आज काय नाटाक व्हावचा नाय...! (ढिंग टांग)

Dhing Tang
Dhing Tang

''बामबिम हाडलंय रे?,'' दुखणारे कपाळ चोळत दादांनी मान वर करून विचारले आणि रावसाहेबांच्या दिल्लीतल्या बंगल्यात घबराट उडाली. दानवेजींनी सोफ्यावर बसल्या बसल्या पाय वर घेतले. चंदूदादा कोल्हापूरकरांनी घाईघाईने चष्मा परत लावला आणि फडणवीसनानांनी सटपटून इकडे तिकडे बघितले. 

''बॉम्ब? छे, छे! असं काही करू नका दादा! आता अवघा काही तासांचाच प्रश्‍न आहे. इतके थांबलात, आणखी थोडी कळ काढा! सगळं ठरलेलं तर आहे. हा एवढा फॉर्म भरून ठेवा बरं...,'' फडणवीसनानांनी मखलाशी सुरू केली. कोणीही चिडून आले की हा गृहस्थ त्याच्या हातात कुठलातरी फॉर्म ठेवतो. बसा भरत!! माणूस भयंकर प्रसंगावधानी. पण दादांनी कोणाचे काहीही ऐकले नाही. शांतपणे शेजारच्या ब्यागेतली बामची बाटली काढून दोन बोटे कपाळावर लावली. 'रामा रे' असे म्हणत ते शांतपणे वाट पाहात पडून राहिले. असा बराच वेळ गेला... 

''मेल्यानूं, आजून किती टाइम?,'' कंटाळलेल्या दादांनी कपाळ चोळत चोविसांदा विचारले, तेव्हा समोर बसलेल्या दानवेजींनी कानात चौथी काडी घातली. उजवीकडे बसलेल्या चंदूदादा कोल्हापूरकरांनी नवव्यांदा चष्मा काढून पुसायला घेतला आणि डावीकडल्या फडणवीसनानांनी न वाजणारा मोबाईल फोन सोळाव्यांदा उगीचच कानाला लावला. 

''मेल्यानूं, वाट बगून बगून बुडाक वारुळ लागलाहा!! छ्या...जीव वीटलाहा!!,'' दादांचा आवाज किंचित चढा लागला. ते बघून चंदूदादांनी जवळची कपबशी लागलीच लांब नेऊन ठेवली. दानवेजींनी सोफ्याची उशी ढालीसारखी पोटाशी धरून संरक्षणाची तयारी सुरू केली. फडणवीसनाना तर मोबाईलमध्ये बोलण्याच्या आविर्भावात थेट सुरक्षित अंतरावर जाऊनच उभे राहिले. 

मघापासून दादा जमेल तितका नम्रपणा आणि पेशन्स दाखवत वेळ काढत होते. 'आदी रंगीत तालीम करूची आसा, मगे अमितभाईच्या घराकडे जावन मेन शो करूचा' असे आश्‍वासन त्यांना देण्यात आल्याने 8, अशोका रोडवर दानवेजींच्या बंगल्यार सगळे जमलेले. पण आता अगदी अंत झाला... 

''माका तुमी आदी थंयसर घेवन चला. फुडचा मी बगतंय! समाजलां?'' दादा ताडकन उठून उभे राहिले. त्यांचा जीव खरेच कंटाळून गेला होता. ते म्हणाले, ''आदी त्येका फोन तर लावा!'' 

फडणवीसनानांनी फोन लावला. ''ओके, ओके, नो प्रॉब्लेम....काहीही घाई नाही, साहेब!'' असे म्हणून ठेवला. दादांना म्हणाले, ''आत्ताच ते झोपेतून उठलेत. चहा घेऊन आपल्याला बोलावतील. डोण्ट वरी!'' 

दादा थोडे निवांत झाले. चहा म्हंजे फारतर दहा मिनिटे! मग आपले अच्छे दिन आलेच!! 

''मी थंय जातंय. मान आणि कंबर मोडासर आकडी आल्यागत नमस्कार करतंय. त्येक म्हणतंय, दादानूं, माका वांगडाक घे. तुका दरसाल कोकणचो मेवो धाडतंय! बरोबर ना?,'' दादांनी आपला रोल पुन्हा विचारून घेतला. फडणवीसनानांनी आंगठा-तर्जनी जुळवून गोल करत 'टॉप' अशी खूण केली. दादा निर्धास्त झाले. 

आणखी काही वेळ गेला. चहाची वेळ टळून जेवणाची आली, पण बोलावणे काही आले नाही. दादांचा पेशन्स सुटत चालला आहे, असे पाहून चंदूदादांनी फडणवीसनानांना पुन्हा खूण केली. फडणवीसनानांनी पुन्हा फोन लावण्याचे नाटक केले. 

''हलो हलो...प्रणाम!'' फोनमध्ये बोलता बोलता फडणवीसनानांनी 'मान आणि कंबर मोडासर आकडी आल्यागत' नमस्कार केला. ''पार्सल आणू का?'' असे खासगी आवाजात विचारले. थोड्या वेळाने ''बरं बरं, नो प्रॉब्लेम...काही घाई नाही'' असे म्हणत फोन ठेवला. मग म्हणाले, ''ते आता गाण्याच्या कार्यक्रमाला चालले आहेत. कार्यक्रम आटोपला की लागलीच बोलावणार आहेत, म्हणे!'' 

हे ऐकून दादांच्या मस्तकाची तिडीक गेली. ऐन दुपारी असोला नारळ फुटावा, तसा फाडकन आवाज झाला. ते गरजले- ''आवशीक खाव! ह्यो फार्म हातात देवन माका बाकड्यार बसूक सांगल्यान! तेका किती टायम झाला? बसून बसून बुडार...'' दादांच्या तोंडातून संतापाने शब्द फुटेना. पण 'कंट्रोल कंट्रोल' असे स्वत:शी म्हणत त्यांनी सगळे शब्द गिळले आणि हताश होऊन पुन्हा बसकण मारत म्हणाले, ''आज काय नाटाक व्हावचा नाय!!''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com