दाव्होस : एक पर्वणी! 

PNE18N36578_org
PNE18N36578_org

डाव्होस ह्या स्विस आल्प्समधील एका बर्फील्या ठिकाणी नित्यनेमे "वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम'च्या बैठका होतात. त्याला देशोदेशीचे प्रमुख आणि मान्यवर अर्थतज्ज्ञ येत अगत्याने हजेरी लावतात. "आपण काहीही करून यंदा ह्या बैठकीला जायलाच हवे' हे आम्हीच प्रधानसेवक श्रीश्री नमोजी ह्यांना सुचवले. नव्हे, गळीच उतरवले. चिक्‍कार देशांचे प्रमुख येथे एकगठ्‌ठा भेटणार असल्याने तुम्हाला पर्वणीच मिळेल, असे त्यांना पटवून देण्यात आम्हाला यश आल्याने अखेर त्यांनी ब्याग भरण्यासाठी घेतली. ब्याग भरण्याच्या इव्हेंटला आम्ही उपस्थित होतो. 

शेजारीच वकीलसाहेब ऊर्फ अरुणजी जेटलीजी उभे होते. त्यांच्या शेजारी उद्योगश्री प्रभुसुरेश अस्वस्थपणे चुळबुळ करत उभे होते. (ह्या गृहस्थांस प्रवासाचे टेन्शन येत असावे, असा आमचा संशय आहे.) कां की श्रीश्री नमोजी ह्यांच्यासोबत त्यांनाही डाव्होसची वारी घडणार होती. ""त्यां ठंडु छे के?'' असे नमोजींनी ब्याग भरताना सावधपणाने विचारले. त्यासरशी आम्ही हा प्रश्‍न अर्थशास्त्रीय मानावा की नाही, ह्या संभ्रमात नाक खाजवू लागलो, आणि प्रभुसुरेश ह्यांनी मोबाइल फोन काढून उगीचच उघडून पाहिला. असा बराच वेळ शांततेत गेला. ""ज्याअर्थी तिथे बर्फ आहे, त्याअर्थी थंडीही आहे, असे म्हटल्यास ते वावगे होणार नाही!'' आमच्या वकीलसाहेबांनी एक बोट वर उंचावून आपली टिप्पणी केली. 

""म्हंजे काय? अर्थातच! अराऊंड 5.6 डिग्री असेल सरासरी!'' आम्ही अर्थशास्त्रीय उत्तर दिले. ""एक मिनिट...तुम्ही डाव्होसच्या हवेबद्दल बोलताहात की आपल्या जीडीपीबद्दल?'' ताडकन उठत वकीलसाहेबांनी ऑब्जेक्‍शन घेतले. आम्ही गडबडलो. त्यावर "जवां दे ने अरुणभाई' असे म्हणत नमोजींनी ऑब्जेक्‍शन ओव्हररूल केले, म्हणून बरे! ""अमणां दाहोद जावानुं छे ने?'' नमोजींनी ब्यागेत तीन नमोजाकिटे कोंबत विचारले. हा मात्र सपशेल अर्थशास्त्रीय घोळ होता. ""दाहोद गुजराथेत आहे, साहेब! डाव्होस आल्प्स पर्वतात असून, स्वित्झर्लंडमधील झुरिकपासून सुमारे दोन तासाच्या अंतरावर आहे...,'' आम्ही अर्थशास्त्रीय माहिती पुरवली. कुणाला ही माहिती भौगोलिक वाटेल, पण नाही, आमच्या मते ही अर्थशास्त्रीय माहितीच आहे. स्वित्झर्लंडमध्ये झुरिकहून दोन तासावर डाव्होस आहे, अशी माहिती आम्ही दिल्यानंतर एवढा वेळ गप्प उभे असलेले प्रभुसुरेश खिशातून बारके चोपडे काढून निरखून पाहू लागले. 
""तुम्ही रेल्वे टाइमटेबल का बघताय?''आम्ही शांतपणे विचारले. ह्या गृहस्थांचे रेल्वे खाते गेले, पण येळकोट काही गेलेला नाही. 

""...तो पछी स्वॅटर लेवु पडशे!'' नमोजींनी छोटी ब्याग रद्द करून मोठी कपाटातून काढली. छोट्या ब्यागेत स्वेटर मावणे अशक्‍य होते. तथापि, नमोजींना एक मूलभूत अर्थशास्त्रीय प्रश्‍न पडला होता, की इतक्‍या थंडीत नमोजाकीट आणि नमोकुर्ता आणि नमोशाल पुरेशी होईल का? त्यावर आम्ही "होय' असे स्पष्ट उत्तर दिले. शेवटी गरमकोटाच्या वर हा सर्व जामानिमा घालावा, असे वकीलसाहेबांनी सुचवले, तर खबरदारीचा उपाय म्हणून एक घोंगडेही घ्यावे, अशी सूचना प्रभुसुरेश ह्यांनी केली. नमोजींनी प्रॅक्‍टिस म्हणून हे सर्व परिधान करून पाहिले. एवढे कपडे एकावर एक घातल्यावर थंडीपासून मुकाबला एकवेळ शक्‍य असले, तरी माणसाला चालता येणे मात्र केवळ अशक्‍य आहे, हे लक्षात आल्याने सारे बारगळले. 

अखेर एक छानसा सुटसुटीत (दहाएक लाखाचा) सूट तेवढा परिधान करावा, बाकी सर्व उष्ण कपडे ब्यागेबाहेर काढावे, असा अर्थशास्त्रीय निर्णय आम्ही तिथल्यातिथे देऊन टाकला. ""का?'' वकीलसाहेबांनी (सवयीने) आम्हाला क्रॉस केले. आम्ही उत्तरलो : ""एकगठ्‌ठा येवढ्या राष्ट्रप्रमुखांना जादूची झप्पी देण्याची पर्वणी दुसरी कुठली आहे? तेथे कपड्यांचा बडिवार कशाला?'' 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com