आगीशी खेळ (मर्म) 

Marathi News Editorial page mumbai topic fire incidence
Marathi News Editorial page mumbai topic fire incidence

गर्दी हेच वैशिष्ट्य असलेल्या मुंबईसारख्या उद्योगनगरीत व्यावसायिकांची आणि उद्योगांची गर्दी आहे; पण रोजगार देताना कोणत्याही शहराने कामगारांच्या जिवाशी खेळू नये, अशी अपेक्षा असते. सोमवारी पहाटे साकीनाका परिसरातील दुर्घटनेने ही साधीशी अपेक्षाही पूर्ण होणे दुरापास्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. साकीनाका परिसरात फरसाणच्या दुकानात लागलेल्या आगीत बारा कामगारांना जीव गमवावा लागला. या छोट्याशा दुकानवजा कारखान्यात फक्त पाच कामगार असल्याची नोंद पालिकेकडे आहे; पण प्रत्यक्षात या आगीने बळी घेतले बारा कामगारांचे. एकाने खिडकीतून उडी मारल्याने त्याचा जीव बचावला. म्हणजेच तेथे किमान तेरा कामगार होते हे नक्की. हे कामगार आहेत परराज्यांतील. जगण्यासाठी मुंबईत आलेल्या या साऱ्यांचा आगीने बळी घेतला. पैसे कमावण्यासाठी आलेले हे कामगार अतिशय दयनीय परिस्थितीत काम करतात. त्यांच्याकडे ना कुठली सुरक्षा साधने ना आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्याची तयारी. त्यांना काम देणारे अशा गोष्टींवर खर्च करण्यापेक्षा अधिकाधिक कमाई कशी करता येईल, यातच मश्‍गुल. त्यांच्यावर ज्यांनी लक्ष ठेवायचे त्या पालिकेच्या अधिकाऱ्यांचेही "कमाई'कडेच लक्ष. त्यामुळे अशा आगीशी खेळ करणाऱ्या असंख्य कारखान्यांची अनिर्बंध वाढ होते आहे. अशा दुर्घटनानंतर गदारोळ होतो, राजकीय मंडळी निषेध-चौकशी-कारवाईची मागणी करतात. अधिकारी चौकशीची घोषणा करतात, जबाबदारी निश्‍चितीची घोषणा करतात; पण पुढे त्याचे होते काय? समाज विस्मरणशील असल्याने नवी दुर्घटना होईपर्यंत याबाबत पुन्हा अवाक्षरही निघत नाही. 

गेल्या काही दिवसांत मुंबईत लागणाऱ्या आगीच्या घटना पाहता मुंबईचा अशा दुर्घटनांतून सुटकेचा मार्गही बंद होऊ पाहतोय. उद्यमनगरी मुंबई भाकरी देते; पण ती सुळावरची पोळी ठरू नये. येथे येणारे कामगार जीव धोक्‍यात घालून नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करतातच. कारण, त्यांनी नाकारली तरी दुसरा कुणी त्यासाठी प्रयत्न करणारच असतो. या साऱ्यांना दिसते ती केवळ कमाई. त्यांचे मालक आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवणाऱ्यांनाही नेमकी तीच दिसत असते; पण कमाईसाठी असा आगीशी खेळ होऊ नये. कारण तो एक दिवस साऱ्यांचाच घास घेऊ शकतो. हाच या दुर्घटनेचा धडा आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com