ब्रॅण्डबाजा! (ढिंग टांग!)

ब्रॅण्डबाजा! (ढिंग टांग!)

माझ्या सर्वपक्षीय मित्र पुढाऱ्यांनो, शतप्रतिशत प्रणाम आणि गणपती बाप्पा मोरया! आपल्या सर्वांचे लाडके दैवत जे की श्रीगणेश गावाला गेल्याने कोणालाच चैन पडेनासे झाले आहे. पण तरीही आता नव्या जोमाने कामाला लागणे भाग आहे. तरी आपापल्या विभागातील डीजे, लेझीम आणि ढोलपथकांना तूर्त रजा देऊन प्रत्येकाने मुंबईत परतावे ही अपेक्षा आहे. (मुंबईकर नेत्यांनीही सुटी संपवून मुंबईत परतावे, ही विनंती)

पत्र लिहिण्यास कारण की गणेश चतुर्थीनंतर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अनुक्रमे दीड, पाच, सात, दहा, अकरा व एकवीस अशा दिवसांचे गणपती बसवले जातात, हे आपणां सर्वांस माहीत असेलच. या दिवसांत महाराष्ट्राच्या संस्कृतीला अपूर्व रंग येत असतो. सार्वजनिक गणेशोत्सवाचे मांडव फुललेले असतात, तसेच विसर्जनालाही उदंड गर्दी होते. देशोदेशीचे पर्यटक हा सोहळा पाहावयास मुंबई व महाराष्ट्रात (म्हंजे पुणे!) येत असल्याने सदर सोहळ्याचे जागतिक स्तरावर ब्रॅण्डिंग करावे, अशी महत्त्वाकांक्षी योजना विचाराधीन आहे. या ब्रॅंडिंग योजनेचे सूतोवाच मी गिरगाव चौपाटीवर विसर्जनाच्या वेळी केल्याचे तुम्ही टीव्हीवर पाहिले असेलच. तथापि, ही नवी कुठली योजना आहे? अशी विचारणा करणारे फोन सारखे येत आहेत. शेवटी स्पष्टीकरण देण्यासाठी हा पत्रप्रपंच. 

सर्वप्रथम ब्रॅंडिंग म्हणजे काय? हे समजून घेणे आवश्‍यक आहे. कारण काही लोकांनी स्टॉल कुठे लावायचा? अशी चौकशी केली होती. ब्रॅंडिंग म्हणजे दुसरे तिसरे काहीही नसून जाहिरात होय. एखादे उत्पादन बाजारात स्थिर करताना ते किती चांगले आणि उपयुक्‍त आहे, हे विविध मार्गांनी जनतेला समजावून सांगावे लागते. एकदा ते ग्राहकास पटले की त्यास म्हणावयाचे ब्रॅंडिंग! आहे काय नि नाही काय! त्याच धर्तीवर श्रीगणेशाचा राज्यव्यापी सोहळा जागतिक स्तरावर ब्रॅंडिंगसाठी नेण्याची आमची योजना आहे. स्पेनमधील टोमाटो एकमेकांना फेकून मारण्याच्या उत्सवाचे यथास्थित ब्रॅंडिंग झाले. तसे टोमाटो फेकून मारण्याचा फेस्टिव्हल आपल्याकडेही अधूनमधून होतो, पण त्यास कारुण्याची किनार आहे. तसा जर्मनीत एका गावात बिअर फेस्टिव्हल होतो. त्याचेही सॉलिडच ब्रॅंडिंग झाले आहे. परंतु, आपल्याकडे हायवेच्या पाश्‍शे मीटरच्या आत असले फेस्टिव्हल घेणे बेकायदा आहे. त्यामुळे ही योजनाही फसफसली. 

थोडक्‍यात, जगभर असे खूप फेस्टिव्हल होत असतात. मग महाराष्ट्राने का मागे राहावे? हा प्रश्‍न गेली तीन वर्षे आम्हाला छळत होता. त्यासाठी आम्ही (सवयीनुसार) खूप अभ्यास करून गणेश फेस्टिव्हलचेच ब्रॅंडिंग करावयाचे ठरवले आहे. महाराष्ट्राची फेवरिट डिश म्हणून यापूर्वी मिसळपाव या पदार्थाची नियुक्‍ती झाली होती. पण ती बदलून आता उकडीचे मोदक अशी असेल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी!! उकडीचे मोदक याचा गोडसा शॉर्टफॉर्म करून त्यास 'उमो' असे नाव देऊन (जसे की मोमो!) जागतिक स्तरावर नेण्याचा घाट घालण्यात आला आहे. 

'नमो श्रीगणेश फेस्टिव्हल योजना...सबके श्री, सबको फ्री' या ट्यागलाइननिशी ही योजना कार्यान्वित होईल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी. विसर्जनाच्या ठिकाणी गिरगाव चौपाटीवर मला काही परदेशी पर्यटक भेटले. मी त्यांना गणेश फेस्टिव्हलच्या ब्रॅंडिंगची कल्पना दिली. ते खुश झाल्यासारखे दिसले. (परंतु ते ब्रॅण्डिंगबद्दल विचारीत नसून 'या भयंकर गर्दीतून स्वत:चे विसर्जन होऊ न देता बाहेर कसे पडायचे?' असे ते विचारीत होते, हे मला मागाहून कळले. पण ते असो.) आपल्या सूचनांचेही स्वागत आहे. कळावे. आपला. नाना फडणवीस. 

ता. क. : पोळा हा सण जागतिक स्तरावरील ब्रॅंडिंगसाठी उत्तम असल्याचे मत काही जणांनी नोंदवून मान डोलावली आहे. काही जणांनी नागपंचमी का नाही करत इंटरनॅशनल? असे फुत्कार सोडले आहेत. काही मावळ्यांनी दसराच बरा, असे कळवले आहे. तथापि, आता गणेश फेस्टिव्हल फायनल झाला असल्याने या विषयावर पडदा पडला आहे, याचीही नोंद घ्यावी. कळावे. नाना.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com