गैरहजर! (ढिंग टांग!)

गैरहजर! (ढिंग टांग!)

प्रति, कमळ पक्षाचे खासदार- 
विषय : सभागृहातील गैरहजेरीबाबत. 

महाशय, पक्षश्रेष्ठींच्या असे निदर्शनास आले आहे की आपल्या पक्षाचे काही खासदारे सभागृहात गैरहजर राहात असून त्यामुळे अनेक विधेयके मंजूर करून घेण्यात अडचणी येत आहेत व आपला पक्ष वारंवार अडचणीत येतो आहे. आपला पक्ष सत्ताधारी आहे, ह्याचे भान सर्वांनी ठेवावे. दांड्या मारण्याच्या वृत्तीने दुहेरी नुकसान होते. विरोधकांचे फावते, हे तर आहेच, पण आपल्याला भत्तेही कमी मिळतात. परिणामी, संसदेच्या क्‍यांटिनमध्ये निमूटपणे जेवावे लागते. 

आपल्या गैरहजेरीमुळे विरोधकांनी सुचवलेल्या दुरुस्त्या मंजूर होऊन जातात आणि आपली विधेयके परत जातात. ही सत्तापक्षासाठी नामुष्कीची गोष्ट आहे. सभागृहातील उपस्थिती हा ऐच्छिक प्रकार असून एकदा खासदार झाल्यावर माणसाला पुढे काहीही करण्याची आवश्‍यकता नसते, असा गैरसमज काही जणांचा झालेला दिसतो. गेल्या आठवड्यात असाच प्रकार घडला. त्या वेळी जे खासदार गैरहजर होते, त्यांनी येत्या अठ्ठेचाळीस तासात लेखी खुलासा करावा, असा आदेश जारी करण्यात येत आहे. कळावे. आपला. शहंशाह अमितभाई. अध्यक्ष, कमळ पार्टी. 

ता. क. : या प्रकारामुळे आपले तारणहार व थोर ब्रह्मांडनायक श्रीश्री नमोजी हे प्रचंड संतापलेले आहेत, ह्याची सर्वांनी कृपया नोंद घ्यावी. पुन्हा नोटाबंदी यायला हवी आहे का? 
* * * 
आदरणीय, शहंशाह-ए-आलम अमितभाई यांच्या चरणकमळी, 
विषय : गैरहजेरीबाबत खुलासा. 

सर्वप्रथम मी माझ्या गैरहजेरीबद्दल सपशेल माफी मागतो व पुन्हा असे होणार नाही, ह्याची खात्री देतो. गेल्या आठवड्यात मला सभागृहात येता आले नाही, ह्याचे एकमेव कारण म्हणजे माझ्या चपला चोरीस गेल्या हे आहे!! त्याचे झाले असे की, विमानाने मी यावयास निघालो असताना रस्त्यात मारुतीचे मंदिर लागले. मला साडेसाती चालू आहे. म्हणून मी गाडी थांबवून दर्शनासाठी आत गेलो. तेथून परत येत असताना लक्षात आले की माझ्या चपला चोरीस गेल्या आहेत. नवाकोरा कोल्हापुरी जोड होता. घाई होती, म्हणून तक्रार न करता सरळ विमानतळावर आलो. विमानात माझ्या पायात चपला नाहीत, हे पाहून हवाई कर्मचाऱ्यांनी मला अतिशय वाईट वागणूक दिली. साधे 'पाणी द्या' असे सांगितले तर त्या कर्मचाऱ्याने 'दाढी घरी करून या. इथे दाढी करायची नाही' असे विचित्र उत्तर दिले. थोड्या वेळाने मी त्यांना 'मला व्हेज खानाच द्या' असे मुद्दाम सांगितले. त्यावर त्यांनी 'का? घरी मिळत नाही का?'' असे उलट विचारले. विमानात इतक्‍या गैरसोयी होत्या की शेवटी मी त्यांना तक्रार पुस्तक मागितले. तर सगळे हवाई कर्मचारी हसले. एक जण म्हणाला : पायात चपला नाहीत, तक्रार पुस्तक कशाला मागता?'' जाऊ दे. चपला असत्या, एकेकाला सव्वीस मारल्या असत्या!! 
निमूटपणाने दिल्लीला उतरून अनवाणीच (मोटारीत बसून) महाराष्ट्र भवनात गेलो. महाराष्ट्र भवनातली कथा काय सांगू? नाहीच सांगत. थोडक्‍यात सांगायचे तर शेजारच्या खोलीत महाराष्ट्रातील एक मंत्री उतरले होते, त्यांच्या खोलीबाहेरील एक चप्पल जोड पायात सर्कवून सभागृहाकडे निघालो. पण हे एका कार्यकर्त्याने पाहिले!! 'चप्पलचोर, चप्पलचोर' असा आर्डाओर्डा झाला. सभागृहात पोचेपर्यंत चपला पुन्हा गेल्या होत्या, वर पांढराशुभ्र सदरा, घड्याळ, पाकीट हेसुद्धा गेले होते. 

अशा परिस्थितीत सभागृहात कसे येणार? शेवटी कनाट प्लेसच्या श्री हनुमानजी महाराज मंदिरात गेलो. दर्शन आणि चपला घेऊन बाहेर येणार, तोवर सभागृह संपले होते. 

माझ्या केसचा सहानुभूतीने विचार व्हावा व माफी मिळावी, ही विनंती. आपला. अबक. 

ता. क. : श्रीश्री नमोजी ह्यांना स्वतंत्र पत्र पाठवत नाही. ते 'मन की बात'मध्ये वाचून दाखवतात. नकोच ते!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com