमळाबाई : (मान हलवत) बाई बाई बाई बाई! स्वारीचं आज काहीतरी बिनसलं आहे वाटतं!! दिल खट्टा का झाला एका माणसाचा? 
उधोजीराजे : (पाठमोरे उभे राहात कडाडत)...कोण कुठला तो कोकणातला भुरटा सरदार? आमचा साता जन्माचा वैरी!! पण...पण...त्याला तुम्ही पनाह दिलीत? आमच्या दुश्‍मनाला घरात आश्रय द्यायला निघालात? हा द्रोह आहे, कमळाबाई, सपशेल द्रोह!! दुसरा कुणी असता तर आज त्याला तीन वेळा तोफेच्या तोंडी देऊन, मग सात वेळा हत्तीच्या पायी दिलं असतं आणि नऊ वेळा कडेलोट केला असता!! पण आमचा केसानं गळा कापणाऱ्या तुम्ही निघालात!! दैवाचं दान असं उलटं पडलंय, की तुम्हाला शिक्षा सोडाच, साधी चापट मारता येत नाही!!..म्हणून...म्हणून आमचा दिल खट्टा झाला आहे!! कळलं? 
कमळाबाई : (खळखळून हसत) इश्‍श्‍श! येवढंच ना...आहो, पराचा किती कावळा करायचा म्हंट्ये मी!! शरण आलेल्याला पनाह द्यावी, ही तुमचीच शिकवण नं? उलट आमच्या कृतीमुळे तुम्ही आम्हाला शाबासकी द्याल असं वाटलं होतं!! (डोळ्यांत पाणी आणत) वाटलं होतं, इतकी चांगली बातमी ऐकायला तुम्ही जातीनं याल! आम्ही ती तुमच्या कानात सांगू. तुमचं तोंड गोड करू... 
उधोजीराजे : (गोंधळून) आँ? 
कमळाबाई : (हुंदका आवरत)...तुम्हे तो ये भी नहीं पता की...की... 
उधोजीराजे : (अजीजीने) नका हो, नका असे डोळे गाळू!! थोडा घुस्सा केला म्हणून इतकं कशाला ताणायचं? आणि त्या वैऱ्याला पनाह देणं ही चांगली बातमी कशी? 
कमळाबाई : (घाईघाईनं मिठाईचा बॉक्‍स काढत) हा खा लाडू!! 
उधोजीराजे : (च्याटंच्याट पडत) आता ही मिठाई कसली? 
कमळाबाई : (खोटं हसत) आहे कसली तरी! फुकट मिळतेय तर खा!! 
उधोजीराजे : (संशयानं) मिठाई फुकट मिळाली म्हणून ओरपणाऱ्यातले आम्ही नव्हंत!! कारण सांगा!! 
कमळाबाई : (खुशीत)...आमच्या गुजराथ आणि हिमाचलच्या विजयाखातर तोंड गोड करा म्हंटे मी!! 
उधोजीराजे : (मिठाई फेकून देत) हुं:!! मग तर नकोच!! त्या भंकस विजयाबद्दल तुमचं अभिनंदन करावं की त्या राहुलजींच्या सुंदर पराभवाबद्दल त्यांचं.. हे अजून ठरायचं आहे आमचं!! 
कमळाबाई : (सूड काढल्यागत सुरात)...अस्सं का? मग आमच्या जन्माच्या दुश्‍मनाचं अभिनंदन करायला निघालेल्यानी आमच्या कडेलोटाची भाषा का करावी? बोला, बोला ना!! 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com