चीनची पोटदुखी (अग्रलेख)

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 जुलै 2017

भारतावर कुरघोडी करण्याचा चीनचा प्रयत्न नेहमीच सुरू असतो; पण ताज्या संघर्षाचे स्वरूप अधिक गंभीर असल्याचे दिसते. भारताची अमेरिकेशी मैत्री आणि आंतरराष्ट्रीय राजकारणातील वाढते महत्त्व चीनला सलते. 

दोन बलदंड शेजाऱ्यांमध्ये असावी, तशी स्पर्धा भारत आणि चीन यांच्यात आहे आणि त्या स्पर्धेचा परिपाक म्हणून सीमावादाचे पडसाद अधूनमधून उमटत असतात. आंतरराष्ट्रीय राजकारण आणि अर्थकारणातले भारताचे वाढते महत्त्व चीनला सहन होत नाही. त्यामुळेच भारताला त्रास देण्यासाठी कुरघोड्या करीत राहण्याची सवयच आहे; परंतु ताज्या संघर्षाचे स्वरूप आणि व्याप्ती या नेहमीच्या कुरघोड्यांपेक्षा अधिक गंभीर आहे.

1962 नंतर प्रथमच भारताने या भागातील सीमेवर मोठ्या प्रमाणावर सैन्य जमा करणे ही बाब या संघर्षाचे गांभीर्य स्पष्ट करणारी तर 'आम्ही आमच्या सार्वभौमत्वासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो' ही चिन्यांची भाषा त्यांचा उद्दामपणा स्पष्ट करणारी आहे.

डोकलाम हा परिसर भारत, चीन आणि भूतान या तीन देशांच्या सीमावर्ती भागात आहे. तिथले दोन खंदक चिनी सैनिकांनी नष्ट केल्याची आणि डोकलामवर आपली मालकी दाखवणारा नकाशा चीनने जारी करून त्यांचे धोकादायक इरादेच उघड केले आहेत. डोकलाममधील हा तणाव आणि तेथील भारतीय सैन्य तैनातीचा संबंध चीनने नथुला पासशी जोडला आहे. कैलास मानसरोवर यात्रेसाठी भारतीय भाविकांना जाण्यासाठी नथुला पास खुला व्हायचा असेल, तर डोकलाममधील भारताचे सैन्य माघारी गेले पाहिजे, असा चीनचा आग्रह आहे. वरकरणी हे सारे नेहमीचे वाटते. पण, ते तसे नाही.

या वेळची पोटदुखी ही फक्त सीमावादाच्या संदर्भातली नाही. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात जमलेली गट्टी ही चीनची पोटदुखी आहे; चीनच्या 'ओबोर योजने'ला (वन बेल्ट वन रोड) भारताने केलेला विरोध हाही सल आहे आणि त्यामुळे कुठून तरी खुसपट काढायचे आणि आंतरराष्ट्रीय समुदायासमोर दोन मोठ्या राष्ट्रांमधला सीमावाद साऱ्यांचे लक्ष वेधून घेईल, अशा पद्धतीने आणायचा, असे हे पाताळयंत्र आहे....जेणेकरून भारत सीमावादात गुरफटेल आणि त्याचे विकासाच्या प्रक्रियेकडे दुर्लक्ष होईल. सिक्कीमला स्वतंत्र देश म्हणण्याचा चीनचा आगाऊपणा आणि सारा अरुणाचल प्रदेश आमचाच असल्याचा त्याचा कांगावा हे सारे भारताला उकसवण्याचे प्रकार त्यातूनच घडत आले. 

तिबेटमध्ये येत असलेली चुंबी दरी हा या संघर्षातील एक मुख्य घटक. या दरीच्या एका बाजूला चीन तर दुसऱ्या बाजूला भारत व भूतान आहेत. ही भूसंरचना प्रत्यक्ष संघर्षाच्या परिस्थितीत भारताला अनुकूल असल्याने तेथे ताबा मिळविण्याच्या इच्छेने चीन पछाडलेला आहे. सिक्कीम सीमेलगतच्या या भागात रस्तेबांधणीचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू करण्यामागचा हा हेतू लपून राहिलेला नाही. आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याच्या वाटेत येणाऱ्यांना कसलाच विधिनिषेध न बाळगता चीन धुडकावून लावतो. दक्षिण चीन समुद्रातही हे कसे घडते आहे, हे साऱ्या जगाने पाहिले आहे. त्यामुळेच भूतानच्या सार्वभौमत्वाविषयी काडीचीही आस्था न दाखविता रस्त्यांचे बांधकाम केले जाऊ लागले, हे त्या परंपरेशी सुसंगतच आहे.

अर्थातच भारताने याला आक्षेप घेतला आणि त्यातून ठिणगी पेटली. चीनने विविध शेजारी देशांबरोबरचे सीमावाद निकालात काढले आहेत. पण, भारताशी चीन शेजाऱ्यासारखा नव्हे तर शत्रूसारखा वागतो. 'हिंदी-चिनी भाई-भाई'चे नारे लागल्यावर भारत-चीन युद्ध घडले, हे विसरता येत नाही. त्यानंतरचे दिवस शेजारी असूनही मित्र नसल्याचे दाखवणारेच आहेत. याला भारताच्या क्षमतेचा आयाम आहे, तशी चीनची विस्तारवादी भूमिकाही कारणीभूत आहे. या विषयाला पाकिस्तान-नेपाळ या शेजारी राष्ट्रांच्या हाताळणीचाही पैलू आहे. त्यामुळे भारताने या वेळी पुरेशा सावधतेने पावले उचलण्याची गरज आहे. चीनशी थेट संघर्ष भारतालाही परवडणारा नाही. एकाच वेळी अनेकांशी संघर्ष घेणे मुत्सद्देगिरीत बसत नाही. त्यामुळे संयमानेच मार्ग काढण्याची आवश्‍यकता आहे. जम्मू-काश्‍मीर ते अरुणाचल प्रदेश अशी सुमारे साडेतीन हजार किलोमीटर सीमा चीन आणि भारत या दोन देशांमध्ये आहे. त्यापैकी 220 किलोमीटरचा भाग सिक्कीममध्ये येतो.

सीमावादाची सोडवणूक करण्यासाठी दोन्ही देशांनी काही व्यवस्थाही तयार केल्या होत्या. परंतु, परस्पर विश्‍वासाच्या अभावी या विषयावरची चर्चाच थांबल्यात जमा आहे. आधीच चीनच्या सीमेच्या संदर्भातील काही भूमिका वादग्रस्त आहेत. आमच्या भूभागावरील साम्राज्यशाहीचे प्रतीक असलेली मॅकमोहन लाइन अवैध आहे, इथपासून चीनच्या सीमावादावरील भूमिकेचा आरंभ होतो. त्यात नेमकी सीमारेषा कोणती याबद्दल बऱ्याच मोठ्या पल्ल्याच्या संदर्भात मतभेदही आहेत. जेथे स्पष्टता नसते, तेथे वाद उत्पन्न करणे सोपे असते. चीन जे वारंवार करीत असतो, ते याच कारणास्तव. भारताने चीनच्या पाताळयंत्री हालचालींचा अभ्यास करून ते आंतरराष्ट्रीय समुदायापुढे मांडण्याचा प्रयत्न करावा. हे सगळे सीमातंटे चर्चा-वाटाघाटींद्वारेच सुटायला हवेत आणि त्यातच या दोन्ही शेजाऱ्यांचे आणि आशियातील बहुतांश देशांचेही हित आहे. त्यामुळेच चिनी वर्चस्ववादी हालचालींना चाप कसा लावायचा हा मोठा प्रश्‍न उभा ठाकला आहे. भारतीय नेतृत्वाच्या मुत्सद्देगिरीची कसोटी पाहणारी ही परिस्थिती आहे.

Web Title: marathi news India China relations Sikkim Mansarovar Sakal Editorial