दौरा! (ढिंग टांग!)

ब्रिटिश नंदी
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

आजची तिथी : हेमलंबी नाम संवत्सरे श्रीशके 1939, आश्‍विन शुद्ध सप्तमी. 
आजचा वार : सोलवार! 
आजचा सुविचार : हा माझा (समृद्धी) मार्ग एकला! 
................. 

आजची तिथी : हेमलंबी नाम संवत्सरे श्रीशके 1939, आश्‍विन शुद्ध सप्तमी. 
आजचा वार : सोलवार! 
आजचा सुविचार : हा माझा (समृद्धी) मार्ग एकला! 
................. 
नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (108 वेळा जप लिहावा. उरलेला रात्री लिहीन...) दिल्लीत राणेदादांना अमितभाई शहांच्या घरी नेऊन सोडले आणि गपचूप सटकून थेट दक्षिण कोरियाच्या विमानात बसलो. म्हटले आता घाला गोंधळ काय घालायचा तो!! आमच्या मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गासाठी परदेशी गुंतवणूक आणायला मी कोरियात आलो आहे. आल्या आल्या राजधानी सोलमध्येच एक म्याडम भेटायला आल्या. त्यांनी 'आनन्योंग हा से योऽऽऽ?' असे विचारले. सर्वसाधारण माणसाला पडसे झाल्यावर बोलता बोलता शिंक अडकल्यावर जसे विविध आवाज उमटतात, तशी ही कोरियन भाषा आहे. मी गोंधळलो. त्या 'हौवार्यु?' असे विचारताहेत हे बऱ्याच वेळाने कळले. मी मराठीतच 'छान छान' वगैरे म्हणालो. मग त्या बाई स्वत:च म्हणाल्या, ''मी किम ह्यूनमी...इथली नितीन गडकरी!!'' म्हंजे? मी च्याटंच्याट पडलो. 

''आय मीन मी इथली जमीन, वाहतूक, रस्ते वगैरे मंत्री आहे!'' त्यांनी खुलासा केला. 
कोरियन भाषेत ह्यून म्हणजे 'गड' आणि 'मी' म्हंजे 'करी' असणार!! काय असेल ते असो, पण ह्या कोरियन गडकरीबाई आपल्या गडकरीसाहेबांसारख्याच धडाकेबाज वाटल्या. कारण समृद्धी महामार्ग ही एक टेरिफिक आयडिया आहे. ह्यामुळे तुमचा विकास वेगात होईल, असे त्या नि:संदिग्धपणे म्हणाल्या. आमच्या विरोधकांसारखे गुळमुळीत काहीही नाही!! मी त्यांना समृद्धी महामार्गाची संकल्पना समजावून सांगताना म्हणालो, ''पहिल्या फेजला आम्ही मुंबई ते नागपूर हा 706 किलोमीटरचा रस्ता बांधून काढणार आहोत.'' 

''मग दुसऱ्या फेजमध्ये?'' कोरियन गडकरीबाईंनी कुुतूहलाने विचारले. 

'' अर्थात नागपूर ते मुंबई हा रस्ता बांधणार!'' मी. 

''ओह, मग बाकीची टाऊनशिप डेवलपमेंट वगैरे?'' त्यांनी बुचकळ्यात पडून विचारले. 

''ती तिसऱ्या फेजमध्ये!'' पुन्हा मी. 

''आत्ता काय पोझिशन आहे? आम्ही ऐकलं की तिथे कोणीतरी उधोजी म्हणून पुढारी आहेत ते विरोध करतायत म्हणून?'' त्यांनी काळजीने विचारले. 

''छे छे, ते तर आमचे मित्र आहेत!'' मी खुलासा केल्याबरोब्बर त्या गडकरीजींसारख्याच अर्थपूर्ण हासल्या. एकंदरित आमचा समृद्धी मार्ग होणार, अशी चिन्हे आहेत. कोरियन उद्योजकांनी त्या प्रकल्पात पैसे गुंतवायला होकार दिला आहे. म्हंजे असावा! कारण काहीही म्हटले की कोरियन लोक 'होय' अशीच मान डोलावतात. जाऊ दे. 

आणखी एका गृहस्थांची भेट झाली. त्यांनी माझा मोबाइल फोन बघायला मागितला. फोन बघून ते हसले. म्हणाले, ''तुम्ही तर आमच्याच परिवारातले...'' त्यांचे नाव श्रीयुत सॅमसंग होते, असे मागाहून कळले. फोन फारवेळा हॅंग होतो अशी तक्रार मी त्यांना केली. आश्‍चर्य म्हणजे त्यांनी 'एकदा स्वीच ऑफ करून पुन्हा स्वीच ऑन करा' असाच पोलिटिकल सल्ला दिला. मुंबईत मला नेहमी असाच सल्ला मिळतो!! असो. 

इथून परत मायदेशी जायचे जिवावर आले आहे. कारण मुंबईत गेल्यावर पुन्हा राणेदादांचे काय करायचे, हा प्रकल्प हाती घ्यावा लागणारच!! मुंबईपेक्षा सध्या कोरियाच सेफ आहे. शेजारच्या उत्तर कोरियात किम जोंग नावाचा युद्धखोर हुकूमशहा राहातो, हे पेपरात वाचले होते. त्याने जपानच्या डोक्‍यावरून जबरी क्षेपणास्त्र फेकल्याचे कळले होते. पॅसिफिक महासागरात हैड्रोजन बॉम्ब टाकण्याची धमकीही दिली होती म्हणे. पण मला भीती नाही. राणेदादांच्या बॉम्बपेक्षा किम जोंग पर्वडला!! 
...बऱ्याच वेळाने फोन बघितला तर ''परत कधी येणार?'' असे दोन मेसेज इनबॉक्‍समध्ये!! एक राणेदादांचा. त्यांना 29 तारखेचा वायदा देऊन टाकला. दुसरा मेसेज आमचे मित्र उधोजीसाहेबांचा आहे. त्यांना काय कळवावे, ह्याचा विचार करतो आहे. चालायचेच.

Web Title: marathi news marathi website Dhing Tang