पट्टीचा खेळ! 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जानेवारी 2018

दक्षिण आफ्रिकेत भारतीय संघाला पूर्णपणे पराभूत करण्याची कडेकोट तयारी झाली होती आणि त्यासाठी आधार घेण्यात आला खेळपट्टीचा. हे प्रकार नवे नाहीत; पण दक्षिण आफ्रिकेने मर्यादा पार ओलांडली. 

पैसे मिळवून देणाऱ्या खेळामध्ये क्रिकेटचे स्थान किती अव्वल आहे, हे वेगळे सांगायला नको. "आयपीएल' लिलावातील आकडे पुरेसे बोलके आहेत; परंतु पैशाच्या बरोबरीनेच खेळाभोवती; किंबहुना स्पर्धांभोवती अधिकाधिक अपेक्षांचे जाळे तयार होते आणि मग खेळपट्टी बनविण्यापासूनच डावपेचांना सुरवात होते. कधी फलंदाजांना, तर कधी गोलंदाजांना अनुकूल अशी ती बनविली जाते. कसोटी क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेने केलेल्या अशाच डावपेचांना "विराट सेने'ने जे उत्तर दिले ते तोडीस तोड होते, यात शंका नाही. "फायर विथ फायर' असा जिगरबाज खेळ भारतीय संघाने केला. 

मायदेशात सातत्याने जिंकून भारतीय संघ परदेशात दाखल झाला होता. त्यामुळे त्यांचा हा विजयाचा "विराट' रथ रोखण्याची अहमहमिका प्रतिस्पर्ध्यांमध्ये सुरू असते. दक्षिण आफ्रिकेत हेच घडले. पण त्यासाठी खेळपट्टीचे केलेले "खेळ' क्रिकेटच्या सभ्यतेस साजेसे नव्हते. मुळात भारतीय संघ मायदेशात खेळत असो, की परदेशात; खेळपट्टीचा मुद्दा विजय-पराजयापेक्षा अधिक गाजतो. 2017 या वर्षात विराट कोहलीच्या भारतीय संघाने मायदेशात मिळवलेले अभूतपूर्व यश आणि कसोटी क्रिकेटमधील अव्वल स्थान साहजिकच क्रिकेटविश्‍वावर या अगोदर राज्य गाजवणाऱ्या दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया यांच्या डोळ्यांत खुपत असणार. त्या पार्श्‍वभूमीवर दक्षिण आफ्रिकेत भारतीय संघाला पराभूत करण्याची कडेकोट तयारी झाली आणि त्यासाठी आधार घेण्यात आला होता खेळपट्टीचा. प्रत्येक देश आपल्या ताकदीनुसार असा प्रयत्न करत असतो, हे खरेच; पण आफ्रिकेने मर्यादा पार ओलांडली. यासाठी कदाचित दोन वर्षांपूर्वी नागपूरमध्ये झालेल्या कसोटीची पार्श्‍वभूमी असावी. त्या वेळी फिरकीच्या आखाड्यात आपण त्यांना चीत केले होते. 

दक्षिण आफ्रिकेत भारताने कसोटी मालिका गमावली होती; तरीही जोहान्सबर्गमधील तिसऱ्या सामन्यातही भारताला चारी मुंड्या चीत करून मानसिक खच्चीकरण करण्याचा तो डाव होता. तरीही सर्व प्रतिकूल परिस्थितीत भारतीयांनी तोडीस तोड उत्तर दिले. डरकाळी फोडणाऱ्या वाघाच्या गुहेत जाऊन आव्हान देण्याचा मार्ग त्यांनी स्वीकारला. पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेऊन भारतीयांनी आपला बेडरपणा दाखवून दिला. हा सामना जिंकून कसोटी क्रमवारीतील अव्वल स्थान कायम राखले हे महत्त्वाचे नव्हते, तर उसळणाऱ्या चेंडूंवर ग्लोजमधून बोटे शेकत असतानाही सामना रद्द न करता खेळत राहण्याची जिगर अफलातून होती. "अनप्लेएबल' किंवा धोकादायक खेळपट्टी अशी ओरड केली असती, तर कदाचित सामना रद्द झाला असता; पण आफ्रिकेला पराभूत करूनच भारतीयांना उत्तर द्यायचे होते आणि ते करूनही दाखवले. जोपर्यंत भारतीय फलंदाज चेंडूचा मार खात होते तेव्हा दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू मजा बघत होते; परंतु त्यांचा सलामीवीर डीन एल्गरच्या हेल्मेटवर चेंडू लागला तेव्हा त्यांची पाचावर धारण बसली. त्यांचाच डाव त्यांच्यावर उलटला. अशा वेळी सामना रद्द करण्याची मागणी केली असती, तर दुहेरी नाचक्की झाली असती; पण त्या अगोदर भारतीय संघाने दाखवलेल्या जिद्दीपुढे त्यांना लाज वाटली. शेवटी पराभूत झाल्यावर याच एल्गरने हा सामना हा सामना अगोदरच रद्द करायला हवा होता, अशी दिलेली कबुली त्यांचा रडीचा डाव स्पष्ट करणारी होती. 

खेळपट्टीच्या या वादाच्या झळा इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात पोचल्या असतील. कारण जून-जूलैमध्ये इंग्लंड आणि नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये हाच भारतीय संघ कसोटीतील आपल्या अव्वल स्थानाचे नाणे खणखणीत वाजवण्यासाठी जाणार आहे. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया "पुढच्याच ठेच...' या न्यायाने शहाणे होतील, असे वाटते. अलीकडे खेळापेक्षा अधिक महत्त्व मिळत असलेल्या खेळपट्टीचा हा वाद केवळ भारत किंवा आता दक्षिण आफ्रिकेपुरता मर्यादित नाही, तर गेल्या महिन्यात ऍशेस मालिकेतील पर्थची खेळपट्टीही पंचांनी निकृष्ट ठरवली होती. थोडक्‍यात काय तर घरोघरी मातीच्या चुली. क्रिकेटच्या सभ्यतेला हे मारक आहे. प्रतिस्पर्ध्यांना कोणत्याही परिस्थितीत हरवण्यासाठी साम, दाम, दंड, भेदाचा वापर हा खेळाला अंतिमतः मारक असतो. कसोटी क्रिकेटमध्येही आता विजेतेपदाची स्पर्धा होणार आहे. प्रत्येक एकमेकांशी "होम आणि अवे' सामने खेळणार आहे. 

"आयसीसी'ने पुढील प्रस्तावित कार्यक्रमाच्या आराखड्यात याची रचना केली आहे, पण केवळ आकसाने जर अशा खेळपट्ट्या तयार केल्या गेल्या, तर ती स्पर्धा कितपत निकोप होईल? मैदानाबाहेरच्या खेळीत क्रिकेटपटूंसाठी "आयपीएल'च्या माध्यमातून अव्वाच्या सव्वा बोली लागत आहेत. त्यामुळे मुबलक पैसा मिळत असेल, तर क्रिकेटपटू कोणत्याही परिस्थितीत खेळण्याची तयारी ठेवतोच. अनेक प्रथितयश खेळाडू या लिलावात उभे होते. गेलसारख्या झटपट क्रिकेटमधील तुफानाला संघ मिळण्यासाठी अखेरपर्यंत थांबावे लागले. आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचलित नसूनही काही खेळाडू विविध देशांतील सुरू असलेल्या लीगमधून चमकले आणि त्यांना अनपेक्षित भाव मिळाला. "आयपीएल'चे हेच वैशिष्ट्य आहे. पण क्रिकेटची अशी भरभराट होत असताना पट्टीचा खेळ महत्त्वाचा; खेळपट्टीचा "खेळ' नव्हे, याचे भान मात्र सर्वांनीच राखायला हवे. 

Web Title: Marathi News editorial pune edition patticha khel