'द्राविडी' त्रांगडे! (अग्रलेख)

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 डिसेंबर 2017

तमिळनाडूतील पोटनिवडणुकीत मतदारांनी अण्णा द्रमुकला हादरा देत शशिकला यांचे भाचे दिनकरन यांच्या बाजूने कौल दिला आहे. या निकालाचा परिणाम द्रविडी राजकारणावर, तसाच देशाच्या राजकारणावरही होणार आहे. 

तमिळनाडूतील राजकारण किती गुंतागुंतीचे होत चालले आहे, याचे प्रत्यंतर जयललिता यांच्या निधनानंतर रिक्‍त झालेल्या राधाकृष्णनगरमधील पोटनिवडणुकीच्या निकालामुळे सत्ताधारी अण्णा द्रमुक व विरोधक द्रमुक या दोन्ही पक्षांना आले असणार! जयललिता यांच्या निधनानंतर त्यांच्या राजकारणाचा वारसा त्यांच्या जिवलग सखी शशिकला यांच्याकडे आहे की अन्य कोणाकडे, यावरून रणधुमाळी माजली होती. त्यातून अण्णा द्रमुकमधील मतभेदही चव्हाट्यावर आले होते आणि तमिळनाडूवर सलग दुसऱ्यांदा सत्ता मिळवणाऱ्या पक्षाच्या चिरफळ्या उडाल्याचे दिसत होते. त्यामुळेच द्रमुकचे सर्वेसर्वा करुणानिधी व मुख्यमंत्रिपदासाठी उतावीळ झालेले त्यांचे चिरंजीव स्टॅलिन हे खुशीची गाजरे खाऊ लागले होते. मात्र, राधाकृष्णनगरच्या जनतेने कौल दिला तो अण्णा द्रमुकचे एकेकाळचे "चाणक्‍य' आणि शशिकला यांचे भाचे टी. टी. व्ही. दिनकरन यांना! खरे तर हा निकाल अघटित म्हणावा असाच होता. अण्णा द्रमुकमधील फुटीनंतर "दोन पाने' हे पक्षाचे निवडणूक चिन्ह मिळवण्यावरूनही मोठा संघर्ष झाला आणि अखेर ते चिन्ह मिळाल्यामुळे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी या निवडणुकीत आपला विजय गृहीतच धरला होता. अण्णा द्रमुकच्या विरोधातील द्रमुकच्या उमेदवाराला भाजपवगळता राज्यातील बहुतेक सर्व छोट्या-मोठ्या पक्षांचा पाठिंबा होता. तरीही दिनकरन हे बंडखोरीचे निशाण फडकवत मैदानात उतरले आणि त्यांनी थोड्याथोडक्‍या नव्हे, तर 40 हजारांच्या मताधिक्‍यांनी दणदणीत विजय संपादन केला! दिनकरन यांचा विजय ही केवळ अण्णा द्रमुकसाठीच नव्हे, तर द्रमुकसाठीही धोक्‍याची घंटा आहे. त्याचे कारण म्हणजे जयललिता यांच्याविरोधात बऱ्यापैकी मते घेणाऱ्या द्रमुकच्या मतपेढीलाही खिंडार पाडण्यात दिनकरन यशस्वी झाले आहेत! शिवाय, कार्यकर्त्यांचे बळ पाठीशी असल्यावर निवडणूक चिन्ह कोणते आहे, यावर काहीच अवलंबून असत नाही, हेच त्यांनी दाखवून दिले आहे. त्यामुळेच अण्णा द्रमुकमध्ये फूट पाडण्यासाठी ही स्टॅलिन यांचीच चाल होती, असे आता सांगण्यात येत आहे. ते काहीही असले तरी दिनकरन यांचा विजय ही द्रविडी राजकारणाला वेगळे वळण देणारी घटना आहे, यात शंका नाही! 

दिनकरन हे अण्णा द्रमुक पक्षातील खरे तर पडद्याआडून सूत्रे हाताळणारे; पण वादळी व्यक्‍तिमत्त्व! जयललिता यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक जाहीर झाली आणि या मतदारसंघात पैशाचा असा काही पूर वाहू लागला की, निवडणूकच रद्द करण्यावाचून निवडणूक आयोगापुढे पर्याय उरला नाही. त्यानंतर पुनःश्‍च एकवार निवडणूक जाहीर झाली, तेव्हाही पैशांची उघड उघड उधळपट्टी सुरू होती आणि एवढेच नव्हे तर दिनकरन यांचे चिन्ह असलेले प्रेशर कुकरही वाटले जात होते. अर्थात, दिनकरन यांचे चरित्र आणि चारित्र्य काही धुतल्या तांदळासारखे कधीच नव्हते! 2004 मध्ये लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला, तेव्हाच त्यांचे राजकारण संपल्याचे बोलले जात होते. मात्र, नंतर लगेचच ते राज्यसभेत गेले आणि त्यांचे वास्तव्य बराच काळ दिल्लीतच असे. याच काळात थेट निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना लाच देण्याच्या आरोपावरून त्यांना "तिहार जेल'ची हवाही खावी लागली होती! मात्र, भ्रष्टाचार वा गैरव्यवहाराच्या आरोपांचा राजकारणाच्या मैदानातील लोकप्रियतेवर कसा परिणाम होऊ शकत नाही, हेच त्यांनी लालूप्रसाद यांच्यापाठोपाठ ही पोटनिवडणूक जिंकून दाखवून दिले आहे. अर्थात, याचा परिणाम जसा द्रविडी राजकारणावर होणार, त्याचबरोबर देशाच्या राजकारणावरही होणार आहे. अण्णा द्रमुक पक्षात फुटीचे वारे वाहू लागले, तेव्हा भाजप त्यातील एका गटाला मदत करत होताच. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जातीने चेन्नईमध्ये जाऊन करुणानिधी यांची भेट घेतली होती. दीड वर्षावर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीत नेमकी कोणाशी समीकरणे जुळवायची या संबंधातच भाजपच्या या हालचाली होत्या. दिनकरन यांच्या विजयामुळे आता भाजपलाही आपल्या धोरणाबाबत नव्याने विचार करावा लागणार आहे. शिवाय, त्या पलीकडला प्रश्‍न आधीच 18 आमदारांचा पाठिंबा असलेल्या दिनकरन यांच्या गोटात अण्णा द्रमुकचे आणखी काही आमदार दाखल होतात काय, हा आहे. तसे झाल्यास तेथील सरकार कोसळूही शकते. 

या पोटनिवडणुकीबरोबरच देशात अन्यत्र झालेल्या पोटनिवडणुकांत अरुणाचलमधील दोन्ही जागा कॉंग्रेसकडून भाजपने खेचून घेतल्या आहेत. तसेच उत्तर प्रदेशातील जागा राखली आहे. मात्र, पश्‍चिम बंगालमध्ये भाजपची डाळ ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेसने शिजू दिलेली नाही. मात्र, या पोटनिवडणुकांपेक्षाही साऱ्यांचे लक्ष लागले होते, ते तमिळनाडूकडेच आणि अण्णा द्रमुक पक्षात कितीही वाद सुरू असले, तरी कार्यकर्ते आणि मुख्य म्हणजे पक्षसंघटना ही आपल्याबरोबरच आहे, हे दिनकरन यांनी दाखवून दिले आहे. त्यामुळेच एका अर्थाने हा शशिकला यांचाही विजय आहे. पलानीस्वामी यांच्या हाती सध्या मुख्यमंत्री म्हणून राज्याची सूत्रे आहेत, मात्र संघटना आपल्याबरोबर राखण्यात मिळवलेल्या यशामुळे जयललिता यांचे खरे वारस आपणच आहोत, हे दिनकरन यांनी दाखवून दिले आहे. 
 

Web Title: Marathi news Editorial Page Main Editorial Tamilnadu Politics