कावळ्यांची सुट्टी! (ढिंग टांग!)

कावळ्यांची सुट्टी! (ढिंग टांग!)

आजची तिथी : हेमलंबीनाम संवत्सरे श्रीशके 1939 भाद्रपद सर्वपित्री अमावास्या. 
आजचा वार : मधलावार. 
आजचा सुविचार : कावळ्यांची शाळा भरे पिंपळावरती, चीमण्यांची पोरे भारी गोंगाटा करती... 

नमो नम: नमो नम: नमो नम: (108 वेळा लिहिणे) माणसाने काहीही व्हावे, पण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ नये. तूर्त भयंकर टेन्शनचे दिवस आहेत. रात्री डोळ्याला डोळा लागत नाही. दिवसा झोप येत्ये, पण घरी कुणी झोपू देईल तर शपथ. शेवटी निरुपायाने मंत्रालयात जाऊन बसावे लागते. तिथे 'साहेब अभ्यास करत आहेत, असं सांगा' अशी तंबी कर्मचाऱ्यास दिली की काम भागते. पण ते जाऊ दे. 

आजचा संपूर्ण दिवस घराबाहेर पडलो नाही. त्याला कारण कावळे! आमच्या बंगल्याबाहेर बरीच झाडे असून त्यावर दाटीवाटीने कावळ्यांची शाळा भरलेली असते. आता मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याच्या आवारात कावळे हे असणारच. पण यंदाचे कावळे जरा ज्यास्त आगाऊ झाले आहेत. बाहेर पडल्या पडल्या टोचा मारायला झेपावतात. फायली डोक्‍यावर धरून चालू लागलो तर फायलींवर टोचा मारतात. अरे, हे काय चालले आहे? 

दुपारी जेवण झाल्यावर 'सह्याद्री'वर जाऊन येतो, असे सांगितले, आणि निघालो. 'सह्याद्री' अगदीच जवळ आहे. छत्री घेऊन गपचूप गेलो. गेल्या गेल्या पायऱ्यांशीच छत्री मिटली, तर समोर मानेवर रुमालाने पुसत आमचे विनोदवीर तावडेजी उभे. मी म्हटले, ''का हो, आज इकडे कसे?'' तर त्यांनी लाथेने फुटबॉल उडवायची ऍक्‍शन केली, म्हणाले, '' मारो गोली! आज सुट्टी आहे...'' 

''कसली सुट्टी?'' मी वैतागलो. सर्वपित्री अमावास्येलाही ह्यांना आता सुट्टी हवी. कठीण आहे महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्राचे!! छत्री झटकत त्यांना म्हणालो, ''सर्वपित्रीला सुट्ट्या घ्यायला लागलात तर कसे चालेल विनोदवीर?'' 

'' आम्ही काम्पेन्सेट करू!,'' त्यांनी पुन्हा फुटबॉलची किक मारली. इतके होऊनही ह्या गृहस्थाचा येळकोट काही जात नाही. मागल्या खेपेला गडकिल्ल्यांच्या डागडुजी मोहिमेच्या वेळी हे कायम घोड्यावरून दौड केल्यासारखे हिंडत होते. बोलताना कायम तोंडाने 'टॉक, टॉक, टॉक, टॉक' असा घोड्याच्या टापांचा आवाज काढायचे. नंतर महाबळेश्‍वरला पुस्तक प्रदर्शनाच्या वेळीही हातात ग्रंथ घेऊन फिरायचे. आता फुटबॉलचा ज्वर अजून उतरलेला नाही. 

''कसलं डोंबलाचं कांपेन्सेट करताय?'' मी भडकलोच होतो. मुख्यमंत्र्याने आता काय काय म्हणून बघायचे? 

'' दिवाळीची सुट्टी एक दिवस कमी करू! डोण्ट वरी...,'' तोडग्यादाखल त्यांनी आणखी एक लाथ हवेत हाणली. मी जरा सुरक्षित अंतरावर जाऊन उभे राहिलो. फुटबॉलचा बॉल अदृश्‍य असला तरी आमच्या विनोदवीरांचे पाय दृश्‍य होते...असो. 

'' अशानं एकाच यत्तेत राहतील तुमच्या शाळेतली पोरं!,'' छत्रीचा बंद लावत मी म्हणालो. 

'' अहो, पाऊस किती पडतोय! शाळा बंद ठेवणं भाग आहे...जाणार कशी आमची मुलं? गेली तरी येणार कशी? त्यापेक्षा म्हटलं, घरीच अभ्यास करा! आहे काय नि नाही काय...'' विनोदवीरांनी पेनल्टी कॉर्नर मिळवल्यासारखे सांगितले. कधी कधी वाटते, असे गुर्जी आम्हाला मिळायला हवे होते. किती कनवाळू. किती सोशीक. किती मायाळू? 

'' नाही म्हणता म्हणता बऱ्याच सुट्ट्या झाल्या आता तुमच्या विनोदवीर! सर्वपित्रीला सुट्टी दिली, तर लोक काय म्हणतील? अंधश्रद्धाविरोधी कायदा केलाय आपण...'' मी सांगू लागलो. नाही म्हटले तरी आमचा महाराष्ट्र पुरोगामी आहे ना! त्यांना म्हणालो, ''आता हे फुटबॉल, सुट्ट्या वगैरे कमी करा! अभ्यासाला लागा!!'' 

'' चालायचंच हो नानासाहेब! तुम्ही तरी कुठे गेलात मंत्रालयात? पावसापाण्यात मुख्यमंत्री घरी राहातो, आमच्या मुलांनी काय घोडं मारलंय?,'' विनोदवीरांनी गोल केला!! 

...छत्री उघडून मी परत बंगल्यावर परतलो. भिंतीवरती एक कावळा ओरडत होता, ''क्रॉव, क्रॉव...आले का नारायणक्रॉव?' 

अरे, किती टोचा माराल? किती टोचा माराल?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com