हवापालट! (ढिंग टांग!)

ब्रिटिश नंदी
मंगळवार, 5 सप्टेंबर 2017

परमपूज्य प्रात:स्मरणीय श्रीश्री नमोजी ह्यांच्या चरणकमळी शि. सा. नमस्कार. जपानला सुखरूप पोचलो. काळजी नसावी; पण प्रवासभर ब्यागेज गहाळ झालेल्या विमान प्रवाशासारखे वाटत होते. जपानला गेल्यावर काय सांगायचे, हा प्रश्‍न होता. खरे तर संरक्षणविषयक द्विपक्षीय चर्चा करायला मी जपानला आलो आहे. पण ''वकीलसाहब, जो आप हो नहीं, वो किरदार क्‍यूं निभाने जा रहे हो?'' असे मला घरी कुटुंबानेही विचारले. काय बोलणार? मी काहीही न बोलता विमानतळ गाठला. टोक्‍योच्या विमानतळावर मला घ्यायला श्री हाकानकामारुसान आले होते. चांगले गृहस्थ आहेत. माझ्यासमोर एकंदर सदोतीस वेळा वाकले. मला वाकण्याचा प्रॉब्लेम आहे, हे आपण जाणताच.

परमपूज्य प्रात:स्मरणीय श्रीश्री नमोजी ह्यांच्या चरणकमळी शि. सा. नमस्कार. जपानला सुखरूप पोचलो. काळजी नसावी; पण प्रवासभर ब्यागेज गहाळ झालेल्या विमान प्रवाशासारखे वाटत होते. जपानला गेल्यावर काय सांगायचे, हा प्रश्‍न होता. खरे तर संरक्षणविषयक द्विपक्षीय चर्चा करायला मी जपानला आलो आहे. पण ''वकीलसाहब, जो आप हो नहीं, वो किरदार क्‍यूं निभाने जा रहे हो?'' असे मला घरी कुटुंबानेही विचारले. काय बोलणार? मी काहीही न बोलता विमानतळ गाठला. टोक्‍योच्या विमानतळावर मला घ्यायला श्री हाकानकामारुसान आले होते. चांगले गृहस्थ आहेत. माझ्यासमोर एकंदर सदोतीस वेळा वाकले. मला वाकण्याचा प्रॉब्लेम आहे, हे आपण जाणताच. मी त्यांना माझी ओळख करून दिली. म्हटले, ''मी अरुण जेटली... वकील आहे. भारताचा अर्थमंत्रीही आहे.'' तर त्यांनी किंचित डोळे उघडून विचारले, ''...पण तुमचे संरक्षणमंत्री कुठे आहेत?'' 

''ते भारतातच आहेत!'' मी म्हटले. 

''उद्या तोफा विकत घ्यायला तुम्ही कुटुंब कल्याणमंत्र्याला पाठवणार का?,'' त्यांनी डोळे आणखी उघडून विचारले. मी गप्प बसलो. थोड्या वेळाने त्यांना ''सध्या तुम्ही मलाच संरक्षणमंत्री समजा'' अशी गळ घातली. ते कमरेत वाकले. बाय द वे, जपानी लोक डोळे वटारतानाही किंचितच उघडतात, हे माझे नवे ऑब्जर्वेशन आहे. असो. 

इथे द्विपक्षीय चर्चा करण्यासारखे काहीही (उरलेले) नाही. खरे तर मी इथे कां आलो आहे, हेच कळेनासे झाले आहे. राजकारणात सक्रिय होण्यापूर्वी मी वकिली करीत असे. तेव्हा एकदा असाच प्रश्‍न पडला होता. काळा कोट चढवून मारे मी कोर्टात गेलो. जबरदस्त युक्‍तिवाद करत अशिलाला केस जिंकून दिली. पण न ही आपली केसच नव्हती हे मागाहून लक्षात आले!! तसेच ह्यावेळी झालेले दिसते. बहुधा एकमेकांना विनोद-बिनोद सांगून, पत्तेबित्ते खेळून दोन दिवस टाइमपास करून घरी परतेन!! (तोवर निर्मलाजी संरक्षण खात्याची सूत्रे घेण्यास रेडी असतील, अशी अपेक्षा.) तूर्त ही हवापालट ट्रिप आहे, असे समजतो. कळावे. आपला. अरुण जेटली (वकीलसाहेब.) 
* * * 
प्रिय सहकारी वकीलसाहेब, शतप्रतिशत प्रणाम. मी चायनाला लगेचच पोचलो. माझे स्वागत नेहमीप्रमाणे चांगलेच झाले. चीनमध्येही माझ्यासमोर लोक चिक्‍कार वेळा वाकत होते. मी मिठी मारायला गेलो की माणूस वाकलेला आढळायचा. फार पंचाईत झाली!! बहुधा माझ्या आंतरराष्ट्रीय मिठीमार कार्यक्रमाचा ह्या लोकांनी धसका घेतलेला दिसतो. आपले धोरण हाणून पाडण्यासाठी हे लोक असे वाक वाक वाकतात, असा माझा कयास आहे. पण मी कच्चा गुरू नाही. माणूस वाकून उभा झाला की मी झडप घालू लागलो आहे. तुम्हीही तसेच करावे. असो. 

कालच्या शपथविधी कार्यक्रमानंतर मी चीनला निघालो, आणि तुम्ही जपानला गेलात. गडकरीजी आणि राजनाथजी जाम खुशीत होते, हे माझ्या नजरेतून सुटलेले नाही. ह्यावेळी लौकरात लौकर मायदेशी परतले पाहिजे!! निर्मलाबेन ह्यांना संरक्षणमंत्री केल्याचा मला अभिमान वाटतो. नाहीतरी ह्या खात्याला फुलटाइम मंत्री नव्हताच. आधी आपले गोव्याचे मनोहरबाब पर्रीकर फुलटाइम होते, पण ते पार्टटाइमच काम करत असत. त्यांचा अर्धा वेळ गोव्यात जात असे. तुमच्यावरही फार लोड आला होता. अर्थ खाते आणि संरक्षण खाते, दोहोंनाही पार्टटाइम मंत्री होता, असे म्हणायचे!! देशाची तिजोरी सांभाळण्याचे खाते तुमच्याकडे आहे. अर्थात तिजोरीत आहे काय डोंबले? संरक्षण खातेही तुमच्याकडून गेल्यानंतर आता तुम्हाला आराम मिळेल. तोवर जपानला हवापालट करून येणे. मी वेगळे काय करतो? बाकी भेटीअंती बोलूच.

आपडोच. नमोजी. 

ता. क. : संरक्षण खात्यावर हल्ली कोणीही बोलले तरी चालते! टीव्ही बघता ना? आपण टीव्ही प्यानेलवर आहोत, असे समजून बिनधास्त द्विपक्षीय चर्चा करा. नो प्रॉब्लेम. नमोजी.

Web Title: marathi news marathi website Dhing Tang