शिलंगणाचे सोने! (ढिंग टांग!)

ब्रिटिश नंदी
शनिवार, 30 सप्टेंबर 2017

सकाळ झाली. दसरा उजाडला. मोरुचा बाप मोरुला म्हणाला, ''मोऱ्या, लेका ** वर करून पडलायेस काय? ऊठ. आज दसरा. दात घास. आंघोळ कर. चहा ढोस. नवी कापडे घालून बाहेर जा. शेजाऱ्यापाजाऱ्यांस, आल्या-गेल्यास आपट्याचे पाने सोने म्हणून वाट. आपण आपली परंपरा सांभाळावी! तो शेजारचा विक्‍की बघ!!'' 

सकाळ झाली. दसरा उजाडला. मोरुचा बाप मोरुला म्हणाला, ''मोऱ्या, लेका ** वर करून पडलायेस काय? ऊठ. आज दसरा. दात घास. आंघोळ कर. चहा ढोस. नवी कापडे घालून बाहेर जा. शेजाऱ्यापाजाऱ्यांस, आल्या-गेल्यास आपट्याचे पाने सोने म्हणून वाट. आपण आपली परंपरा सांभाळावी! तो शेजारचा विक्‍की बघ!!'' 

उत्तरादाखल मोरुने पंख्याच्या दिशेने असलेले सर्व अवयव गादीच्या दिशेने केले व तोंडातून 'न्यम न्यम न्यम' असा आवाज काढला. चादरीत आपादमस्तक देह कोंबून पसरलेल्या मोरुच्या विशिष्ट भागावर सणसणीत चापट ठेवून द्यावी, म्हणून मोरुच्या बापाचे हात शिवशिवले. परंतु, सदरील अवयव नेमका कोठे आहे, ह्याची आयडिया त्यास येईना. सबब त्याने आपला बेत रद्द केला. तरीही चिवटपणे तो म्हणाला,'' मोरोबा, दसरा सण मोठा, नाही आनंदा तोटा! आज शिलंगणाचा दिवस. पूर्वीचे काळी तालेवार माणसे वाजत गाजत शिकारीला जात असत. गावची वेस वलांडून रानात जनावर टिपत असत. सायंकाळी वाजत गाजत शिकार गावात आणत असत...आणि तुझे रे हे काय? तो विक्‍की बघ!!'' 

मोऱ्याच्या बापांस हळहळ वाटली. पोरगे हाताबुडी येईल, सौंसारास हातभार लावील, एकदाचे अच्छे दिन पाहावयास मिळतील, असा त्याचा अडाखा होता. परंतु, हाताबुडी आलेले पोर सांप्रत हातरुणात लोळत होते. उत्तरादाखल मोरुने वाघाप्रमाणे घोरणे सुरू केले. विक्‍की मात्र गुणी बाळाप्रमाणे बाहेर पडला होता. 

''ते काही नाही. आज इष्टमित्रांसमवेत तूदेखील शिलंगणास जा पाहू?'' बापाने डिमांडिले. 

''तीन दिवस ब्यांका बंद आहेत, बापहो! शिलंगण शक्‍य नाही!!'' मोऱ्याने पांघरुणातूनच प्रस्ताव धुडकावला. 

''तुझा तो विक्‍की बघ...केव्हाचा बाहेर पडलाय! जा त्याच्याबरोबर!!'' बापाने आग्रहो सोडिला नाही. 

''ह्यावेळी हातरुणातून निखळलेला तो विक्‍की नक्‍कीच नाही! विक्‍की दररोज दुपारी बारानंतर उठतो. जेवून परत झोपी जातो...,'' मोऱ्याने आपल्या इष्टमित्राची संगतवार माहिती दिली. मोरुच्या बापास ह्यावर काय बोलावे, हे सुचेना. खिडकीबाहेर न्याहाळत त्याने रनिंग कामेंटरी सुरू केली. ''तो पहा, विक्‍की नवी कापडे घालून दुकानादुकानात हिंडत आहे. समोरच्या दामोदरदास हलवायाच्या दुकानातून त्याने मखलाशी करून उधारीवर अर्धा शेर श्रीखंडदेखील घेतले...बघ, बघ! माणसाने कसे विक्‍कीसारखे स्मार्ट असावे. आपट्याची पाने देऊन लेकाच्याने उधारी मिळवलीन!!'' 

मोरुच्या बापास ते दृश्‍य पाहून जलन झाली. बोलणाराची माती खपत्ये, झोपणाराचे सोने पडून राहात्ये, हेच खरे!! आपला मूल खरोखर निकम्मा असून अशाने अच्छे दिन येणेच अशक्‍य, हे मोरुच्या बापास कळून चुकले. त्याने विक्‍की ह्यास हाक मारून घरी बोलाविले. 

...हसतमुख विक्‍की दारातच उभा राहिला. त्याने वाकून नमस्कार केला. म्हणाला, ''हाय देअर अंकल, मोरुभाई क्‍या छे? हॅप्पी दसरा!! आ लै लो गॉल्ड!'' खिशातील अर्धवाळकी आपट्याची पाने काढून विक्‍की म्हणाला. मोरुचा बाप स्तंभित होऊन पाहात राहिला. तेवढ्यात ताडकन उठून बसलेल्या मोरुने विक्‍कीला विचारले, '' मित्रा, सोने वाटतो आहेस, पण आधी तुझे आधार कार्ड दाखव बरे?'' 

गोरामोरा होऊन विक्‍की चोरासारखा परत गेला. 

पुन्हा पांघरुण डोक्‍यावर घेत मोरु म्हणाला, ''बाप हो, हा विक्‍की म्हंजे कोण हे तुम्हास माहीत आहे काय? त्याचे नाव विकास...तो वेडा झालाय!''

Web Title: marathi news marathi website Dhing Tang