सामंजस्य टिकेल का?

marm
marm

युद्धात आणि प्रेमात सारे क्षम्य असते, असे म्हणतात. प्रचारयुद्धालाही ही उक्ती लागू आहे, असा काहींचा समज असतो आणि त्यामुळेच प्रतिस्पर्ध्यांना घायाळ करण्यासाठी मग ते बेफाम आरोप करतात. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही याला अपवाद ठरले नाहीत. त्यांनीदेखील गुजरात विधानसभा निवडणुकीतील प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात कॉंग्रेसच्या काही नेत्यांवर जे गंभीर आरोप केले, त्याचे पडसाद केवळ निवडणुकीपुरते मर्यादित न राहता थेट संसदेपर्यंत उमटले. "मणिशंकर अय्यर यांच्या निवासस्थानी पाकिस्तानच्या राजदूतांबरोबर झालेल्या एका बैठकीत माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनीही भाग घेतला आणि त्यात गुजरात निवडणुकीविषयी विचारविनिमय झाला; एवढेच नव्हे तर अहमद पटेल यांना या राज्याचे मुख्यमंत्री करण्याचा मुद्दाही त्यात चर्चिला गेला,' असा आरोप करून मोदी यांनी सनसनाटी निर्माण केली. निवडणुकीत पाकिस्तानला ओढून राष्ट्रवादाची भावना चेतवण्याचा आणि त्यायोगे मते मिळविण्याचा हा डाव होता, यात शंकाच नाही; परंतु डॉ. मनमोहनसिंग यांच्यासारख्या विद्वान आणि प्रामाणिक राजकारणी व्यक्तीच्या निष्ठेविषयीच त्यात शंका घेतली गेली आणि ही बाब झोंबणारी अशीच होती. त्यामुळे संतापलेल्या डॉ. सिंग यांनीही "न बोलावता नवाझ शरीफ यांच्या वाढदिवसासाठी पाकिस्तानात जाणाऱ्यांनी आम्हाला देशभक्ती शिकवू नये,' असा टोला हाणला. निवडणूक पार पडल्यानंतरही ही कटुता मावळली नाही आणि पंतप्रधानांनी मनमोहनसिंग यांची माफी मागितल्याशिवाय राज्यसभेचे कामकाज चालू न देण्याचा पवित्रा कॉंग्रेसने घेतला. "मनमोहनसिंग यांच्याविषयी आम्हाला आदर आहे आणि त्यांच्या देशाविषयीच्या निष्ठेबद्दल कसलाही किंतू नाही,' अशा शब्दांत भाजपच्या वतीने दिलगिरी व्यक्त करण्यात आल्यानंतर ही कोंडी फुटली. पंतप्रधानांविषयी कॉंग्रेसमधील काहींनी केलेल्या विधानांबद्दल गुलाम नबी आझाद यांनीही खेद व्यक्त केला. हे जे सामंजस्य दाखविले गेले, ते स्वागतार्ह आहे आणि त्यामुळे राज्यसभेचे कामकाज सुरू झाले. परंतु, असे सामंजस्य अपवादात्मक प्रसंगातच प्रकटते, ही दुर्दैवाची बाब. राजकीय विचारांत मतभेद असणे म्हणजे वैयक्तिक शत्रुत्व नव्हे, याचा बऱ्याचदा अनेकांना विसर पडतो. प्रचारकाळातच नव्हे, तर एरवीही अनेकांच्या जिभा सैल सुटतात. असे लोक सर्व पक्षांत आहेत हे खरे असले, तरी भाजप आणि कॉंग्रेस या राष्ट्रीय पातळीवरील पक्षांची जबाबदारी अधिक आहे. त्यांनी योग्य तो वस्तुपाठ घालून द्यायला हवा. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com