'इसिस'च्या पाडावानंतरचा इराक 

Article on ISIS and Iraq
Article on ISIS and Iraq

आकाराने इराकचे दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर असलेले मोसुल तब्बल तीन वर्षांनंतर 'इसिस'च्या ताब्यातून इराकी फौजांनी सोडविले. सुमारे नऊ महिने सुरू असलेल्या या लढाईला मागील आठवड्यात यश आले. 2014च्या जून महिन्यात 'इसिस'ने या शहराचा ताबा घेतला होता. तेव्हापासून या दहशतवादी गटाने तेथील सामान्य नागरिकांवर जुलमी राजवट राबवत त्यांना कैद्याची वागणूक दिली होती. या राजवटीला कंटाळून अनेकांनी घरदार सोडले, लाखोंचे जीव गेले. सर्वसामान्य नागरिकांच्या आडून इराकी फौजांचे हल्ले 'इसिस' परतवून लावत होती. याच नागरिकांच्या जिवाचा विचार केल्यामुळे 'इसिस'चा मोसुलमध्ये पराभव करायला इतका उशीर लागला.

लढाईच्या शेवटच्या टप्प्यात तर इसिसच्या महिला आत्मघातकी दहशतवाद्यांनीदेखील बॉंबस्फोट केले. मोसूल ताब्यात घेतल्यापासूनच 'इसिस'चा वारू चौफेर उधळला होता. तेच हातून गेल्यामुळे या दहशतवादी गटाचे कंबरडे मोडल्याचे मानले जात आहे. 

2014च्या जुलै महिन्यात मोसूलच्या अल-नूरी मशिदीतून आपल्या समर्थकांना संबोधित करताना अबू बकर अल-बगदादीने स्वतःला त्याच्या सर्व धर्मबांधवांचा 'खलिफा' म्हणून स्वयंघोषित केले होते. 'लिलत अल-क़द्र' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रमजान महिन्याच्या अत्यंत महत्त्वाच्या 27व्या दिवशीच 'इसिस'ने याच दिवशी ही मशीद उडवून लावली. यावरून इसिसच्या शुद्ध धार्मिकपणाची व्याख्या किती फोल आहे हे समजते. फक्त सर्वोच्च नेत्यांमुळेच नव्हे, तर सद्दाम हुसेनच्या 'बाथ' पक्षातील सहकाऱ्यांनी आणि त्यांच्या जिहादी विचारांनी 'इसिस' इतकी वर्षे जिवंत ठेवली.

अबू मोहम्मद अल अदनानी, अल-शिशानी, अल-मसरी या 'इसिस'च्या महत्त्वाच्या नेत्यांसोबतच 'बाथ' पक्षातील म्होरक्‍यांच्या खातम्यामुळे आता या गटाच्या दुसऱ्या फळीत पोकळी निर्माण झाली आहे. सामान्य दहशतवादी अशा वेळी दुसऱ्या जिहादी संघटनांचा आधार घेत त्यांच्या मांडवात दाखल होत असल्याचे इतकी वर्षे सिद्ध झाले आहे. यातील बरेच दहशतवादी निर्वासितांच्या लोंढ्यात युरोपच्या वाटेला लागल्याने हा धोका आणखी वाढला आहे. एके काळी बराच मोठा प्रदेश आपल्या ताब्यात असणाऱ्या इसिसच्या हातातील प्रदेश आता झपाट्याने आकुंचन पावत आहे. याचा त्यांच्या पुढील वाटचालीवर कितपत परिणाम होतो, यावर जागतिक शांततेचा बाज अवलंबून आहे. 
'इसिस'च्या विरोधातील सर्वात प्रभावी घटक म्हणून कुर्दिश गटाकडे पहिले जाते.

'इसिस'ला चेपण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडून या गटाने आपल्या स्वतंत्र कुर्दिस्तानच्या मागणीला अधिक धार चढवली आहे. त्यांच्या मागणीकडे सोईस्करपणे दुर्लक्ष करणे पश्‍चिम आशियाची अस्थिरता लक्षात घेता परवडण्यासारखे नाही. इस्लामच्या सुन्नी शाखेचे प्रतिनिधित्व करू पाहणाऱ्या 'इसिस'मुळे सामान्य सुन्नी नागरिकांचेच सर्वाधिक जीवित आणि आर्थिक नुकसान झाले आहे. स्थानिक फौजांना युद्धनीतीचे पाठबळ देत आणि हवाई हल्ल्यांची मदत करत जटिल प्रश्न सोडवले जाऊ शकतात, हे अमेरिकेच्या मोसूलबाबतच्या भूमिकेने दाखवून दिले आहे. असे करतानाच अमेरिकेचे कमी सैनिक या संघर्षात कामी आल्याचे स्पष्ट होते. त्यांच्या या बदललेल्या युद्धतंत्राचा उपयोग इसिसची स्वयंघोषित राजधानी असलेल्या सीरियातील रक्का शहरावरच्या आक्रमणातदेखील होऊ शकतो.

शहरी पट्ट्यातील संघर्षात, सामान्य नागरिकांच्या जिवाची काळजी घेत, अवलंबलेले हे युद्धतंत्र कमी नुकसानकारक ठरत आहे. मोसूल, फल्लुजाह, रमादी हे इसिसच्या ताब्यातून काढून घेत इराकी फौजांनी मोठी शर्थ गाजवली आहे. ही शहरे पुन्हा वसवायचे काम आणि राजकीय इच्छाशक्ती आता इराकी नेतृत्वाला दाखवावी लागेल. 2003च्या अमेरिकी आक्रमणापासून 2017 पर्यंत म्हणजेच सुमारे एका पिढीच्या खुंटलेल्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि औद्योगिक प्रगतीला नव्याने चालना देऊन पीडित नागरिकांचे पुनर्वसन करणे हैदर अल-अबादी यांच्या सरकारसाठी क्रमप्राप्त आहे. सामुदायिक भेदभाव न करता धरलेली प्रगतीची कासच अस्थिर आणि विभागलेल्या इराकला स्थिरतेकडे नेऊ शकते. 

इसिसवर मिळवलेल्या या विजयाचे गोडवे गात असताना, या एका शहरासाठी झालेल्या संघर्षात सामान्य जनतेची अक्षरशः होरपळ झाली. त्यांच्या कत्तली झाल्या. हवाई हल्ल्यात जमीनदोस्त झालेले मोसूल शहर आणि बेचिराख झालेल समाजमन उभारी घेईपर्यंत अस्वस्थेतेचे प्रतिध्वनी उमटवत राहतील. इराकचे माजी हुकूमशहा सद्दाम हुसेन यांचे दोन पुत्र उदय आणि कुसय यांना 2003 मध्ये मोसूलमध्येच ठार करण्यात आले होते. 2004 मध्ये अशाच अस्थिर इराकमध्ये विकोपाला गेलेल्या शिया-सुन्नी संघर्षात अबू मुसाब अल-जरकावीने 'इसिस'च्या प्राथमिक स्वरूपाला प्रारूप दिले होते.2006 मध्ये त्याचा काटा काढल्यानंतरदेखील त्याच्या विचारांची धग अबू बकर अल-बगदादीने पेटवत ठेवली.

जिहादची हाळी देणाऱ्या या विचारांचे समूळ उच्चाटन हाच तोडगा सर्वंकष शांततेला हातभार लावतो; अन्यथा हिंसक विचारांची बीजे खोलवर रुजलेली असताना त्यांना कालांतराने, कधी नव्या स्वरूपात, नवी पालवी फुटते असे इतिहास सांगतो. तशी शक्‍यता आत्तादेखील खोडून काढता येत नाही. शियाबहुल इराकमधील शिया सरकार, सुन्नीबहुल मोसूलची जनता आणि स्वतंत्र कुर्दिस्तानची मागणी लावून धरलेला कुर्दिश गट असे 'इसिस'नंतरच्या मोसूलचे वाटेकरी आहेत. त्यामुळेच, 'इसिस'चा मोसूलमध्ये पराभव करून झालेला आनंद हा अल्पजीवी ठरणार नाही वा असे दहशतवादी गट पुन्हा जोर धरू पाहतील, असे वातावरण तयार होणार नाही, याची काळजी या संबंधित घटकांना घ्यावी लागेल. 

मोसूलच काय, तर इराकची राजधानी बगदाददेखील सुरक्षित नसल्याचे वारंवार होणारे बॉंबस्फोट दाखवून देत आहेत. इसिसच्या कार्यपद्धतीला लावलेला चाप त्या गटाला विस्तृत आणि व्यापक हल्ले करण्यापासून परावृत्त करेल असे दिसते. मात्र, असंघटित अथवा कमी संख्याबळाने केलेले हल्ले हे 'इसिस'ने बदलून टाकलेल्या दहशतवादाच्या व्याख्येचे प्रमाण आहे. असे एकट्या-दुकट्याने करण्यात येणारे हल्ले ही 'इसिस'ची मनोवृत्ती राहिली आहे. मोसूलसारखे मोठे शहर ताब्यातून जाऊनदेखील ती त्यामुळेच डोके वर काढत राहील, अशी भीती आहे. 

(लेखक आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक आहेत) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com