कुणाची वाट बघताय? (पहाटपावलं)

Marathi News Editorial Page Dr. Spana Sharma Positive Article
Marathi News Editorial Page Dr. Spana Sharma Positive Article

तुमच्या आयुष्यात कुठली कमतरता आहे? कमतरता त्याला म्हणतात, जे आपल्याला हवं आहे, परंतु आपल्याकडे नाही. आहे त्यापेक्षा अधिक तुम्हाला काय हवं आहे? पैसा, ज्ञान, प्रतिष्ठा, सामाजिक मान्यता, मित्र, प्रेम, प्रवास, आत्मविश्वास, इंग्रजीवर प्रभुत्व, वक्तृत्व कला, राग आवरण्याची कला की आणखी काही? अशा काही समस्या आहेत काय ज्या तुम्हाला जीवनाचा आनंद घेण्यापासून वंचित करीत आहेत? मुलं तुम्हाला मान देत नाहीत? जोडीदाराशी प्रयत्न केला तरी जमत नाही? नोकरी मनासारखी नाही? काही तरी नक्कीच असेल, जे बदलायला हवं अशी तुमची इच्छा असेल. मग त्यासाठी तुम्ही नेमके कुठले उपाय करायला सुरवात केलीय? "प्रयत्न सुरू आहेत' असं उत्तर देऊ नका. नेमकं काय करताहात हे लिहून काढायचा प्रयत्न करा आणि मग तुमच्या लक्षात येईल की आपल्या इच्छा पूर्ण करायला किंवा समस्या दूर करण्यासाठी तुम्ही खरंच किती ठोस उपाय करत आहात. 

माझ्या अनुभवानुसार बहुतांश लोक फक्त तेवढीच मेहनत करतात, जी जीवनावश्‍यक असते. यापलीकडे आपण बऱ्याच इच्छा बाळगतो, काही गोष्टी बदलायला हव्यात अशी प्रार्थना करतो, आपल्या अपूर्ण इच्छा आणि होणाऱ्या त्रासाची तगमग आपण संताप, द्वेष, चीड यासारख्या नकारात्मक वागणुकीद्वारे व्यक्त करतो आणि दुसऱ्यांना तेच मिळाले तर हेवा करतो. परंतु, आपल्याला हवं असलेलं मिळविण्यासाठी हवे तसे प्रयत्न करत नाही. कशाची वाट पाहतोय आपण? कुणाची वाट बघतोय? कोण येणार आहे आपलं जीवन सुखी करण्यासाठी? माहीत नाही, पण सुप्तपणं कुठल्यातरी चमत्काराची आपण वाट बघत असल्याचं जाणवतं. पण आपोआप कसं काय होणार? इंग्रजीवरचं प्रभुत्व चांगलं नाही म्हणून वाईट वाटून घेण्यापेक्षा कुणाची तरी मदत घेऊन किंवा पुस्तकं, इंटरनेट वापरून तुम्ही शिकायला सुरवात का करत नाही? मुलांच्या वागण्यात दिवसेंदिवस विचित्रपणा वाढतोय, त्यांच्यावर ओरडण्यापेक्षा वडीलधाऱ्यांची किंवा समुपदेशकाची मदत घेऊन मुलांचं आणि स्वतःचंही आयुष्य सुखमय करण्यासारखा सोपा उपाय आपण का करत नाही? 

प्रत्येक गोष्टीला उपाय आहे. आज कितीही कठीण वाटत असली ती प्रत्येक वाट पुढेच घेऊन जाते. परंतु, आपण आळस, अहंकार किंवा समाजासाठी लावलेला आपला खोटा मुखवटा घेऊन कुठल्या तरी चमत्काराची वाट बघत बसतो. कुणीही येणार नाही... कुणासाठी कुणी येत नसतं... तेव्हा आपली समस्या मान्य करून आपल्याला हवी तशी मदत मागावी लागते आणि त्याप्रमाणं एका वेळी एक का होईना, पण ठोस पाऊल स्वतःच उचलावं लागतं. मग सगळंच काही शक्‍य आहे. 

प्रिय वाचकहो, तुमच्याशी संवाद साधणारा या सदरातील हा शेवटचा लेख. वर्षभर बऱ्याच विषयांवर तुमच्याशी संवाद केला. बऱ्याच वाचकांनी आवर्जून प्रतिक्रिया कळविल्या आणि माझ्या लेखनाला नवीन अर्थ दिला. आपल्या सर्वांच्या जीवनालाही अशीच नवीन दिशा मिळत राहो, हीच इच्छा. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com